रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (16:43 IST)

Bird Flu बर्ड फ्लू नेमका काय? कसा आणि कुठून आला बर्ड फ्लू? देशात पूर्वी झालेले आर्थिक नुकसान यावर संपूर्ण रिपोर्ट

तीन वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर काही देशातील कोरोना (Corona) आता कुठे नियंत्रणात आला आहे. लोकांमध्ये कोरोनाबद्दल असलेली भिती नाहीशी होऊन आता सर्वकाही सुरुळीत सुरु आहे. अशा परिस्थिती मात्र, देशात पुन्हा एक मोठं सकंट येण्याची शक्यता वाटत आहे. त्याच कारण म्हणजे देशावर बर्ड फ्लूचं (Flu) संकट घोंघावतय. झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील सरकारी पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आली आहेत.बर्ड फ्लूमुळे काही कडकनाथ कोंबड्यांचाही (Kadaknath) मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 
‘या’ राज्यात आढळलं बर्ड फ्लू
झारखंड बोकारो जिल्ह्यातील लोहांचल येथील सरकारी पोल्ट्री फार्ममधील कडकनाथ कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू (H5N1) ची प्रकरणे आढळून आले आहे. या पार्श्वभुमीवर प्रशासनाने एक निवेदन जारी केले आहे. बर्ड फ्लूची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने पोल्ट्री फार्मची एक किलोमीटर त्रिज्या बाधित झोन आणि 10 किलोमीटर त्रिज्या सर्व्हिलन्स झोन म्हणून घोषित केली आहे. या भागात कोंबडी आणि बदकांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.
 
पशुसंवर्धन विभाग सतर्क
पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बुधवारपासून संबंधित परिसरात नमुने तपासणीचे काम सुरू केले आहे. सीमाभागातील कोंबड्या आणि बदकांच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवले जात आहे. वैद्यकीय पथक सर्व ब्लॉकमधील मोठ्या पोल्ट्री फार्ममधून कोंबडी आणि बदकांचे नमुने गोळा करत आहे. नमुने कोलकाता किंवा भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
बर्ड फ्लू म्हणजे काय? 
सगळ्या पहिला प्रश्न, बर्ड फ्लू आहे तरी काय?
बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा (avian influenza) असंही म्हणतात. जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते.
bird flu
बर्ड फ्लूच्या नावातील ‘H’,’N’चा अर्थ काय?
पक्षांमध्ये पसरणाऱ्या फ्लूचे म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील H म्हणजे हेमाग्युलेटीन (Hemagglutinin) आणि N म्हणजे न्यूरामिनीडिज (Neuraminidase) हे दोन्ही या विषाणूचे प्रोटीन स्ट्रेन आहेत. आणि याच्याच उपप्रकारांना नंबर दिलेले आहेत. H म्हणजेच हेमाग्युलेटीनचे 18 उपप्रकार आहेत, तर N म्हणजेच न्यूरामिनीडिजचे 11 उपप्रकार आहेत. यातील फक्त H5, H7 आणि H10 याच स्ट्रेन माणसाच्या मृत्यू कारण ठरु शकतात. त्यामुळं H5N1 हा माणसांसाठी अधिक धोकादायक मानला जातो. यामधील H17N10 आणि H18N11 हे फक्त वटवाघुळांमध्येच आढळतात. बाकी पक्षांमध्ये याचा प्रसार होत नाही.
 
अर्थातच कोरोनामुळे आता तुम्हाला विषाणू, त्याचा स्ट्रेन, त्याचा प्रकार या सामान्य बाबी आता समजल्याच असतील. जसा कोरोनाचा नवा स्ट्रेन सध्या धुमाकूळ घालतो आहे, अगदी तसेच बर्ड फ्लूच्या विषाणूचे देखील इतर अनेक स्ट्रेन आहेत. जसे की H5N7 आणि H5N8 असे... आणि हेदेखील संसर्गजन्य तसेच जीवघेणे आहेत. हा व्हायरस सर्वांत आधी गीस या पक्ष्यामध्ये आढळला... तो सुद्धा चीनमध्ये... चीन ही विषाणूंची जननी आहे.. असं छातीठोकपणे म्हणायला आता काही हरकतच उरली नाहीये... आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा विषाणू आणि हा रोग जगभरात सापडत गेला. भारतामध्ये हा विषाणू पहिल्यांदा महाराष्ट्रात सापडला होता. 2006 मध्ये नंदूरबारमध्ये याची पक्ष्यांना लागण झाली होती. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये आढळलेल्या पक्ष्यांच्या शरिरामध्ये H5N8 हा स्ट्रेन सापडला आहे तर हिमाचल प्रदेशातील  पक्ष्यांच्या चाचणीमध्ये H5N1 हा विषाणू सापडला आहे.
 
काय आहे या रोगाचे प्रमाण?
2006 ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यान भारतामध्ये बर्ड फ्लूचे 225 हॉटस्पॉट सापडले आहेत. यामध्ये 83.49 लाख पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. एकूण पॉल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे यामुळे 26.37 कोटींचे नुकसान झाल्याचे आकडेवारी सांगते.
 
महत्त्वाची गोष्ट अशी की, या बर्ड फ्लूची पहिली केस ज्या महाराष्ट्र राज्यात सापडली त्या महाराष्ट्रात 2006 नंतर या विषाणूचा उद्रेक झालेला अद्यापतरी आढळला नाहीये. तसेच आता आढळलेल्या सर्व केसेस या महाराष्ट्राबाहेरच्याच आहेत. ओडीसा, त्रिपूरा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये या विषाणूचे सातत्याने उद्रेक झालेले पहायला मिळाले आहेत. म्हणजे या विषाणूच्या संदर्भात ही राज्ये सततच हॉटस्पॉट राहिलेली आहेत. सध्याचा उद्रेक दिसून येतोय त्यामध्ये बहुतांश जंगली पक्षी, कावळे आणि स्थलांतर करणारे पक्षी हे या विषाणूला बळी पडलेले आहेत.  २००6 पासून, कुक्कुटपालन उद्योगाने आपल्या शेतांमध्ये कटाक्षाने बायो सेफ्टी झोन विकसित केले आहेत, त्यामुळे इथल्या पक्ष्यांचा कोणत्याही परदेशी पक्ष्याच्या संपर्कात येण्याला आळा बसला आहे.
chicken legs
चिकन-अंडी किती धोकादायक?
हा खरा आपल्यासमोरचा चिंतेचा विषय आहे. अभ्यास असं सांगतो की H5N1 हा विषाणू माणसामध्ये येण्याचे भारतातील चान्सेस कमी आहेत. दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्वंयपाक बनवण्याच्या पद्धतीत असलेला लक्षणीय फरक हे याचे प्रमुख कारण आहे. याचं कारण असं आहे की हा विषाणू 70 डिग्री सेल्सियसच्या वरील तापमानात मरतो. दक्षिण आशियातील इतर देशांशी तुलना केली तर भारतामध्ये सर्रास सगळीकडेच जेवण बनवताना ते पुरेशा प्रमाणात शिजवले जाते. चिकन-मटण, अंडी यांना 100 डिग्री सेल्सियसच्या वरच शिजवल्यामुळे माणसांत हा विषाणू चिकन आणि अंड्यांच्या माध्यमातून येण्याचे चान्सेस फार म्हणजे फारच कमी आहेत. भारतामध्ये दर महिन्याकाठी 30 कोटी पोल्ट्रीतले पक्षी आणि 900 कोटी इतकी अंडी खाद्यपदार्थांसाठी वापरली जातात.
 
भारतातील बर्ड फ्लूचा इतिहास काय?
2006 साली पहिल्यांदा महाराष्ट्रातच बर्ड फ्लूनं संक्रमित पक्षी आढळले होते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. त्यावेळी राज्यभरात तब्बल अडीच लाख कोंबड्या मारल्या गेल्या. तर 5 लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली. या संक्रमण काळात कुठल्याही मृत्यूची नोंद सापडत नाही
 
बर्ड फ्लूची लक्षणं काय?
बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो
 
बर्ड फ्लूवर औषध आहे का?
बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळं बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणं सुरु करतं. याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांची दुष्परिणामही होऊ शकतात.

बर्ड फ्लू- अफवा आणि वास्तव
दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात बर्ड फ्लूच्या अफवा उठतात, त्याचा परिणाम थेट पशूपालन आणि पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांवर होतो. कोंबड्यांचे दर पडतात. लाखो कोंबड्या मारल्या जातात, आणि लाखो शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं. बर्ड फ्लूमुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पाहिलं तर ते अतिशय कमी आहे. मात्र, त्याचा प्रसार होऊ न देणंही गरजेचं आहे. त्यामुळंच या सगळ्यामध्ये सुवर्णमध्य साधणं गरजेचं आहे. खरंच आपल्यापर्यंत बर्ड फ्लू आला आहे का? आणि आला असेल तर कुठली काळजी घ्यायला हवी हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण, आस्मानी-सुलतानी संकटानंतर शेतकऱ्याचं सर्वाधिक नुकसान कुठली गोष्ट करत असेल तर ती आहे अफवा.
 
कोरोनाच्या सुरवातीच्या काळात देखील लोकांनी भीतीपोटी चिकन-अंडी खाणे सोडून दिले होते, याचा फटका अर्थातच पोल्ट्री इंडस्ट्रीला बसला होता. या दरम्यानच्या निव्वळ दोन महिन्याच्या काळात 100 कोटी डॉलरचे नुकसान झाले होते. मात्र, या इंडस्ट्रीने लवकरच पुनरागमन केले खरे... मात्र, आता पुन्हा बर्ड फ्लूने डोके वर काढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Edited by: Ratnadeep Ranshoor