शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By Author रीता माणके तेलंग|

Common Man

मी माझ्या रूटीनप्रमाणे दादर स्टेशनवरून लोकल मध्ये बसलो. सवय असल्याने जागा मिळायला फारसा काही त्रास झाला नाही. शेजारी ५ - ६ मंडळी हल्ली च्या राजनैतिक व सामाजिक विषयावर जणू गप्पाच मारत होती. गप्पा म्हणजे काय हो, घटकेत देश प्रेमाचं आव आणायचा तर कधी “Common man” ह्या विषयी रडगाणं नुसतंच. त्यांना बघून शेजारी उभी मंडळीही त्या चर्चे मध्ये सामील झाली. मी मात्र शांत पेपर वाचत होतो. गाडी आपल्या वेगाने चालत होती तश्याच त्यांच्या गप्पा हि रंगत होत्या, अगदी वेगात. 
 
“तुम्हाला नाही का त्रास होत?” एका समवयस्कर सज्जन ने विचारले. “अं.........?”  मलाच प्रश्न विचारला का, हे confirm करायला मी त्यांच्या कडे विस्मयाने बघितले. “हो हो आपणच… तुम्हालाच विचारतोय मी.” ते म्हणाले. " काय हो आपण “Common man” बद्दल नेमकं काय म्हणायचं? काय वाटतं तुम्हाला?”  प्रश्नाचा दुसरा वार ही माझ्या वर केला गेला होता. कदाचित माझी पेपर वाचायची आवड त्यांना काही पटली नव्हती. तसे मला उगीच नाक खुपसणाची सवय नव्हती, पण संधी मिळाल्यावर न चुकता उपदेश द्यायला ही मी मागे नसतो. 
 
““Common man” का?” मी उत्तर द्यायला अगदी सज्ज झालो. खरं तर “Common man” हा शब्द ऐकल्यावर एक लाचार, बिचारं, दुर्बळ व्यक्तिमत्त्व डोळ्या समोर उभं राहतं माझ्या मते “ज्या man ला common sense आहे, तो “Common man”.” “Common man” ची हि परिभाषा प्रथमच ऐकून हैराण झालेल्या त्या लोकांना मी अगदी खोलपणे सांगणे सुरू केले. “कुणाशीही वाद न घालता सरळमार्गी जगायचे, पारिवारिक कर्तव्य पार पाळायचे, शेजार धर्म निभावायचा, नको त्या वेळी वायफळ बोलणे टाळायचे, आपल्या निसर्गावर प्रेम करायचे. पान सुपारी ने भिंतीवर रांगोळ्या नको, सिटी, बस, वाट सर्व ठेवता येतील तितकं स्वच्छ ठेवायचे. खूप सोपे आहे हो. ”मी अजून पुढे वाढत म्हटले. 
 
“अहो समाजाने काही नियम बनवले आहे, शिस्तीत अन् प्रामाणिक पणे ते पाळायचे Simple.  न ट्रॅफिक सिग्नल तोडणे, न बेभानपणे गाड्या धडकवायचा. बिना लाच घेता प्रामाणिकपणे आपलं काम करा, वडील माणसांना, स्त्री वर्गाला आदर सन्मान द्या. अश्या ह्या लहान सहान common गोष्टी हो, काही सांगायला हवं का??” 
 
मी म्हणतो (मी जरा जास्तच बेधडकपणे बोलायला सुरू झालो होतो) देशात काही झालं न झालं की उभे आपले झेंडे घेऊन जाळ-पोळ करायला, अरे तोड-फोड करून, रेल्वे ट्रेक काहळून वाट कुणाची बंद होणार? आपलीच ना? संप केल्याने नुकसान कोणाचे? “Common man” चे. ह्या common sense च्या गोष्टीही शिकवायच्या??”
 
 “देशावर प्रेम करायला अगदी सैनिकच व्हायचं का? किंवा Facebook वर क्रांतिकारी विचार पसरवून आपण खरे राष्ट्रप्रेमी आहोत असे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? नाही सांगा ना हो मला”. त्यांच्या हो नाही च्या प्रतिक्रियेची वाट न बघता मी बोललो. मी जरा जोश्यात होतो आणि ती मंडळी मात्र मला अवाक हून ऐकत होती. “ असा थोडा फार common sense चा वापर करून "माणसाने माणसा सारखं, माणसासाठी जगायचे.”  आहो लोकशाही सारखेच, मग बघा कसा एक स्वच्छ, आदर्श, समृद्ध राष्ट्राचा भक्कम पाया उभा राहील” असे म्हणून, मला होतं तितकं ज्ञान देऊन मी ही मोकळा श्वास घेतला.
 
तसे माझे स्टेशन येण्यास अजून उशीरच होता पण समोर एक गरोदर बाईंना seat ची गरज आहे हे common sense वापरून मी माझी सीट त्यांना देऊन गेटजवळ येऊन उभा राहिलो. एका “Common man” सारखाच शांत, साहसी, प्रामाणिक, सशक्त आणि स्वावलंबी “Common man”.