"मनसेला हिंदुत्वाचे धडे देणाऱ्यांची डिग्री बोगस आहे," अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
आज (4 मे) सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी मनसे तसंच भाजपवरही अनेक टोले हाणले.
ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना आपलं काम कसं करायचं, हे चांगलंच माहीत आहे. सर्व धार्मिक स्थळांना सारखाच नियम आहे."
"बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच मंदिरांवरील लाऊडस्पीकर हटवण्यास सांगितलं नव्हतं. ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं, त्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. मनसेला हिंदुत्वाचे धडे देणाऱ्यांची डिग्री बोगस आहे," असं राऊत यांनी म्हटलं.
पनवेलची अजान लाऊडस्पीकरशिवाय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आज (4 मे) मनसे कार्यकर्त्यांनी पहाटेपासूनच अजानविरोधात आंदोलन केलं. पहाटेच्या वेळी मशिदींवरील लाऊडस्पीकरवर अजान सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावून त्याचा विरोध केला.
पण काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांचा हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील काही भागात पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर न करता तोंडी स्वरुपातच करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.
पनवेल शहरातील पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर न होता, फक्त तोंडी स्वरुपात करण्यात आली, असा दावा मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी केला आहे.
राज ठाकरेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल चिले यांनी सर्व मुस्लीम बांधवांचे आभारही मानले आहेत.
एक व्हीडिओ क्लिप जारी करून चिले म्हणाले, "आज पनवेलमध्ये सकाळी 4.50 आणि 6.08 अजान लाऊड स्पिकरवर न होता फक्त तोंडाने बोलून झाली. राज ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मुस्लिम बंधूंचे आभार.
पनवेल शहर पोलिसांनी सुद्धा कायदा सुव्यवस्था राखायला मदत केली. या पुढेही अशीच अजाण लाऊड स्पीकरवर न देता तोंडी द्यावी. जर या पुढे लाऊड स्पिकर अजाण दिली गेली तर हनुमान चालिसा सुद्धा लाऊडस्पिकरवरच ऐकावी लागेल, असं चिले म्हणाले.
राज ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या जुन्या भाषणाचा व्हीडिओ ट्वीट
अजानचे भोंगे आणि हनुमान चालिसा हा वाद पेटलेला असतानाच राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या भाषणाचा एक व्हीडिओ ट्वीट केला आहे.
या व्हीडिओत बाळासाहेब ठाकरे रस्त्यांवरील नमान आणि मशिदीवरील भोंग्यांवरून टीका करताना दिसून येतात.
या भाषणात बाळासाहेबांनी म्हटलं होतं, "ज्यादिवशी माझं सरकार या महाराष्ट्रात येईल, त्यादिवशी रस्त्यांवरील नमाजपठण आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण, धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कुठे कुणाला उपद्रव होत असेल, तर त्यांनी मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करू. म्हणून मशिदीवरचे लाऊडस्पीकर खाली आलेच पाहिजेत."
या व्हीडिओच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेलाही एक संदेश दिल्याचं सांगितलं जात आहे. मशिदीवरील भोंग्यांबाबत बाळासाहेब ठाकरेंची काय भूमिका होती, याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे.
राज ठाकरेंना मुंबई पोलिसांची नोटीस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे. कलम 149 अंतर्गट ही नोटीस राज यांना देण्यात आली आहे.
मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी बीबीसीला याविषयी माहिती दिली.
ते म्हणाले, "आम्ही कलम 149 अंतर्गत राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. कोणतंही वक्तव्य किंवा कृती ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं काही करू नये, यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे."
मुंबई पोलिसांकडून ही नोटीस राज यांना सोमवारी रात्री उशिरा देण्यात आली. शिवाजी पार्क पोलिसांनी राज यांच्या नावे ही नोटीस काढल्याची माहिती मिळाली आहे.
लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावल्याच्या राज्यभरातून बातम्या
मशिदींमध्ये पहाटे अजान सुरू असताना समोर लाऊडस्पीकरवर अजान लावल्याच्या बातम्या राज्यात काही ठिकाणांहून येत आहेत. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते याबाबत व्हीडिओ शेअर करत असून हे व्हीडिओ नेमके कधीचे आणि कुठले आहेत, याची पडताळणी अद्याप बीबीसीला करता आलेली नाही.
राज ठाकरेंची घोषणा आणि त्यावरून निर्माण होऊ शकणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राज्यात सर्वत्र कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यातील मशिदींबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये 29 जण ताब्यात
राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार, मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर अजान सुरू असताना हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न नाशिक पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 29 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या महिन्यात 2 तारखेला म्हणजेच गुढी पाडव्याच्या सभेदिवशी राज ठाकरे यांनी मशिदींसमोर दुप्पट आवाजात लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गेला महिनाभर या मुद्द्यावरून राजकारण पेटलेलं आहे.
यानंतर 12 एप्रिल रोजी झालेल्या ठाण्याच्या सभेतही राज ठाकरेंनी आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला. तसंच 1 मे रोजी औरंगाबादच्या सभेतही राज यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडल्याचं दिसून आलं होतं.
मुस्लीम धर्मीयांची 3 रोजी रमजान ईद असल्याने तोपर्यंत आपण वाट पाहू. पण 4 तारखेनंतर मात्र आपण ऐकणार नाही. ठिकठिकाणी मशिदींच्या अजानसमोर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावण्यात येईल, असं राज ठाकरे यांनी आक्रमकपणे म्हटलं होतं.
दरम्यान, राज यांच्या औरंगाबाद सभेनंतर त्यांच्या भाषणाची चौकशी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणप्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज (4 मे) राज्यातील घाडमोडींवर लक्ष असणार आहे. राज ठाकरे यांच्या घोषणेचे पडसाद राज्यात कशा प्रकारे उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.