सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified बुधवार, 4 मे 2022 (11:18 IST)

तानसेन हिंदू म्हणून जन्माला आला पण मुस्लिम म्हणून वारला, कारण...

अकील अब्बास जाफरी
तानसेन भारतातल्या महत्त्वाच्या संगीतकारांपैकी एक होते. त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्या समाधीवर एक रोप उमललं. त्याचं पुढे जाऊन मोठं झाड झालं.
 
संगीत शिकणाऱ्यांपकी अनेकजण या समाधीला भेट देतात आणि या झाडाची पानं खातात. या रोपाची पानं खाल्ली की आवाज सुरेल होतो अशी आख्यायिका आहे.
 
शास्त्रीय संगीतात ग्वाल्हेर घराणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. या घराण्याने सुरुवातीला ध्रुपद गायकीत प्रभुत्व मिळवलं होतं. काही काळानंतर या घराण्याच्या गायकांनी खयाल गायकीकडे मोर्चा वळवला. खयाल गायकी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सादर करायला सुरुवात केली.
 
मुघल राजा जलालुद्दीन अकबरच्या काळात ग्वाल्हेर संगीताचं मोठं केंद्र होतं. राजा मान सिंह तोमर (1486-1516) यांनी एका अकादमीची स्थापना केली होती. या अकादमीत बख्शू यासारख्या विशेषज्ञ संगीत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
 
नायक बख्शू ध्रुपद गायकीचे महारथी मानले जात. शाहजहानच्या काळापर्यंत उत्तर भारतातल्या संगीतज्ज्ञांवर याचा प्रभाव पाहायला मिळतो. मान सिंह तोमर, नायक बख्शू, सुलतान आदिलशाह सुरी, हजरत मोहम्मद गौस ग्वाल्हेरी यांच्यामुळे ग्वाल्हेरची गणती महत्त्वाच्या संगीत केंद्रांमध्ये होत.
 
अकबराच्या दरबारातील 18 गायकांपैकी 11 गायक ग्वाल्हेर घराण्याचेच होते. यापैकी एक मोठं नाव म्हणजे उस्ताद तानसेन. प्रोफेसर मोहम्मद असलम यांनी 'सलातीन -ए-देहली' आणि 'शाहान-ए-मुगलिया का जौक-ए-मौसीकी' यामध्ये उस्ताद तानसेन यांच्याविषयी लिहिलंय. तानसेन यांचं नाव घेतल्यावर गायक आदराने कानाला हात लावत असत. तानसेन यांचं गाव ग्वाल्हेरजवळच आहे.
 
त्यांचे वडील मकरंद पांडे गौड ब्राह्मण होते. हजरत मोहम्मद गौस ग्वाल्हेर त्यांच्यासाठी श्रद्धेय होते. मकरंद पांडे यांना स्वत:चं मूल नव्हतं. त्यांनी हजरत मोहम्मद गौस यांना विनंती केली की तुम्ही देवाकडे प्रार्थना करा- जेणेकरून मला मूल होऊ दे.
 
ते पुढे लिहितात, 'हजरत मोहम्मद गौस यांच्या दुवांमुळे मकरंद यांना पुत्रप्राप्ती झाली. तानसेन यांच्या जन्माची कहाणी अशी आहे. तानसेन पाच वर्षांचे असताना मकरंद त्याला घेऊन हजरत मोहम्मद गौस यांच्याकडे गेले. गौस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या दुवा घ्याव्यात असा मकरंद यांचा विचार होता. तानसेनचं संगीतात नाव व्हावं अशी इच्छा मकरंद यांनी गौस यांच्याकडे व्यक्त केली.
 
गौस त्यावेळी पान खात होते. त्यांनी त्यांची लाळ तानसेनच्या तोंडात घातली. यावर मकरंद म्हणाले, हा आमच्या धर्मातून बाहेर पडला आहे. त्यामुळे याला तुमच्या छत्रछायेखाली घ्या.
 
गौस यांनी आपल्या मुलासारखं तानसेन यांचं संगोपन सुरू केलं. ग्वाल्हेरच्या नामवंत गायकांकडून त्यांना शिक्षण मिळेल अशी व्यवस्था केली. तानसेनने काही वर्षं सुलतान आदिल शहा यांच्यासमोर कला सादर केली. दक्षिणेला जात बख्शू यांच्या मुलीकडून रागाचं शिक्षण घेतलं.
 
तानसेन यांनी बाबा हरिदास यांच्याकडूनही शिक्षण घेतल्याचे उल्लेख आहेत. तानसेन यांच्यासाठी गौस हे आयुष्यभर श्रद्धेय होते. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन तानसेन यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. गुरुशिष्याचं हे नातं अतूट अशा स्वरुपाचं आहे.
 
आजही गौस यांच्या दर्ग्यात तानसेन यांची समाधी आहे. गुरु गौस यांच्याप्रमाणे तानसेन यांची समाधी संगीतप्रेमींसाठी आदराचं ठिकाण आहे. नामवंत गायकांसाठी इथे येऊन गायन करणं अभिमानाची गोष्ट आहे.
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तानसेन यांनी राजा रामचंद्र यांच्याकडे नोकरी केली. राजा रामचंद्र यांनी तानसेन यांची प्रतिभा ओळखली होती. त्यांच्या गुणकौशल्यांचं रामचंद्र यांना कौतुक होतं. तानसेन यांचं गाणं ऐकल्यावर राजा रामचंद्र यांनी एक कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली होती.
 
तानसेन यांच्या कलेची प्रसिद्धी अकबरपर्यंत पोहोचली. अकबर यांनी राजा रामचंद्र यांना सांगून तानसेन यांना आग्र्याला बोलावलं. अकबराच्या दरबारात तानसेन यांनी विशेष स्थान पटकावलं. अकबर यांची त्यांच्यावर खास मर्जी होती.
 
तानसेन यांनी अकबर यांच्या आवडीचे दरबारी कानहरा, दरबार कल्याण, दरबारी आसावरी, शहाना असे राग सादर केले.
 
डॉक्टर अब्दुल हलीम यांनी केलेल्या संशोधनानुसार मियाँ की मल्हार, मियाँ की तोडी, मियाँ की सारंग हे तानसेन यांनी तयार केलेले राग आहेत.
 
महत्त्वाचं म्हणजे तानसेन यांची निर्मिती असलेल्या या रागांची नोटेशन्स रामपूरच्या सांगीतिक ग्रंथालयात सुरक्षितरीत्या जतन करण्यात आल्या आहेत.
 
तानसेन यांनी संगीत क्षेत्राला दिलेल्या योगदानाबाबत सय्यद आबिद अली लिहितात, तानसेन यांनी शास्त्रीय संगीताला नवा आयाम, नवा गोडवा मिळवून दिला. त्यांनी रागांमध्ये अनोखे प्रयोग केले आणि त्यामुळेच हे राग त्यांची ओळख झाले. उदाहरणार्थ मियाँ की तोडी, मियाँ की मल्हार.
 
पण एका रागामुळे तानसेन यांच्या नावाची कीर्ती सगळीकडे दुमदुमली, तो राग म्हणजे दरबारी. तानसेन यांनी हा राग आळवला की मनातल्या सुप्त इच्छा जागृत होतात आणि महत्वाकांक्षी विचार प्रकट होतात, असं अकबराला वाटत असे.
 
दरबारी रागासंदर्भात प्राध्यापक खादिम मोहिउद्दीन लिहितात, "रात्रीचा पहिला प्रहर उलटून गेल्यानंतर आणि मध्यरात्रीच्या आधी या वेळेत हा राग गायला जातो. रागाचे सुरुवातीचे सूर आहेत नी सा रे धा नी पा. हा राग ऐकल्यानंतर मनशांती मिळते."
 
या रागातील सुरांचा भर खालच्या सप्तकावर असे. अकबराचा हा आवडता राग होता. राज्य कारभाराच्या व्यग्र दिनक्रमानंतर अकबराला शांतता आणि विरंगुळा हवा असे. त्यावेळी तानसेन हा राग अकबरासमोर सादर करत असत.
 
माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही, असं सतत म्हणणारे अबूल फजल यांनीही तानसेन यांच्या कलागुणांचा आदर करताना म्हटलं की गेल्या हजार वर्षांत त्यांचासारखा गायक पृथ्वी तलावावर झाला नाही.
 
प्राध्यापक मोहम्मद अस्लम लिहितात की, "दक्षिणेला प्रयाण करत तानसेन यांनी बख्शू यांच्या मुलीकडून शिक्षण घेतलं. या घटनेसंदर्भात काजी मैराज धौलपूर यांनी आजकल नावाच्या मासिकात संगीत नंबर ऑगस्ट 1956च्या लेखात तानसेनवर लिहिलं होतं. ते लिहितात, हजरत मोहम्मद गौस यांनी दिलेल्या पानाचा परिणाम तानसेन यांच्या गळ्यावर दिसून येतो. त्यांच्या आवाजाला गोडवा आणि सर प्राप्त झाली. यामुळे तानसेन यांची गाण्याविषयीची गोडी वाढली. सगळीकडे त्यांच्या गायकीचे दाखले दिले जाऊ लागले. पण तेव्हा तानसेन यांनी संगीताचं औपचारिक शिक्षण घेतलंही नव्हतं".
 
हजरत मोहम्मद गौस यांनी 1532 मध्ये राजा मान यांनी ग्वाल्हेरमध्ये स्थापन केलेल्या गान विद्यालयात तानसेन यांना प्रवेश मिळवून दिला. गायन कलेत विशेष प्रावीण्य मिळवलेले मुच्छू आणि भंवर तिथेच होते. पण त्यावेळी त्यांचे उस्ताद बख्शू यांचं निधन झालेलं होतं. जे एकेकाळी राजा मान यांचे सहयोगी होते.
 
राजाने राणी मृगनयनीच्या नावाने या विद्यापीठाची स्थापना केली होती. त्या स्वत: गाण्यात पारंगत होत्या.
 
तानसेन चार पाच वर्षात या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले. परंतु उस्ताद बख्शू यांचा सहवास न लाभल्याची खंत त्यांच्या मनात होती. बख्शू यांची मुलगी नवऱ्याबरोबर दक्षिणेत होती. बख्शू यांनी सगळी संपत्ती मुलीला देऊन टाकली होती.
 
तानसेन यांनी बख्शू यांचं ज्ञान मिळवण्यासाठी त्यांच्या मुलीकडे जाऊन शिकण्याचा निर्णय घेतला. पीर यांच्याकडून परवानगी घेऊन तानसेन दक्षिणेत पोहोचले.
 
त्यांनी आपलं गाणं ऐकवलं पण बख्शू यांच्या मुलीने फारसं लक्षच दिलं नाही. आणखी शिका असा सल्लाही बख्शू यांच्या मुलीने दिला आणि तानसेन रिकाम्या हाती परतले.
 
परतल्यानंतर गुरुला त्यांनी जे घडलं ते ऐकवलं. त्यांनी तानसेन यांचं मनोधैर्य वाढवलं आणि म्हटलं की खचून जाऊ नकोस. तुझ्या कर्तृत्वाची दखल बख्शू यांची मुलगी एक दिवस घेईलच असं ते म्हणाले.
 
याच विचारांच्या अस्वस्थतेतून तानसेन झोपी गेले. झोपेत एक वृद्ध माणूस गाऊन त्यांना काही गोष्टी समजावत होता. काही ध्रुपदं त्याचवेळी त्यांनी गिरवली.
 
तानसेन सकाळी उठले तेव्ही ही ध्रुपदं त्यांच्या मेंदूत मनात कोरून राहिली होती. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. झोपेत जे घडलं ते त्यांनी गुरुंना सांगितलं. गुरुंनी सांगितलं की त्यांनी जे सांगितलं ते विसरू नकोस. बख्शू यांनी तुला संगीत कलेचा महान उपासक केलं आहे.
 
दुसरीकडे बख्शूंचा हा नवा विद्यार्थी रियाजात मग्न होऊन गेला होता. आता आपली वेगाने प्रगती होतेय असं तानसेना यांना वाटत होतं. तानसेन यांना पूर्ण खात्री पटली तेव्हा त्यांनी दक्षिणेकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बख्शू यांच्या मुलीला गाणं ऐकवलं. बख्शू यांच्या घराण्याची सगळी गायकी तानसेन यांच्या गळ्यात उतरली होती. त्यांना अत्यानंद झाला आणि त्यांनी उरलेलं ज्ञान तानसेन यांना दिलं.
 
अकबराच्या सांगण्यावरून तानसेन यांनी 16 हजार राग आणि 360 तालांचा सखोल अभ्यास केला. भरपूर विचारव्यासंगानंतर 200 मूळ राग आणि 92 मूळ ताल त्यांनी कायम ठेवले आणि बाकी सगळं काढून टाकलं.
 
तानसेन नावाच्या त्या काळातील पत्रिकेत या रागांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल लिहिलं आहे. प्राध्यापक मोहम्मद अस्लम लिहितात, तानसेन यांनी जुन्या रागांना नवं रुपडं दिलं एवढंच नाही तर अनेक नवे राग निर्माण केले. दरबारी आणि शाम कल्याण हे राग आणि तानसेन असं समीकरण झालं होतं. अकबराला हे राग अतिशय आवडायचे आणि सातत्याने याच रागांची ते फर्माइश करत असत.
 
ध्रुपद गायकीत तानसेन यांच्या ग्वाल्हेर घराण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहुतांश इतिहासकारांनी त्यांना ग्वाल्हेर घराण्याचं संस्थापकही मानलं आहे.
 
तानसेन यांच्या कार्यकाळात ध्रुपद गायकीला शास्त्रीय संगीतातील शैली म्हणून मान्यता मिळाली. नंतर गौरहार, खंडार, नौहार आणि डागर अशा चार प्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण झालं. आजही यापैकी दोन प्रकार प्रचलित आहेत.
 
तानसेन यांच्या ध्रुपद गायकीतून दोन घराण्यांचा उदय झाला. तानसेन यांचा मोठा मुलगा तान तरंग (1536-1602) यांनी सुरू केलेल्या घराण्याचं नाव सेनिया. ध्रुपदचा हा प्रकार केवळ गाण्यापुरता मर्यादित राहिला नाही.
 
दुसरा प्रकार तानसेन यांच्या दुसऱ्या मुलाने म्हणजे बिलास खान यांनी पुढे चालवला. ध्रुपदच्या या प्रकारात साजचाही समावेश झाला. या प्रकारातील संगीतकारांनी रुबाब, बीन आणि सितार वाजवण्यात कमाल केली.
 
पण त्यांचं गायकीवरचं लक्ष ढळलं नाही. साज आणि आवाजाची लय एकत्र करून त्यांनी वेगळी शैली विकसित केली. आजही साजकारांच्या रामपूर, शाहजहानपूर आणि इटावा घराण्यात याचे परिणाम पाहायला मिळतात.
 
तानसेन यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. 1943 मध्ये तानसेन यांच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटात के. एल. सेहगल यांनी तानसेन यांची भूमिका साकारली होती. जयंत देसाई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
 
1990 मध्ये पाकिस्तानमध्ये तानसेन यांच्या जीवनावर आधारित एक टीव्ही मालिका तयार करण्यात आली. ख्वाजा नजमुल हसन या मालिकेचे निर्माते होते तर हसीना मोईन लेखिका होत्या. त्या मालिकेत आसिफ रजा मीर आणि जेबा बख्तियार यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या.