मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By वेबदुनिया|

आदर्श 'शिक्षक’

गुरू देतील जगाला आदर्श असा वसा

घडवतील ते नागरिक सबल करण भारता

आज शिक्षक दिन. या दिवशी शिक्षकांचा उचित सन्मान केला जातो. तो करण्याचे औचित्य बर्‍याच संस्था दाखवतात. जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अनेक बहुउद्देशीय संस्था शिक्षकदिन साजरा करतात. यामुळे दरवर्षी वेगवेगळी बरीच नावे आपल्या समोर येतात. शाळा आणि शाळेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते. परंतु शाळेसाठी विद्यार्थ्यांनी आटापिटा करायचे दिवस गेले. आता मुलांसाठी कष्ट घेण्याचे दिवस शिक्षकांवर आले आहेत.

पूर्वीच्या काळी गुरुगृही राहून शिक्षण घेतले जात होते. आताही गुरुकुल योजनेखाली चालणार्‍या अनेक संस्था आहेतच. पण खंत एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे पूर्वी इतका सन्मान गुरूंना मिळत नाही. अनेक जणांचं मत असंही येतं की, शिक्षकांनी स्वत:च स्वत:चं आत्मपरीक्षण करावं. बर्‍याच वेळा असं होतं, शिक्षकांमध्ये हजारातील एकाकडून एखादी चूक घडली की, सार्‍याच शिक्षकांकडे त्याच नजरेने पाहणे चुकीचे आहे. अनेक आदर्श शिक्षक म्हणणपेक्षा सारेच आदर्श शिक्षक असतात. त्यांच्यातील गुणांकडे डोळेझाक करून चालणार नाही. शिक्षक म्हणजेच शी-शीलवान, क्ष-क्षमशील, क-कर्तृत्ववान. ज्यामध्ये हे सर्व गुण असतात तो खरा आदर्श शिक्षक. मग यला अगदीच शोधलं तर कुठेतरी एखादा गुण कमी जास्त असतो, म्हणून सर्वच शिक्षकांना एका मापात तोलणे चुकीचे आहे. शिक्षकांनी चांगल्या केलेल्या कामाची नोंद वेळोवेळी झाली पाहिजे. शिक्षकांमधील आदर्श गुणांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.

‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्यामुळे शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळते. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाच पाहिजे असा अट्टहास धरणारे खूप थोडे असतात. पण आपल्या कामालाच देव मानून मुलांमध्ये देव शोधणारे अगणित आहेत आणि असतात. कोणत्याही पुरस्काराची किंवा बक्षिसाची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने काम करणारेही अगणित आहेत. तरीही प्रोत्साहन मिळाल्यावर ज्याप्रमाणे विद्यार्थी खूप आनंदाने जास्त प्रेरित होऊन कृती करतो त्याचप्रमाणेच शिक्षकांनाही हे प्रोत्साहन ठरते. आपण केलेल्या कार्याची पोच कोणीतरी घेतो, आपल्या कार्याकडे कोणाचे तरी लक्ष आहे ही भावनाही सुखावून जात असते. पुरस्कार मिळणे हेच काही सर्वस्व नसते. विद्यार्थी जेव्हा मोठे होतात, ते एखाद्या मोठ्या पदावर आसनस्थ होतात, चांगले पद भूषवतात त्यापेक्षाही महत्त्वाचे ते ‘आदर्श नागरिक’ बनतात. तीच खरी शिक्षकांसाठी पावती असते. शिक्षकाच्या कार्यासाठी हाच खरा पुरस्कार असतो. मोठ्यामोठ्या संस्थांमधील जागृत पालकांकडून विद्यार्थी निम्मा घरीच घडविला जातो. पुढील काम शिक्षक करतात. पण कामगार वस्तीतल्या संस्था, शाळांमधून मात्र शिक्षकांचा खरा कस लागतो. या सर्वांवर मात करून हे शिक्षक ‘माणूस’ घडवितात. आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयत्न करतात. खरंच त्यांच्या त्या जिद्दीला, चिकाटीला मानलेच पाहिजे.

आज शिक्षक दिनानिमित्त या सार्‍या शिक्षकांना, ज्यांनी ज्यांनी शिक्षणाचा वसा घेतला आहे, त्या सार्‍यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.