शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : रविवार, 23 एप्रिल 2023 (11:06 IST)

जागतिक पुस्तक दिन2023 : भरपूर पुस्तकं वाचायची आहेत? मग या 10 टिप्स आधी वाचा

संपूर्ण जगभरात 23 एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा केला जातो.वाचनानं माणसाचं जीवन समृद्ध होतं. नव्या जगाची ओळख, आव्हानं स्वीकारण्याची प्रेरणा असं बरंच काही पुस्तकं आपल्याला देत असतात. पुस्तकं वाचायची तर असतात. पण वेळ नाही, असं अनेकांना वाटत असतं.
 
पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना वाचन करणं शक्य होतंच असं नाही. पण या घाईगडबडीतही थोड्या प्रयत्नांनी, नीट प्लॅनिंग करून तुम्ही पुस्तकांशी असलेलं नातं अधिक घट्ट करू शकता. कसं... ते जाणून घेण्यासाठी वाचा हे 10 मुद्दे.
 
1. पुस्तक ठेवा कायम सोबत
बसमध्ये, ट्रेनमध्ये आणि अगदी डॉक्टरांकडे जाताना एक पुस्तक सोबत ठेवाच. जेव्हा थोडा फावला मेळ मिळेल तेव्हा तो सत्कारणी लावता येईल.
 
तुम्ही कामात कितीही गुंतलेला असला तरी थोडासा फावला वेळ मिळतच असतो. या वेळेत तुम्हाला काही पानं नक्की चाळता येतील.
घरातून निघताना बॅगेत जागा नसेल तर? अशा वेळी तुम्ही पुस्तकाची प्रत सोबत न ठेवता या पुस्तकाची ई आवृत्ती किंडल किंवा स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करू शकता.
 
सोशल मीडियावर वेळ घालवण्याऐवजी मोबाईलवर पुस्तक वाचणं कधीही चांगलंच. हो ना?
 
2. वाचनाची सवय लावा
वाचन हे दैनंदिन जीवनाचा भाग होणं आवश्यक असतं. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक ठरावीक वेळ वाचनासाठी ठेवा. दररोज प्रयत्न केले तर ही तुमची सवय होऊन जाईल.
 
आणि जर तुमच्याकडे वेळ फारच कमी असेल तर काय कराल? अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जलद वाचनाचा पर्याय निवडता येईल. वेळ लावून वाचन केलं, तर त्या वेळात फक्त वाचनच होईल आणि तुमचं मन इतर गोष्टींकडे वेधलं जाणार नाही, विचलित होणार नाही.
 
3. पुस्तकांची यादी करा
ही एक चांगली सवय तुम्हाला पुस्तकांच्या अधिक जवळ नेईल. मोबाईलमध्ये किंवा कागदावर तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायची आहेत त्यांची यादी करा. हातातलं पुस्तक संपण्याआधी दुसरं पुस्तक तयार ठेवा. असं जर केलं नाही तर तुमची वाचनाची सवय मोडू शकते.
पण माहितीपूर्ण आणि विश्वसनीय संदर्भावरूनच यादी बनवा. जेणेकरून तुम्हाला चांगल्या पुस्तकांची यादी करता येईल. त्यामुळे हातातील पुस्तक संपलं की नवीन पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण राहील.
 
4. ऑडीयो पुस्तकांचा पर्याय
तुम्हाला कथा-कांदबऱ्यामध्ये आवड निर्माण करायची असेल तर अशी पुस्तकं ऐका. हल्ली ऑडिओ बुकची संकल्पना आपल्याकडे रुजली आहे. एका महिन्यासाठी मोबाईलमधील गाणी बदलून ऑडिओबुक्स भरा. ते तुम्ही कारमध्ये, लोकलमध्ये, एसटी बसमध्ये, रिक्षात जाताना अगदी टॉयलेटमध्येसुद्धा ऐकू शकता.
 
शेवटी पुस्तक ऐकणं हे काही वाचणं नव्हे. पण त्यामुळं एखाद्या गोष्टीत, विषयात रुची निर्माण होईल. मग पुढच्या पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण होईल आणि त्या पुस्तकमालिकेतलं एखादं पुस्तक ऐकून पुढचं वाचण्याकडे आपोआप वळाल.
 
5) 'बुक क्लब'चे सभासद व्हा
बुक क्लबचे सभासद झाल्यानं भरपूर फायदे होतात. समविचारी लोकांबरोबर मैत्री होते, नवीन पुस्तकांची माहिती होते. एकमेकांना आवडणाऱ्या पुस्तकांची चर्चा करता येते.
 
कधीच माहीत नसलेलं एखादं पुस्तक यामुळे वाचनात येऊ शकतं. अगोदर आवडलेलं नसेल असं एखादं पुस्तक परत आवडू शकतं या चर्चांमधून.
 
तसंच, क्लबमुळं तुम्ही वाचलेल्या पुस्तकावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळतात. त्यामुळे त्या पुस्तकाबद्दल अजून माहिती मिळते. बुक क्लबच्या पुढच्या भेटीअगोदर हातातलं पुस्तक संपवण्याचं टार्गेट ठरवू शकता.
 
6) पुस्तक आवडलं नाही तर सोडून द्या
पुस्तक वाचायला सुरुवात केली म्हणून ते संपावं असा काही नियम नाही. बळजबरीनं वाचत असाल तर तुमचा वाचनातील रस निघून जाऊ शकतो.
पुस्तक आवडलं नाही तर अर्ध्यावर सोडून देण्यात काही गैर नाही आहे. यादीमधलं पुढचं पुस्तक हाती घ्या. कदाचित अर्ध्यावर सोडलेलं पुस्तक तुम्हाला नंतर कधीतरी वाचावंसं वाटेल. प्रत्येक पुस्तक पूर्ण वाचावं असा काही नियम नाही.
 
7) वाचनाचं ठिकाण कसं असावं?
शेजारी टीव्ही चालू असताना कोणीही वाचनावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आजूबाजूला शांतता असलेल्या ठिकाणीच वाचन करावं.
 
उन्हाळयात संध्याकाळी पुस्तक घेऊन मस्तपैकी गच्चीवर ताजी हवा घेत वाचाव. तर हिवाळ्यात रात्री झोपायच्या अगोदर वाचावं जेणेकरून चांगली झोप लागेल.
दरम्यान दररोजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला शांत, निवांत ठिकाण मिळेलच असं नाही. अशा वेळी सरळ शांत संगीत लावून ईयरफोन कानात घालावेत आणि वाचावं.
 
8) स्वत:ला एक टार्गेट द्या
एखादं काम निर्धारित वेळेत पूर्ण करताना भरपूर समस्या येतात, पण स्वतःपुढे एक वास्तववादी लक्ष्य ठेवा. ते पूर्ण केल्यावर एक आनंद मिळतो. तुम्ही कामात व्यग्र असाल एका पुस्तकासाठी ठरावीक मुदत द्या, त्यामुळं पुस्तक वाचण्यात चालढकल करणार नाही.
 
तुमचा सरासरी वाचणाचा स्पीड मोजा आणि दर दिवशी किंवा आठवड्याला ठरावीक पानं वाचण्याचं टार्गेट ठेवा. जर हे तुम्हाला फारच कठीण वाटत असेल तर एका महिन्यात किंवा वर्षभरात ठरावीक पुस्तकं पूर्ण करण्याचं टार्गेट ठरवून घ्या.
 
टार्गेट दिल्यामुळं तुमचा वाचण्याचा प्रवाह कायम राहतो. पुस्तक संपल्यावर स्वत:ला बक्षीस द्यायला विसरू नका. हे बक्षीस म्हणजे कदाचित अजून एक नवी पुस्तक असेल.
 
9) पुस्तकातल्या चांगल्या कलाटणीला वाचन थांबवा
टीव्ही मालिका रहस्यमय कलाटणीवर आली की संपवली जाते. हे जरी तुम्हाला आवडत नसलं तरी असं केल्यानं प्रेक्षक हमखास पुढचा भाग नक्की पाहतात.
 
पुस्तकाबाबतही तुम्ही असी शक्कल लढवू शकता. कलाटणी मिळणाऱ्या प्रसंगापर्यंत किंवा मुद्द्यापर्यंत आलं की तिथेच थांबा. त्यामुळे पुढे काय या उत्सुकतेपोटी पुढच्या वेळी लवकर वाचण्याची हुरहुर लागेल.
 
10) तुम्हाला आवडणारेच विषय निवडा
तुम्ही नियमित वाचक नसाल तर किचकट पुस्तकांनी सुरुवात करू नका. आवडत्या विषयावर सोप्प्या भाषेत लिहिलेल्या पुस्तकांनी सुरुवात करा.
उदाहरणार्थ तुम्हाला फिरायला आवडत असेल तर त्यासंदर्भात वाचा. इतिहासात रुची असेल तर तशी पुस्तकं वाचा. तर चला ठरवा पुस्तकांची यादी आणि आजपासून वाचायला सुरुवात करा.