1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (15:30 IST)

सोलापूरच्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांना चीनमध्ये ‘काळी आई’ का म्हणायचे?

Dr.Kotnis
social media
दिनांक 1 सप्टेंबर 1949 रोजी चीन स्वतंत्र झाला, त्याला 60 वर्षे पूर्ण होत असताना 2009 मध्ये चीनचा आंतरराष्ट्रीय रेडिओ, तेथील आंतरराष्ट्रीय मित्रता संघटना आणि चिनी सरकारी विशेषज्ञ ब्युरो इत्यादींनी संयुक्तपणे चिनी नागरिकांसाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
 
मतदान कशासाठी तर चीनचे सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मित्र कोण, ते निवडण्यासाठी. इंटरनेट, एसएमएस किंवा पत्राद्वारे आपले मत कळवायचे होते.
 
चीन देशाला आणि नागरिकांना गेल्या 100 वर्षांमध्ये युद्ध, नैसर्गिक आपत्ती व इतर संकटांमध्ये ज्या परदेशी मित्रांनी मदत केली, अशा व्यक्तींची नावे सुचविण्यात आली, त्यातून 10 जणांची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मित्र निवडायचे होते. यास चिनी लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 5 कोटी 60 लाख लोकांनी आपली मते नोंदवली.
 
या 10 मित्रांमध्ये महाराष्ट्रातील सोलापूरचे सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची निवड झाली.
 
डॉ. कोटणीसांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये चिनी जनतेने डॉ. कोटणीसांवरील आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली!
 
द्वारकानाथांवरील देशभक्तीचे संस्कार
डॉ. द्वारकानाथ कोटणीसांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी सोलापुरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. हे कुटुंब मूळचे वेंगुर्ल्याचे. जगण्यासाठी सोलापुरात आले. वडील शांताराम हे लक्ष्मी विष्णू कापड गिरणीमध्ये क्लार्क पदावर कामास होते. शांतारामना सार्वजनिक कार्याची आवड होती. सोलापूर नगरपालिकेत ते नगरसेवक, शिक्षण समिती चेअरमन आणि उपनगराध्यक्ष इत्यादी पदांवर निवडून आले होते.
 
द्वारकानाथ सोलापुरातील नॉर्थकोट हायस्कूलमधून 1928 साली मॅट्रिक चांगल्या मार्कांनी पास झाले. नंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ते मुंबईत आले आणि 1936 साली ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून ते एम.बी.बी.एस. झाले व नंतर शल्यचिकीत्सेचा एम. एस. कोर्स ते शिकत होते. त्यांच्यावर घरातूनच सामाजिक जाणिवांचे संस्कार झाले होते.
सोलापुरात 1920 पासूनच स्वातंत्र्य चळवळीचे वारे जोरदारपणे वहात होते. 1930 चे मार्शल लॉ आंदोलन तर सर्व जगात गाजले. देशातील स्वातंत्र्य चळवळीचा आढावा घेतला तर फक्त सोलापुरातील आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिशांना हे शहर लष्कराच्या ताब्यात द्यावे लागले असे दिसते.
 
ब्रिटिश फौजेने जनतेवर अनन्वित अत्याचार केले, गोळीबारात कित्येक निरपराधांचे बळी गेले. जाळपोळीच्या, खुनाच्या खोट्या केसेस घालून येथील चार नेत्यांना फासावर लटकाविले गेले. हे चार हुतात्मे अमर झाले! या प्रखर देशभक्तीचे संस्कार द्वारकानाथांवर निश्चितच झाले आणि आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समाजोपयोगी असे काम करण्याचा त्यांचा निर्धार वाढत गेला.
 
जपानच्या आक्रमणात चिनी सैनिक हतबल
या काळात संपूर्ण जगातच दुसर्‍या महायुद्धाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला होता. जपानमध्ये हिरोहितो या विस्तारवादी राजाची राजेशाही चालू होती. संपूर्ण जगावर किंवा त्यातील जास्तीत जास्त प्रदेशांवर राज्य करण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. चीनमध्ये चॅन्ग कै शेकची जनतेवर जुलुम जबरदस्ती करणारी आमि शेतकऱ्यांचे शोषण करणारी राजेशाहीची, कोमिंगटांगची राजवट सुरु होती. सामान्य शेतकरी भुकेकंगाल होता आणि जमीनदार ऐशोआरामात मग्न होते. याविरुद्ध माओ त्से तुंग, चौ एन लाय, लिऊ शाओ चि इत्यादी तरुण चिनी शेतकऱ्यांची फौज उभी करुन चीनचा मुक्तीलढा सुरु केला होता.
 
एकेकाळी कला, तत्वज्ञान, युद्धशास्त्र, विणकाम आणि औषधे इत्यादींमध्ये संपृक्त असलेल्या चीनची राजेशाही आमि आपसातील संघर्ष यामुळे पूर्ण वाताहात झाली होती. अशातच जपानी साम्राज्यवाद्यांनी दिनांक 7 जुलै 1937 रोजी चीनवर सशस्त्र आक्रमण केले. मग कोमिंगटांग व माओ यांनी आपसात तह केला, युद्ध थांबविले आणि जपान्यांना हुसकावून लावण्यासाठी दोन आघाड्या वाटून घेवून जपानी सेनेशी युद्ध सुरु केले.
 
कोमिंगटांगचे सैन्य भाडोत्री होते. तर माओच्या सैन्यात स्वयंस्फूर्तीने सामील झालेली शेतकऱ्यांची तरणीबांड मुले जपान्यांविरुद्ध पेटून उठून लढत होती. परंतु प्रगत युद्ध तंत्रज्ञान व आधुनिक शस्त्रे असलेल्या जपानी सेनेपुढे चिनी सैनिकांचा निभाव लागत नव्हता. हजारो सैनिक जखमी होत होते, त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस नाहीत, औषधे नाहीत, ऑपरेशन थिएटर व तत्सम काहीच सुविधा नाहीत अशी भयानक अवस्था होती.
स्वातंत्र्याची, मानव मुक्तीची प्रेरणा इतकी जबरदस्त असते याचे प्रत्यंतर तिथे येत होते. शेकडो सैनिक मरत होते, कित्येक जखमी, अपंग होत होते पण नवनवीन तरुण माओच्या सैन्यात भरती होवून जपान्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते.
 
जर्मन महिला पत्रकाराचं ‘ते’ पत्र
त्या काळात भारताप्रमाणेच अनेक देशांमध्ये स्वातंत्र्य चळवळींना उधाण आले होते. चीनमधील दारुण परिस्थिती जगासमोर आणण्याचे काम अॅग्नेस स्मॅडले ही जर्मन वृत्तपत्राची महिला वार्ताहर करीत होती. स्वतःचा जीव धोक्यात घालून अॅग्नेस प्रत्यक्ष युद्ध आघाडीवर राहून माओच्या सैन्याच्या कडव्या प्रतिकाराच्या बातम्या देत होती. अग्नेसने पंडीत जवाहरलाल नेहरूंना 23 नोव्हेंबर 1937 रोजी एक पत्र लिहिले आणि माओच्या सेनेचे कसे हाल होत आहेत, त्यांना मदतीची गरज असल्याचे शेवटी लिहिले.
 
जपानी सैन्याशी मुकाबला करणार्‍या चिनी सैन्याच्या आठव्या पलटणीचे प्रमुख जनरल च्यु तेह यांनीही जगातील अनेक नेत्यांना पत्रे पाठवली आणि वैद्यकीय उपचारांअभावी सैनिक कसे हकनाक मरत आहेत किंवा अपंग होत आहेत, त्याचे वर्णन करुन चीनला औषधे व डॉक्टरांचे पथक पाठविण्याची विनंती केली.
 
जनरल च्यु तेह यांनी असेच एक पत्र पं. नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना 26 नोव्हेंबर 1937 रोजी लिहिले. नंतर मद्रास येथे भरलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटी मिटींगमध्ये यावर चर्चा झाली आणि चीनला एक मेडिकल व्हॅन, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि भारतीय डॉक्टरांचे पथक पाठविण्याचा निर्णय झाला.
 
काँग्रेस नेत्यांनी वृत्तपत्रातून आणि रेडिओवरुन याबाबत भारतीय डॉक्टरांना आणि जनतेस आवाहन केले. चिनी जनतेस भ्रातृभावपूर्वक मदत करण्यासाठी सहा महिने द्यावेत, असे त्या आवाहनात म्हटले होते. द्वारकानाथने हे ऐकले होते, तेव्हापासूनच त्याच्या डोक्यात विचारचक्र जोरात सुरु झाले.
 
या वैद्यकीय पथकात आपली निवड झाली तर मानवतेची सेवा करण्याची अनमोल संधी आपल्याला मिळेल असा विचार करुन द्वारकानाथने त्यासाठी अर्जही केला. निवड समितीचे प्रमुख डॉ. जीवराज मेहता हे पूर्वी जी. एस. मेडिकल कॉलेजचे डीन होते आणि द्वारकानाथची त्यांच्याशी चांगली ओळख होती. त्यामुळे या संधीचा फायदा घेवून आपण चीनला जायचेच असा निर्धार करुन द्वारकानाथने याबाबत वडील शांतारामना पत्राने आपला विचार कळविला.
 
'प्रस्थापित आयुष्य जगण्यापेक्षा ही चालून आलेली अमोल संधी आहे' असे लिहून वडील परवानगी देतील असा विश्वास शेवटी व्यक्त केला. आपला मुलगा डॉक्टर झाल्यानंतर लग्न करेल, सोलापुरात येऊन प्रॅक्टिस करेल आणि येथील लोकांसाठी काम करुन चार पैसेही कमवेल असे कुणाला वाटणार नाही? पण एकदम नकार न देता वडिलांनी पत्राला उत्तर दिले, 'मला बेडरपणा आवडतो, पण हा बिनसरकारी प्रकल्प असल्यामुळे काळजी वाटते. याबाबत खात्री करुन घेण्यासाठी मी मुंबईला येत आहे.'
 
कोटणीसांसोबत आणखी कोण डॉक्टर होते?
शांताराम मुंबईला जावून आले. डॉ. जीवराज मेहता व द्वारकानाथशी चर्चा केल्यानंतर या मोहिमेला राष्ट्रीय काँग्रेस व इतर अनेक संस्थांचे पाठबळ आहे हे त्यांच्या लक्षात आले. वैद्यकीय पथकातील डॉक्टरांची रितसर निवड झाली.
 
डॉ. मोहनलाल अतल (अलाहाबाद) हे पथकाचे नेतृत्व करणार, डॉ. एम.आर. चोलकर (नागपूर) हे पथकाचे उपनेते नेमले गेले, डॉ. बिजयकुमार बसू आणि डॉ. देवेन मुखर्जी हे कलकत्त्याहून येणार होते. आणि या वैद्यकीय पथकात निवडले गेलेले सर्वात तरुण डॉक्टर होते सोलापूरचे डॉ.द्वारकानाथ कोटणीस.
 
चीनला जाण्याचा डॉ. द्वारकानाथाचा निर्धार व मानवतेची सेवा करण्याची त्याची तळमळ पाहूनच डॉ. जीवराज मेहता यांनी त्यांची निवड केली असावी.
 
पथकाला निरोप देण्यासाठी सरोजिनी नायडू उपस्थित
ऑगस्ट 1938 च्या शेवटी सर्व डॉक्टर्स मुंबईत जमा होऊ लागले. मुंबईतील चिनी वकीलातीने या पथकाच्या सन्मानार्थ ताजमहाल हॉटेलमध्ये मेजवानी दिली.
 
एक सप्टेंबर 1938 रोजी रात्रीच्या बोटीने प्रवासाला निघायचे होते. त्या दिवशी संध्याकाळी जीना सभागृह येथे मुंबईच्या काँग्रेस समितीने वैद्यकीय पथकाला निरोप देणेसाठी मोठ्या सभेचे आयोजन केले होते. स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्या सरोजिनी नायडू अध्यक्षस्थानी होत्या.
द्वारकानाथच्या कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. मुंबईतील गिरणी कामगार स्त्री-पुरुष गाणी गात, लेझीम खेळत सभास्थानी आले. आपल्या जोशपूर्ण भाषणात सरोजिनी नायडू यांनी चीनला जाणाऱ्या डॉक्टरांची प्रशंसा केली.
 
या प्रसंगी नायडू म्हणाल्या, “भारत व चीन हे दोन्ही देश आपल्या मानेवरील परकीय सत्तेचे जू झुगारून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, त्यांच स्वातंत्र्य ही आशिया व अफ्रीका खंडात गुलामीत खितपत पडलेल्या इतर राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची पहाट ठरेल.”
 
बोटीने सिंगापूरमार्गे 15 दिवसांनी चीनच्या भूमीवर पोहोचले
मध्यरात्री हे पथक एस.एस.राजपुताना या बोटीने निघाले. त्यांना निरोप द्यायला स्वतः सरोजिनी नायडू, श्रीमती कृष्णा हाथीसिंग, श्री. हाथीसिंग, बॉम्बे क्रॉनिकलचे संपादक श्री. एस. ए. ब्रोलवी, मुंबईतील चिनी कॉन्सुलेट, विद्यार्थी इत्यादी मोठ्या संख्येने हजर होते.
 
राजपुताना बोट गोवा मार्गे कोलंबो, नंतर मलाक्काच्या समुद्रधुनीतील पेनांग, सिंगापूर मार्गे 15 दिवसा नंतर हाँगकाँगला पोहोचली. नंतर कॅन्टन. कॅन्टनमध्ये फिरताना अर्धवट पडलेली, बॉम्बहल्यात उद्ध्वस्त झालेली घरे त्यांना दिसू लागली. त्यात राहणाऱ्या लोकांचा आक्रोश वैद्यकीय पथकाने ऐकला.
 
प्रत्यक्ष युद्ध आघाडीवर जावून रुग्णसेवा करण्यासाठी भारतीय डॉक्टर्स आतुर झाले होते. उत्तरेकडे येनानजवळ जनरल च्यु तेह यांच्या नियंत्रणात मुक्ती फौजेची आठवी पलटण जपान्यांचा चिवटपणे प्रतिकार करीत होती. वैद्यकीय पथकाला येनानला पोहोचायचे होते.
 
बॉम्बहल्यामुळे उद्ध्वस्त झालेले रस्ते, अर्धवट जुळलेली घरे, रस्त्यावर पडलेली प्रेते दिसत होते. खुप खडतर प्रवास होता. गावे रिकामीच होती. जपानी सेनेच्या ताब्यात जाण्याऐवजी तेथील माणसे एकत्र स्थलांतर करीत होती किंवा मरण पत्करत होती. वाटेत मिळेल ते खायचे, तेही चिनी पध्दतीचे. दुसरा पर्यायच नव्हता.
 
पंडित नेहरूंनी भारतीय डॉक्टरांच्या पथकाला पाठवलं गिफ्ट
भारतीय डॉक्टर्स प्रथम हॅन्कोला पोहोचले, तेथील छोट्या लष्करी हॉस्पिटल मध्ये त्यांनी काही दिवस काम केले. तिथे वैद्यकीय उपचाराच्या काहीच सोयी नव्हत्या. युद्धआघाडी लांब होती आणि तिथे रुग्णवाहिका नव्हत्या. त्यामुळे जखमी झालेल्या सैनिकांना चालत किंवा खेचरावरुन कसेबसे या हॉस्पिटलपर्यंत पोहोचत असत. जास्त जखमा झालेले सैनिक वाटेतच मरत होते. दररोज शेकडो जखमी सैनिक इथे दाखल होत.
 
एका खोलीत असंख्य रुग्ण अक्षरशः कोंबलेले असत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय डॉक्टरांनी जे शक्य होते ते काम केलेच. परंतु या पथकाला हॅन्को लक्षात राहिले ते जर्मनची युद्ध वार्ताहर अॅग्नेस स्मॅडले आणि चौ एन लाय यांच्या भेटीमुळे.
 
जपानी आक्रमणाविरुद्ध जनमत संघटित करण्याची जबाबदारी चौ एन लाय यांच्यावर होती. अग्नेसशी झालेल्या चर्चेमुळे त्यांना येनानजवळ चाललेल्या युद्धाबद्दल तपशील समजला.
 
जपानच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सेनेसमोर चीनी सैनिकांचा निभाव लागणार नाही असे जपानला वाटत होते. परंतु, स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असणारी चिनी सैनिकांची मनगटे चिवटपणे झुंज देत होती. जखमी झालेल्या चिनी सैनिकांचा जागेवर लगेच तरुण दाखल होत होता. कधी मालमोटारीने तर कधी खेचराच्या गाडीवरुन तर कधी जपान्यांचा वेढा चुकविणेसाठी रात्री चालतही या पथकाला पुढे प्रवास करावा लागे. येनानला जायचा त्यांचा पक्का निर्धार होता.
 
चुकींगला ते पोचले. इथे काहीच काम नव्हते. 2 ते 3 दिवस ते थांबले. भारतातून पाठविलेली रुग्णवाहिका, वैद्यकीय सामान असलेली मालमोटार चुकीच्या पोचल्या होत्या. पंडीत नेहरूंनी या पथकासाठी नवीन वर्षाची भेट म्हणून एक ग्रामोफोन आणि 25 ध्वनिमुद्रिका पाठविल्या होत्या, ते पाहून सर्वच डॉक्टरांना खुप आनंद झाला.
 
वडिलांच्या निधनानंतर म्हणाले, ‘मृत्यूचे तांडव रोजच बघतोय’
इकडे हे वैद्यकीय पथक प्रवासात असतानाच तिकडे भारतात द्वारकानाथांचे वडील शांताराम कोटणीस यांचे दु:खद निधन झाले. ही बातमी त्याला कशी सांगायची असा प्रश्न घरच्या लोकांना पडला. मग मोठ्या भावाने डॉ. चोलकरांना पत्र लिहिले आणि हळुवारपणे ही बातमी द्वारकानाथला सांगण्याची विनंती केली. डॉ. चोलकरांनी तसेच केले.
 
कोटणीसांनी भावाला पत्र लिहिले, त्यात ते लिहितात, “ही बातमी सहन करणे मला फारसे अवघड गेले नाही. कारण इथे निरपराध माणसांच्या मृत्यूचे तांडव मी रोजच बघतोय. आपल्या आईचे दुःख फार मोठे आहे. तू धीर देशील अशी मला खात्री आहे. तुला मी काहीच मदत करु शकत नाही याचे मला अती दुःख होत आहे.”
 
चीनमध्ये येवून चार महिने झाले होते. उत्तरेकडे येनानला जाताना थंडी खुप जाणवू लागली होती. आजूबाजूला बर्फ दिसू लागला. परंतु वैद्यकीय पथकाचा निर्धार पक्का होता. अनेक दिवस खडतर प्रवास करुन हे पथक अखेर येनानला पोचले. भारतीय डॉक्टरांचे प्रचंड उत्साहात स्वागत झाले. रस्त्याच्या दुतर्फा सैनिक, शेतकरी, स्त्रिया आणि मुले गर्दीने उभी होती. कित्येकांच्या हातात 'भारतीय वैद्यकीय पथकाचे स्वागत असो' असे लिहिलेले कार्ड्स होते. या स्वागताने डॉक्टर्स भारावून गेले.
 
उद्ध्वस्त येनानमध्ये आणि माओंच्या घरी
मूळ येनान गाव जपानी बॉम्बहल्यांनी उद्ध्वस्त झाले होते. रस्ते अस्तित्वात नव्हते, तपमान शून्य अंशाखाली. नदी, नाले गोठून जायचे. रात्री तर जीव गारठून टाकणारी थंडी. बर्फ वितळायला लागले की सगळीकडे चिखल होई. घोड किंवा खेचर यावरूनच गंभीर रुग्णांना पहायला जावे लागे.
 
भारतीय डॉक्टरांना याची सवय झाली. डॉ. कोटणीस तर उत्तमपैकी घोडेस्वार बनले. सर्वच घरे जमीनदोस्त झाली होती. मग लोकांनी, सैनिकांनी सभोवतालचे डोंगर खोदून 'गुहाघरे' तयार केली होती. दुकानेसुद्धा अशीच खोदलेली. शासकीय कचेऱ्या, शाळा, इस्पितळे अशा खोदलेल्या घरांमध्येच होते त्यामुळे बॉम्बहल्याचा काहीच परिणाम होत नसे.
 
माओ त्से तुंग, चौ एन लाय असे नेतेसुद्धा खोदलेल्या घरातच रहात होते. एकदा माओनी सर्व डॉक्टरांना घरी भेटायला यायचे निमंत्रण दिले. तिथे पुस्तकाचे दोन रॅकस्, साधी विटांची पोकळ कॉट होती. या पोकळीमध्ये पेटलेले कोळसे ठेवले की ती कॉट गरम रहात असे.
 
माओंनी भारतीय डॉक्टरांबरोबर हसत खेळत चर्चा केली. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या बद्दल चौकशी केली. माओंची साधी राहणी व त्यांच्या मोकळ्या वागण्याने भारतीय डॉक्टर्स भारावून गेले. एकदा चौ एन लाय घोड्यावरून जात असता ते पडले व उजवा हात फॅक्चर झाला भारतीय डॉक्टरांनी त्या हाताला प्लास्टर घातले. काही दिवसांनी प्लास्टर काढण्यासाठी डॉ. अटल, डॉ. बसू व डॉ. कोटणीस त्यांच्या घरी चालले होते. वाटेत चिखल व दलदलीत तिघेही चिखलात पडले. कसेबसे तिघेही पोचले. तिथे माओसुद्धा होते. त्यांचे खराब कपडे बघून काय झाले असावे याची सर्वांना कल्पना आली. माओ आपल्या दोन्ही मांड्यांवर थोपटत म्हणाले, “मी नेहमी माझ्या या दोन घोड्यांवर अवलंबून असतो व ते माझा कधीच घात करीत नाहीत!”
 
येनान व परिसरातील 50 मैलांच्या टापूतील काही दवाखान्यांना गरज लागली की भारतीय डॉक्टर्स तिथे जात आणि औषधोपचार, शस्त्रक्रिया करीत असत. 15 मैलांवरून एका हॉस्पिटलचे रुपांतर आदर्श हॉस्पिटल मध्ये करण्याची जबाबदारी भारतीय डॉक्टरांवर सोपविण्यात आली होती. स्थानिक लोक, तंत्रज्ञ यासाठी पडेल ते काम करीत होते. डोंगरात 25 गुहा खोदून त्यात 200 खाटांची सोय करण्यात आली. परिचारिकांना शिकविण्याचेही काम भारतीय डॉक्टरांनी केले.
 
काही चिनी डॉक्टर्स त्यांच्याबरोबर काम करीत होते. एका महिन्यात त्यांनी 55 शस्त्रक्रिया केल्या. पंडीत नेहरूंना 24 मे 1939 रोजी पाठविलेल्या एका पत्रात माओंनी भारतीय डॉक्टरांच्या कामाची खुप प्रशंसा केली आहे.
 
खराब हवामान, चांगल्या अन्नाची कमतरता व अपार कष्ट यामुळे वयोवृद्ध डॉ. चोलकर यांची प्रकृती ढासळली. डॉ. मुखर्जीना किडनीचा विकार जडला. त्यामुळे दोघेही डॉक्टर भारतात परतले.
 
डॉ.नॉर्मन बेथ्युन हे कॅनडाचे जगप्रसिद्ध असे सर्जन होते. फॅसिस्ट शक्तीविरुद्ध लढणाऱ्या सैनिकांना मदत करण्यासाठी ते धावून जात. जपानने चीनवर आक्रमण केल्याचे समजताच चिनी मुक्ती सेनेशी संपर्क साधून ते चीनमध्ये धावून गेले व जखमी सैनिकांवर लगेच उपचार करायला त्यांनी सुरवातही केली. प्रत्यक्ष युद्धभूमीवर रुग्णवाहिका घेवून ते जायचे व स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक जखमी सैनिकांचे प्राण त्यांनी वाचविले. डॉ. बेथ्युन यांची युद्धभूमीजवळ भेट होणार म्हणून भारतीय डॉक्टरांना आनंद झाला होता. परंतु एका जखमीवर तातडीने हॅन्डग्लोवज न घालता शस्त्रक्रिया करताना त्यांचे एक बोट कापले गेले, त्यात जंतूसंसर्ग झाला व त्यातच त्यांचा अंत झाला. डॉ. बेथ्युन यांनी उभे केलेल्या हॉस्पिटलला 'आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटल' असे नाव ठेवले होते.
 
मुक्ती सेनेच्या आठव्या तुकडीचे प्रमुख जनरल च्यु तेह यांची तार आली 'भारतीय डॉक्टरांची इथे गरज आहे, तरी इकडे यावे' येनानच्या उत्तरेकडे घनघोर युद्ध चालू होते. डॉ. अटल, बसू व कोटणीस लगेच निघाले. प्रथम सिआन व पुढे युद्धभूमीजवळ असा खडतर प्रवास. मिळेल त्या वाहनाने कधी जपान्यांचा वेढा चुकवत रात्री 25 मैल चालत ते ठिकाणावर पोचले दुसर्‍या दिवशी डॉक्टरांनी कामाला सुरुवात केली. तेथून जवळच युद्ध चालू होते. जखमी सैनिकांवर उपचार सुरु झाले. प्रचंड थंडी, निकृष्ट आहार व रोज भरपूर चालल्यामुळे डॉक्टर आजारी पडू लागले. तशात डॉ. अटल यांना त्वचारोग जडला व काही केले तरी बरा होईना. शेवटी ते मार्च 1940 मध्ये भारतात परतले.
 
कोटणीसांनी तिथंच थांबण्याचा निर्णय घेतला
हे वैद्यकीय पथक सहा महिन्यांसाठी आले होते, पण तेथील दारुण परिस्थिती पाहून आपली इथे गरज आहे हे लक्षात घेवून डॉ. कोटणीस व डॉ.बसूंनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. जखमींवर वेळीच उपचार केल्यामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले, अनेकजण कायमचे अपंग होण्यापासून वाचले. कधी त्यांच्या चेहर्‍यावर थकवा दिसला नाही.
 
उत्तर चीनमध्ये अनेक चीनी तुकड्या जपान्यांविरुध्द चिवटपणे लढत होते. सर्व जखमींवर उपचार करण्यासाठी कोटणीस व बसू यांना दुरवर रोज चालावे लागे. या वेळेपर्यंत कोटणीस व बसू उत्तम चीनी भाषा बोलू लागले होते. चीनी शेतकऱ्यांना त्यांच्या अहोरात्र चाललेल्या कामाचे खुपच अप्रूप वाटे. इथे गनिमी सैनिक तयार करण्याचे मोठे केंद्र होते. हे गनिमी सैनिक जपानी सेनेवर कुठून, केव्हा येवून हल्ला करतील याचा नेम नसे. त्यांनी जपानी सेनेस जेरीस आणले होते.
 
डॉ. बसू आणि कोटणीसांनी काही काळ एकत्र काम केल्यानंतर वेगवेगळे काम करुन जास्त जखमी सैनिकांवर उपचार करण्याचे ठरवले. कोटणीस ज्या फौजेच्या तुकडी बरोबर गेले होते, त्या भागात 13 दिवस घनघोर युद्ध झाले. कोटणीसांनी 800 जखमींवर उपचार केले, त्यापैकी 558 जणांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. युद्ध दिवसरात्र सतत चालूच होते, जखमी सैनिकांना तिथे लगेच आणले जात होते.एकदा तर कोटणीसांनी अजिबात विश्रांती न घेता सलग 72 तास काम केले.
 
डॉ. कोटणीस फौजेच्या ज्या तुकडी बरोबर काम करीत होते, त्याचे सेनापती जनरल निए होते. कोटणीसांचे अहोरात्र चाललेले काम त्यांनी जवळून पाहिले होते. त्यांची कामावरील निष्ठा व मानवतेवरील प्रेम यामुळे निए खुपच प्रभावित झाले होते. या भागातील डॉ. बेथ्युन यांनी उभारलेले हॉस्पिटल नष्ट झाले होते. तिथेच नवीन हॉस्पिटल उभे करण्याच्या हालचाली सुरु होत्या.
 
तसेच, मेडिकल स्कूलमध्ये शिकविण्यासाठी युद्धातील कामाचा अनुभव असलेले डॉक्टर हवे होते. या दोन्ही कामासाठी डॉ. कोटणीस हेच योग्य आहेत असे जनरल निए यांनी वरच्या अधिकाऱ्यांना कळविले होते. ही गोष्ट कोटणीसांच्या कानावर गेली, ते ऐकून ते खुपच आनंदी व उत्साहित झाले.
 
आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटलच्या पहिल्या संचालकपदी
डॉ. बसूंवर सुद्धा येनानमध्ये अधिक जबाबदारी देण्याचे ठरत होते. आतापर्यंत डॉ. बसू आणि कोटणीसांनी मिळून काम केले होते, आता त्यांची ताटातूट होणार होती. सर्व सुख दुःखात दोघे एकत्र होते. मुख्य म्हणजे भारतात परतणे अनिश्चित काळ लांबणार होते. कोटणीस व बसूंनी आपली संमती कळवली.
 
डॉ. बसू येनानकडे रवाना झाले. तेथील मुख्य हॉस्पिटलमध्ये मुख्य सर्जन म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली. डॉ. बेथ्युन यांनी उभारणी केलेल्या हॉस्पिटलला 'आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटल ' असे नाव देण्यात आले व त्याचे पहिले संचालक म्हणून डॉ. कोटणीसांची नेमणूक झाली.
 
आराखडा बनवून एक सुसज्ज हॉस्पिटल उभारणे या कामास त्यांनी सुरुवात केली. तसेच यासाठी लागणारे डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांना शिकवून तयार करण्याच्या कामासही ते लागले. एक दोन दिवसांच्या सुचनेने कधी कधी 300 ते 500 रुग्णांची सोय करावी लागे. अशावेळी आजूबाजूच्या गावातील शेतकरी, कारागीर इत्यादी सर्वच जण मदतीला येत.
 
साफसफाई, पाणी भरुन ठेवणे, गवताचे बिछाने तयार करणे, जास्त लागणारी भांडी देणे आदी कामे स्वयंस्फूर्तीने लोक करीत. पूर्वी येथे एकाला एक लागूनच अशी रुग्णांची व्यवस्था होती. कोटणीसांना ही पद्धत अस्वच्छ वाटली. मग प्रत्येक रुग्णाला वेगळी कॉट तयार करुन दोन कॉटमध्ये अंतर ठेवण्यात आले. गरजेप्रमाणे विटा व मातीने पोकळ अशा कॉटस् लगेच तयार करुन दिल्या जात. याच ठिकाणी कोटणीसांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या, त्यात काही अवघडही असत.
 
एका खेडुताच्या डोक्यात गोळी आतपर्यंत घुसली होती. कितीतरी दिवस तो बेशुद्ध होता. कोटणीसांनी ही अवघड शस्त्रक्रिया केली व त्याचे प्राण वाचविले. मेडिकल कॉलेजची जबाबदारीही कोटणीसांवर होती. शालेय शिक्षण पूर्ण केलेली 700 शेतकऱ्यांची मुले तिथे शिक्षण घेत होती. आधुनिक वैद्यकीय ज्ञान असलेले 15 शिक्षक तिथे होते. सर्व प्रकारची औषधे संशोधन करुन तिथेच तयार केली जात. परंतु आयोडीन व मलेरीया वरील क्विनाईन यांचे मात्र उत्पादन करता येत नव्हते, या दोन्ही औषधांची टंचाई होती, त्यामुळे ती जपून वापरावी लागत.
 
तो चिंग लान हिच्याशी लग्न
डॉ. कोटणीस या सर्व गोष्टींकडे लक्ष देत व आवश्यक असतील तर काही सूचनाही करीत असत.लोकांमध्ये दंतरोगाचे प्रमाण जास्त होते. पूर्वी उत्तर चीनमध्ये काम करीत असताना तेथील डॉ. ली या दंतवैद्याची ओळख होती तेव्हा कोटणीसांनी ली यांना बोलावून घेतले. नंतर ली हे त्यांचे जीवलग मित्र बनले. डॉ. ली यांची पत्नी नर्सचे काम करीत. त्यांची नर्सिंग विभाग प्रमुख को चिंग लाहिच्याशी दाट मैत्री होती.
 
को चिंग लान ही एका ख्रिश्चन व्यापाऱ्याची मुलगी. परिचारिकेचे शिक्षण घेवून ती एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करीत होती. पेकिंगमध्ये असताना तीला राजेशाहीचा वाईट अनुभव आला. सामाजिक जाणीव असल्यामुळे तीने नोकरीचा राजीनामा दिला व ती सरळ मुक्ती सेनेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.
भारतीय वैद्यकीय पथक इथे आल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत झाले, त्यावेळी डॉ. कोटणीसांनी केलेले भाषण ऐकून ती खूपच प्रभावित झाली होती. दूरवरून इथे आलेला भारतीय चीनच्या दुःखाशी समरस झालाय हे तिला जाणवले. नंतर दोघांचा कामानिमित्त सहवास वाढत गेला. दोघांचे सुर जुळले व दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला. तेथील सहकार्यांना व सैनिकांना खुप आनंद झाला.
 
कोटणीसांना ‘काळी आई’ नावं कसं पडलं?
25 नोव्हेंबर 1941 रोजी दोघे विवाहबद्ध झाले. सर्व विद्यार्थी, सहकारी, सैनिक व गावकरी यावेळी हजर होते. लग्नानंतर या जोडप्याने विश्रांती अशी घेतली नाही. विवाहामुळे कोटणीसांचा उत्साह वाढला. त्यांचे सहजीवन सुरु झाले. दोघांनीही एकमेकाची काळजी घ्यायला सुरवात केली.
 
वेळ मिळेल तसे कोटणीस चिनी भाषेत शस्त्रक्रियेवर एक पुस्तक लिहीत असत. कामातच दोघांचा आनंद होता. सकाळी व्यायाम मग नाष्टा, वैद्यकीय विद्यार्थ्यांचे दोन क्लास, नंतर सर्व हॉस्पिटलमध्ये एक फेरी झाल्यानंतर रुग्णांवर उपचार त्यात गरज असेल तर शस्त्रक्रिया ते करीत. उपकरणे निर्जंतुक केली की नाहीत यापासून ते कुठल्या रुग्णाला उशी द्यावी, कोणाला पायाखाली कुशन द्यायला हवे अशा बारीकसारीक गोष्टी स्टाफ व विद्यार्थ्यांच्या ते लक्षात आणून देत. सर्वांनीच ते अतिशय प्रेमळ भाषेत व आत्मियतेने संवाद साधत असत. रुग्णांना तपासायला चालत जाणे तर रोजचेच होते.
 
एकदा असेच निर्मनुष्य व उध्वस्त झालेल्या गावातून जात असताना महिलेचा कण्हण्याचा आवाज त्यांनी ऐकला. त्यांनी जवळ जावून बघितले तर एक महिला बाळंत होणार आहे व वेदनांनी तिथेच पडली आहे. सर्व लोक शत्रूच्या भितीने गाव सोडून गेले आहेत, नवरा गनिमी तुकडी बरोबर गेल्याचे त्यांना समजले. तिला तसेच सोडले तर ती मरेल हे ओळखून कोटणीसांनी तिला इतरांच्या मदतीने झोळी तयार करुन त्यातून जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलविले व रात्री शस्त्रक्रिया केली. गोंडस बाळाला तीने जन्म दिला.
 
भारतात परतण्याची इच्छा अपूर्ण राहिली...
अशा प्रेमळ वागण्यामुळेच चिनी जनतेने त्यांना 'काळी आई' असे संबोधित असे. पत्नी को चिंग लानची शक्य ती काळजी ते घेत असत. काही दिवस तिला सुट्टी घ्यायला लावली. त्यांना मुलगा झाला. नाव इंगव्हा असे ठेवले. इंग म्हणजे भारत व व्हा म्हणजे फूल किंवा चीन. मुलाचा चेहरा भारतीय पण रंग गोरा होता. तेथील सर्व जणांनी जल्लोष केला. कोटणीसांना पत्नी व मुलाला घेवून भारतात जायचे होते. तिथे गेल्यावर पुढील आखणी ते करणार होते.
 
परंतु दुसरे महायुद्ध वाढत चालले होते. जपानने पर्ल हार्बर वर हल्ला केला. नंतर हाँगकाँग पडले, सिंगापूरने शरणागती पत्करली. ब्रह्मदेशाचा पाडाव करण्यात आला. परिणामी भारतात परतण्याचे सर्व मार्ग बंद झाले. मग कोटणीसांनी तिथेच राहून काम करु व काही काळाने याबाबत निर्णय घेवू असे ठरविले. शिवाय त्यांची प्रकृतीही बिघडत चालली होती. थंडी व ताप वारंवार येवू लागला. काळजी करण्याची बाब म्हणजे काही वेळेस तापात त्यांना झटके येवू लागले.
 
प्रथम हे कोणाच्या लक्षात आले नाही, पण को चिंग लान ने इतर डॉक्टरांना बोलाविले. ते एपिलपसी चे झटके होते. डॉक्टरांनी कोटणीसांना औषधे दिली, त्यामुळे काही वेळ झोप येत असे. विश्रांतीचा सल्ला दिला तरीही कोटणीस काम करीतच राहिले. 8 डिसेंबर 1942 च्या रात्री असेच एकामागोमाग एक असे तीव्र झटके यायला त्यांना सुरुवात झाली आणि 9 डिसेंबर 1942 रोजी सकाळी 6.15 वा. त्यांचे दुःखद निधन झाले.
आधुनिक चीनचे शिल्पकार डॉ. सन येत सेन यांच्या पत्नी मादाम सुंग चिंग लिंग आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “डॉ. कोटणीसांची स्मृती ही केवळ भारतीय आणि चिनी जनतेचा अमोल ठेवा आहे असे नाही, तर मानवजातीच्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रगतीसाठी झगडणाऱ्या सर्व योद्ध्यांच्या यादीत त्यांचे नाव अजरामर राहील.”
 
माओ आपल्या हस्ताक्षरात लिहिलेल्या शोकसंदेशात म्हणतात, “जपानविरोधी युद्धातल्या सर्वात कठीण काळामध्ये जेव्हा आम्हाला वैद्यकीय सेवेची अत्यंत गरज होती, तेव्हा दूरवरील भारतातून येवून त्यांनी इथे मानवतावादी भूमिकेतून फार मोठे कार्य केले. चिनी जनतेच्या अंतःकरणात ते सदैव जीवंत राहतील.”
 
म्हणूनच आंतरराष्ट्रीय मानवतावादी डॉ. कोटणीस अशी त्यांची प्रतिमा तयार झालेली आहे.
 
या लेखासाठी खालील संदर्भ वापरण्यात आले :
 
...and one did not come back (K. A. Abbas)
Call of Yanan (Dr. B. K. Basu)
समर्पण : डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची जीवनगाथा (ले. मंगेश शांताराम कोटणीस)
My Life With Kotnis (Qinglan Guo)
 
Published By- Priya Dixit