मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (08:14 IST)

सुनावणी संपली, लेखी प्रतिज्ञापत्र द्या

ajit panwar sharad panwar
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचे यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेली आजची सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला आहे. दोन्ही गटांच्या वतीने एका आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश देण्यात आला. आज अजित पवार गटाकडून मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला तर शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला.
 
राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात सुरू असलेला आजचा युक्तिवाद संपला. निवडणूक आयोगाने निर्णय राखीव ठेवला. आमची मते लेखी स्वरूपात द्यायला सांगितले आहे. आता निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती असल्याचे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले. अजित पवार गटाने सांगितले की, संघटनेचे मत विचारात घेऊ नका. यावरून त्यांच्याकडे संघटना नाही. हे त्यांच्या हरण्याचे द्योतक असल्याचे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. संविधानातील त्रुटी आणि इतर गोष्टी त्यांनी आधी सांगितल्या नव्हत्या, असे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. एकीकडे सांगता २०१९ पासून वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही पद घेता त्यावेळी काही बोलत नाहीत, असे मत अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केले. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना विधान परिषदेची नोटीस
नागपूर : शिवसेना कोणाची? हा वाद शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वर्षभरापासून सुरू आहे. आता याच मार्गावरून राष्ट्रवादी कोणाची, असा वाद रंगला आहे. आता या दोन्ही पक्षांची कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी आज विधान परिषदेकडून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सात दिवसांत उत्तर सादर करण्याचे आदेश या नोटिसांमधून देण्यात आले आहेत.
 
संघटन शरद पवारांच्या बाजूने : आव्हाड
२०१९ मधला शपथविधी हे फुटीचे उदाहरण होते. मात्र, तेव्हा ५४ आमदारांचे पत्र चोरल्याचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी राजीनामा दिला नाही. निवडणूक आयोगाला जे पत्र आले आहे, त्यावर तारीख नाही. ३० तारीख दाखवा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.