1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (08:22 IST)

सरसकट गुन्हे मागे घेणार नाही

devendra fadnavis
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील करत असलेल्या उपोषणस्थळी जालना पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर आंदोलनाचा भडका राज्यभर उडाला. या घटनेवरून आज पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विधानसभेत लेखी उत्तरात त्या दिवशी घडलेल्या घटनेचा तपशील सादर केला. त्याचबरोबर निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिका-यांची आणि केलेल्या कारवाईची माहिती दिली.
 
देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या घटनेत जवळपास ५० आंदोलक जखमी झाले असून ७९ पोलिस जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. यात पोलिस सर्वाधिक जखमी झाल्याचे फडणवीस यांच्या निवेदनावरून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीमारानंतर गुन्हे दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, यासाठी सातत्याने सरकारकडे मागणी केली आहे. मात्र, या संदर्भात फडणवीस यांनी कोणत्याही पद्धतीने गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार दिली. सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.