शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 (16:25 IST)

मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावं? पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्षांची अट का लावली?

- जान्हवी मुळे
तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा शाळेत गेला होतात? हा प्रश्न अनेक जण अनेकांना विचारत आहेत. कारण मुलांना शाळेत नेमकं कोणत्या वयात पाठवावं हा मुद्दा परत चर्चेत आला आहे.
 
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचं किमान वय सहा वर्षं हे निश्चित करण्यात आलं असून, ते काटेकोरपणे पाळलं जावं असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा एकदा दिलेत.
 
आता हे वय सहा वर्षं असं कोणी आणि का निश्चित केले? शाळेत जाण्याचे योग्य वय काय आहे, याविषयी तज्ञ काय सांगतात? जाणून घेऊयात.
 
पहिलीसाठी भारतात सहा वर्षांची अट
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत अनेक शाळांमध्ये अडीच वर्षांच्या मुलांनाही नर्सरीमध्ये प्रवेश मिळायचा. म्हणजे पहिली प्रवेशाचं वय होतं साधारण पाच किंवा साडेपाच वर्ष.
 
पण 2020 साली लागू झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार पहिल्या इयत्तेत प्रवेशाचं वय सहा वर्ष असं निश्चित करण्यात आलं आहे.
 
या धोरणानुसार शिक्षणाची 10+2 ऐवजी आता 5+3+3+4 विभागणी करण्यात आली आहे आणि प्रत्येक टप्प्यासाठी किमान वयाची अटही निश्चित करण्यात आली आहे.
 
पहिल्या फाऊंडेशन या टप्प्यात अर्थात नर्सरी, लोअर केजी, अप्पर केजी (आंगणवाडी किंवा बालवाडी, छोटा शिशूवर्ग, बालवर्ग किंवा मोठा शिशूवर्ग) अशा पूर्वप्राथमिक शिक्षणासोबतच पहिल्या आणि दुसऱ्या इयत्तेचाही समावेश आहे.
 
वयाची तीन वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलांना नर्सरीमध्ये प्रवेश द्यावा, म्हणजे पहिलीत जाताना मुलांचं वय सहा पूर्ण झालेलं असेल, असंही हे धोरण स्पष्ट करतं.
 
तरीही अनेक राज्यांमध्ये हा नियम पाळला जात नसल्याचं समोर आलंय.
 
मार्च 2022 मध्ये लोकसभेत केंद्र सरकारने दिलेल्या एका उत्तरानुसार 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सहा वर्षांपेक्षा कमी वय असतानाही मुलांना पहिलीत प्रवेश दिला जातो आहे.
 
आसाम, गुजरात, पुदुच्चेरी, तेलंगणा, लडाख, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा, गोवा, झारखंड, कर्नाटक आणि केरळमध्ये पाच वर्षे पूर्ण झालेली मुलं पहिलीत प्रवेश घेऊ शकतात.
 
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्षांची अट आधीच लागू झाली आहे.
 
तरीही काही खाजगी शाळांनी सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना पहिलीत प्रवेश दिल्याच्या किंवा पालकांनी त्यासाठी आग्रह धरल्याच्या घटना याही राज्यांमध्ये समोर आल्या आहेत.
 
त्यामुळेच या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी असे निर्देश आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुन्हा एकदा दिले आहेत.
 
पहिलीसाठी सहा वर्षांची अट कशासाठी?
मुलांना लवकर शाळेत टाकलं तर ती लवकर, भराभर शिकतील असा काहींचा समज असतो.
 
पण शिकण्यासाठी आवश्यक शारीरिक, मानसिक वाढ पूर्ण झाल्याशिवाय मुलांना प्राथमिक शाळेत पाठवू नये असं तज्ञ सांगतात.
 
पहिलीत गेल्यावर लिहायला, वाचायला शिकायची सुरुवात करायची त्यासाठी आधी हाताच्या स्नायूंमध्ये किमान पेन्सिल नीट धरण्याची क्षमता विकसित होणं गरजेचं असतं.
 
त्याशिवाय hand-eye coordination म्हणजे हस्त-नेत्र कौशल्य आणि बाकीची motor skills म्हणजे स्नायू वापरण्याची कारक कौशल्य तसंच भावनिक वाढ आणि सामाजिक विकास झाल्यावरच मुलांचं अधिकृत शिक्षण सुरू करावं असं तज्ज्ञ सांगतात.
 
मेंदू आधारित शिक्षणावर संशोधन करणाऱ्या डॉक्टर श्रुती पानसे सांगतात की "हॅन्ड आय कॉर्डिनेशन हे यात सगळ्यात महत्त्वाचं असतं. सहा वर्षांच्या आधी मुलांना कागदावर रेघोट्या मारता येतात, चित्र काढता येऊ शकतात, रंग भरता येतात पण पेन्सिल नीट धरून अक्षर काढण्यासाठी, एखादं अक्षर पाहून छोट्या बॉक्समध्ये नीट ओळीवर लिहिण्यासाठी आवश्यक नियंत्रण त्यांच्यामध्ये आलेलं नसतं.
 
“मेंदूचा हा विकास होण्याआधी, म्हणजे चौथ्या-पाचव्या वर्षी लेखन सुरू करणं चुकीचं आहे. कारण त्यामुळे मुलांच्या मनगटाच्या स्नायूंवर, डोळ्यांवर आणि मानावरही ताण पडू शकतो. "
 
मुलं शाळेत जातात तेव्हा ती थोडा जास्त वेळ घरापासून दूर राहणार असतात. अशावेळी मुलांना अभ्यास करताना एका जागी काही काळ बसता येणं, तसंच स्वतःला काही झालं तर किमान ते व्यक्त करता येणं गरजेचं असतं.
 
सामााजिक कौशल्य विकसित झाल्याशिवाय मुलांना शिक्षकांशी, मित्र मैत्रिणींशी असा संवाद साधता येत नाही.
 
या गोष्टी जमेपर्यंत लिखाण किंवा पहिलीतल्या फॉर्मल एज्युकेशन ची सुरुवात केली, तर मुलांवर दडपण येऊ शकतं, असं शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर सांगतात.
 
ते म्हणतात, "मी 27 वर्षांत अनेकदा हे पाहिलं आहे की पाच-साडेपाच वर्षांची मुलं भावनिकदृष्टया बहुतेकदा तयार नसतात.
 
“शारीरिक वाढ झालेली नसल्यानं त्यांच्याावर ताण येतो. शिक्षणाविषयी त्यांना भीती वाटू शकते आणि त्या भावनिक असुरक्षिततेचा परिणाम त्यांच्या शिकण्याच्या गतीवर आणि एकंदरीत वाटचालीवरच होऊ शकतो.
 
चासकर असंही नमूद करतात की या उलट सहा वर्ष पूर्ण झाल्यावर पहिलीत आलेली मुलं गतीनं सगळं आत्मसात करू शकतात, त्यांची शैक्षणिक कामगिरी चांगली असते.
 
मला येतंय, जमतंय हा आत्मविश्वास मिळाला, तर ते मुलाांच्या पुढच्या वाटचालीत फायद्याचं ठरतं.
 
परदेशात शिक्षणाची सुरुवात कधी होते?
मुलांना शाळेत कधी घालावे, याविषयी जगभरात तज्ञांनी संशोधन केलं आहे.
 
अमेरिकेतील स्टँनफर्ड विद्यापीठाच्या थॉमस डी आणि हान्स हेन्रिक सीवर्सेटन यांनी केलेल्या अभ्यासानुसार ज्या मुलांनी सहा वर्ष पूर्ण झाल्यावर प्राथमिक शिक्षण सुरू केलं त्यांचा सातव्या आणि अकराव्या वर्षापर्यंतचा मानसिक विकास आणि बौद्धिक वाढ कमी वयात केजीमध्ये जाणाऱ्या मुलांपेक्षा चांगली होती.
 
चीन, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्समध्ये सहा ते सात वर्षांच्या वयात मुलं पहिलीत जातील, अशा हिशेबानंच त्यांना नर्सरीत प्रवेश दिला जातो. अमेरिकेत वेगवेगळ्‌या राज्यांत वेगवेगळी पद्धत आहे, पण साधारणपणे अनेक ठिकाणी सहा वर्षांची अट पाळली जाते.
 
डेन्मार्क आणि फिनलंडसारख्या देशांत तर अनेक पालक मुलं सात वर्षाची झाल्यावरच पहिल्या इयत्तेत जातील असा प्रयत्न करतात.
 
‘मुलांच्या कलानं शिक्षण महत्त्वाचं’
भाऊसाहेब चासकर सांगतात, “भारतात मुलांना जन्मतः पॅरेंटल कस्टडी मिळते, मुलांचे सगळे निर्णय पालकच घेतात. मुलांनी कुठल्या शाळेत आणि कुठल्या मााध्यमाात शिकावं, हे सगळं पालकच ठरवतात. मुलांना विचारून हे निर्णय फारच क्वचितच घेतले जातात. शिक्षकांचाही समज असतो की आम्ही शिकवतो, तेव्हा मुलं शिकतात. पण तसं नसतं. शिक्षण हे मुलांच्या कलाानं व्हायला हवं.”
 
वयाची पाच आणि सहा वर्ष यात एका वर्षाचा फरक असला तरी तो खूप महत्त्वाचा आणि मोठा फरक ठरू शकतो त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत टाकण्याची घाई करू नये असेही तज्ज्ञांना वाटतं.
 
मुंबईतली एक नावाजलेली शाळा असलेल्या बालमोहन विद्यामंदिराचे मुख्याध्यापक आणि गेली 32 वर्षं या शाळेत शिकवणारे सदाशिव पाटील सांगतात, "सहा वर्षं वय झाल्यावर पहिलीत प्रवेश हे धोरण येण्यापूर्वी अनेक वर्षं आधीपासूनच पहिलीच्या प्रवेशासाठीची वयोमर्यादा काटेकोरपणे लावत आलो आहोत.”
 
“जे पालक लवकर प्रवेशाचा आग्रह धरतात आम्ही अशा पालकांचे प्रबोधनवर्ग घेतो आणि मुलांना पहिलीत लवकर टाकण्याची घाई करू नका. मुलांना भले पाचसहा महिने उशीरानं डिग्री मिळेल, पण ते परिपक्व होऊनच शिक्षणात उतरतायत."
 
केवळ लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण नाही, असंही ते नमूद करतात. सहा वर्षांच्या वयात पहिलीत येईपर्यंत अनेक क्षमता विकसित होणं गरजेचं असतं. समूहात चालणं, समूहानं बोलणं, वजन, शरीराचं आकारमान या सगळ्याचा शेवटी सर्वांगीण बौद्धिक विकासाशी संबंध असतो. शिकणं ही आनंददायी प्रक्रिया असायला हवी.”