रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (20:05 IST)

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी: ठाकरे गटाचा 'तो' व्हिप बोगस, शिंदे गटाचा दावा

eknath shinde uddhav thackeray
उद्धव ठाकरे गटाने 21 जूनला बजावलेला व्हीप हा बोगस असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला.
 
आज (22 नोव्हेंबर) विधिमंडळात झालेल्या सुनावणीदरम्यानही जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्या साक्षीदरम्यान व्हीपवरून अनेक प्रश्न विचारले.
 
व्हीपवरची तारीख-वेळ, सदस्यांची नावं यावरूनही खडाजंगी झाली.
 
आजच्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना महेश जेठमलानी यांनी म्हटलं की, 21 तारखेला व्हीप बजावल्याचा त्यांचा दावा बोगस आहे.
 
21 तारखेला व्हीप बजावूनही आमदार आले नाहीत, या आधारावर त्यांची अपात्रतेचा दावा उभा आहे. मात्र आम्ही आता उलटतपासणीत या व्हीपवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, असं जेठमलानी यांनी म्हटलं.
 
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात मंगळवारी (21 नोव्हेंबर) पहिली साक्ष पार पडली.
 
ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष झाली. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर महाराष्ट्राच्या विधानसभेत 25 सप्टेंबर सुनावणीला सुरुवात झाली.
 
विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद सादर केला आहे. त्यानंतर आज सुनील प्रभू यांची साक्ष झाली.
 
ठाकरे गटाच्या वकिलांनी साक्ष वाचून दाखवली. ही साक्ष विधीमंडळाकडून टाईप केली गेली.
 
त्यात कुठलीही चूक होऊ नये, म्हणून विधीमंडळाकडून सुरु असलेली टायपिंग दिसण्यासाठी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे.
 
शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या वेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालिन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर केले गेले.
 
शिंदे मुख्यमंत्री झाले असता माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याही ठाकरे गटाकडून सादर करण्यात आल्या.
 
व्हिप कोणाचा आहे यायाबाबतचा मेल, अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र, हे सगळे पुरावे ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले.
 
ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले पुराव्यांची नोंद अध्यक्षांनी करून घेतली.
 
ठाकरे गटाचं म्हणणं काय आहे?
शिंदे गटाकडून कुठल्याही गोष्टीवर आक्षेप घेण्यात येतोय. त्यामुळे त्यांच्याकडून काय आक्षेप घेतले जात आहेत ते कळण्यासाठी आणि ते रेकॉर्डवर येण्यासाठी या सुनावणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा अशी मागणी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केली.
 
सुनील प्रभू यांनी सादर केलेल्या पुराव्यांची माहिती ठाकरेंचे वकील देत होते. शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला की, सुनील प्रभू यांनी माहिती द्यायला हवी.
 
प्रभू मराठीमध्ये महिती देत होते. त्यावर ते ट्रान्सलेट करण्यासाठी वेळ जाईल, असं कामत यांच्याकडून सांगण्यात आलं. यात सुनावणीचा वेळ जात असल्याचं कामत म्हणाले.
 
प्रभू हे साक्षीदार आहेत आणि ठाकरे गटाचे वकील त्यांना डिक्टेकट करत असल्याचा आक्षेप शिंदे गटाकडून घेण्यात आला. त्यावर मी दुपारनंतर मी साक्षीसाठी वेगळीकडे बसण्याची व्यवस्था करिन असं अध्यक्ष म्हणाले.
 
शिंदे गटाने सुनील प्रभूंना काय विचारलं?
शिंदे गटाच्या वकिलांकडून प्रभूंची उलटतपासणी उद्धव ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू हे या सुनावणीत मराठीत प्रश्नांची उत्तरं देत होते आणि विधानसभा अध्यक्ष प्रत्येक शब्दाचं इंग्रजीत भाषांतर करून मग ते टाइप होतंय.
 
सुनील प्रभूंनी मराठीमध्ये प्रश्न विचारण्याची मागणी केली.
 
त्यावर त्यांना उलट प्रश्न विचारताना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी तुम्ही आमदार अपात्रतेबाबत याचिका या इंग्लिशमध्ये दाखल केले हे सत्य आहे का? असा प्रश्न विचारला.
 
प्रभू यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, हो, मी इंग्लिशमध्येच याचिका दाखल केली आहे. मी वकिलांना हिंदी आणि मराठीमध्ये सांगितलं. मी त्यांना याचिकेत काय लिहायचं ते सांगितलं. त्यांनी ही याचिका इंग्रजीमध्ये मांडली त्यानंतर मी समजून घेतल्यावर त्यावर सही केली.
 
जेठमलानी यांनी पुढे विचारलं की, तुमच्या वकिलांनी अपात्र याचिकेवर तुम्ही सही करण्यापूर्वी इंग्लिशमध्ये वाचून दाखवली का ?
 
यावर प्रभूंनी सांगितलं की, मला इंग्लिशमध्ये वाचून दाखवण्यात आली, मी त्याचा शब्दश: मराठीमध्ये अर्थ समजून घेतला.
 
त्यावर प्रतिप्रश्न करताना जेठमलानींनी म्हटलं की, तुम्ही अपात्राता याचिकेमध्ये असं कुठंही म्हटलं नाही की तुम्ही या याचिकेत जे लिहिलं आहे ते तुम्हाला मराठीमध्ये समजावण्यात आलं आहे.
 
मी जे काही बोललो ते रेकोर्डवर असल्याचं प्रभू यांनी म्हटलं.
 
तुम्हाला शपथपत्र न समजवता सही करण्यात आलीये, असं जेठमलानी यांनी म्हटलं.
 
हे शक्य नाही, मी आमदार आहे. 2 ते 3 लाख लोकांनी मला निवडून दिलं आहे. मी माझ्या भाषेत समजावून घेतलं आणि मग सही केली, असं उत्तर प्रभू यांनी या आक्षेपावर दिलं.
 
18 नोव्हेंबर 23ला जे तुम्ही शपथपत्र दिलं इंग्लिशमध्ये आहे का ? या जेठमलानांच्या प्रश्नावर प्रभू यांनी होकारार्थी उत्तर दिलं.
 
‘मी विकास कामांवर लढलो’
2019 च्या विधानसभा निवडणूक प्रचारात एनसीपी आणि काँग्रेसवर तुम्ही हल्ला चढवला नाही? असा प्रश्नही जेठमलानींनी सुनील प्रभूंना विचारला.
 
त्यानंतर ठाकरे गटाकडून ‘हल्ला’ शब्दावर आक्षेप घेतला. त्यावर जेठमलानी यांनी हे आक्षेप अनाकलनीय असल्याचं म्हटलं.
 
प्रभूंनी यावर म्हटलं की, मी माझ्या मतदारसंघात केलेल्या विकास कामावर लढलो. त्यामुळे माझ्यावर त्यांच्यावर हल्ला किंवा आरोप करण्याची वेळच आली नाही.
 
हे प्रश्नाचे उत्तर नाही. कुठलाच हल्ला केला नाही ? हो किंवा नाही? असं जेठमलानींनी म्हटल्यावर सुनील प्रभूंनी उत्तर दिलं की, मी माझ्या विरोधकांवर हल्ला करण्याची वेळच आली नाही. मी विकासकामांवर प्रचार केला.
 
यानंतर विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं की, पुन्हा तोच प्रश्न आहे की शासनाच्या कामाचा उल्लेख केला ?
 
प्रभू यांनी म्हटलं की, शासनाकडून आलेल्या निधीच्या माध्यमातून जी कामं केली आणि जी करायची आहेत त्याचा उल्लेख केला.
 
प्रचारादरम्यान तुम्ही पीएम मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो पोस्टर्सवर प्रचारासाठी वापरले का ? हाही प्रश्न जेठमलानींनी प्रभू यांना विचारला.
 
प्रभू यांनी त्यावर बोलताना म्हटलं की, मला आता आठवत नाही, कोणाचे फोटो होते. पण त्यावेळेस आम्ही युतीत होतो त्यामुळे जे फोटो वापरायचो तेच वापरलेत. पण त्या पोस्टरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा नक्की होते.
 
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.
 
सुनील प्रभू मराठीत उत्तर देत असताना त्याचं इंग्रजी भाषांतर शब्दशः होत नसल्याचं कामत यांचं म्हणणं होतं.
 
अध्यक्षांनी साक्षीदरम्यान हस्तक्षेप केल्याने कामत यांना साक्षीदाराला प्रभावित करत असल्याचं म्हटलं. यावरून कामत चिडले आणि म्हटलं की, माझ्या संपूर्ण करिअरमध्ये कोणीही माझ्यावर हा आरोप केला नाही की मी साक्षीदाराला प्रभावित करतोय.