मंगळवार, 17 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By अभिनय कुलकर्णी|

मराठी समाज कुठे एक आहे?

राज ठाकरे यांच्या मराठी आंदोलनाची धुळ आता थोडी खाली बसायला लागली आहे. अर्थात राजकारण सुरू आहे. पण ते उत्तरेत. मराठी माणसांनी या एकूणच प्रकरणातून आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याचा अर्थ हाही सल्ला फक्त मराठी माणसांना आहे असं नाही, तर हा समाज तुलनेने विचारी, समंजस आणि सर्वांगीण विचार करणारा, तारतम्याने वागणारा आहे म्हणून आत्मचिंतनाची धुराही त्याकडे येणेही सहाजिक आहे. शिवाय उत्तरेशी तुलना करता विकासाच्या, पुरोगामीत्वाच्या बाबतीतही मराठी समाजच अग्रेसर आहे. म्हणूनच आता आपणच विचार करायची वेळ आली आहे.

राज ठाकरेंनी ज्या मराठी समाजासाठी आंदोलन केले असे ते म्हणतात, तो समाज तरी एक आहे का? नाही. नक्कीच नाही. अख्खा मराठी समाज आणि त्यातले प्रांतही वाटले गेले आहेत. वैधानिक विकास महामंडळात विकासाचा असमतोल आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरता भरत नाहीये. या भागातले लोक कायम पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांवर खार खाऊन असतात. आमच्या वाट्याचा निधी हे लोक पश्चिम महाराष्ट्रात पळवतात अशी त्यांची कायम तक्रार असते. अगदी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हे मतभेद अनेकदा समोर येतात. एवढंच काय विदर्भाच्या वेगळ्या राज्याची मागणीही होते आणि त्याला बर्‍यापैकी प्रतिसादही लाभतो हेही याच मराठी माणसांच्या महाराष्ट्रात घडते. विकास फक्त दिसतो तो पुण्या-मुंबईत बाकीच्या महाराष्ट्रात काय आहे? असेही उच्चरवात विचारले जाते. ते खरेही आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशाचा काही भाग आणि कोकण यांना तर विकासाचा फारसा स्पर्शही झालेला नाही. त्यामुळे त्या भागातही सूप्त नाराजी आहेच. असे असताना आपण एक कसे?

राज ठाकरेंच्या आंदोलनाला मोठ्या मराठी समाजाचा पाठिंबा असल्याचे दिसले खरे. पण ते कायम टिकेल काय? कारण एकेकाळी शिवसेना स्थापन झाल्यानंतर तिलाही मोठा पाठिंबा मिळाला, पण नंतर त्याविरोधातही समाजातील एक मोठा वर्ग होताच. आणि आजही आहे. शिवसेनेचा प्रभावही साधारणपणे शहरी भागावरच राहिला. याचा अर्थ शहरी आणि ग्रामीण भागाच्या विचारसरणीतीही फरक आहे. शहरी विरूद्ध ग्रामीण असाही छुपा संघर्ष आहेच. भलेही तो टोकदार होणार नाही. पण त्याचा सल कुठेतरी आत असणारच.

हे झालं ग्रामीण- शहरी. हे मतभेद एवढ्यावरच संपत नाहीत. प्रांतीय भेद पुन्हा वेगळे आहेत. खानदेशातील मंडळी मध्यंतरी कोकणातील नोकरीच्या जागांसाठी आली त्यावेळीही तिथे नाराजीचा सूर उमटला होता. विदर्भाची मंडळी मराठवाड्याला जड होतात. आणि दोहीकडची पुणेकरांना. पुण्यात बाहेरून आलेल्या मराठी माणसांना हाकलत नाहीत, पण त्यांना तुम्ही बाहेरून आलात याची जाणीवही करून दिली जाते. हे दुय्यमत्वाचे अनुभव अनेकदा विविध संकेतस्थळांवरच्या चर्चेतून अनुभवायला मिळतात. खुद्द पुणेकर आणि मुंबईकरांमध्ये किती तरी मतभेद आहेत. हे झाले प्रांतीय मतभेद. भलेही ते तितके टोकदार नसतील. पण जातीय मतभेदांचे काय?

जातीपातीत तर पुरोगामी म्हणवणारा आख्खा महाराष्ट्र वाटला गेला आहे. आता मराठा आरक्षणाने या आगीत तेल ओतले आहे. त्यामुळे जाती-जातीतील संघर्षही चांगलाच पेटला आहे. वेगवेगळ्या जातींची मोठमोठी संमेलने होताहेत. त्यात मराठी म्हणून एकता साधण्यापेक्षा जातीय एकतेवर भर दिला जातोय. मागास जातींना ओबीसींच्या बॅनरखाली एकत्र केले गेले. त्याचा संबंध आरक्षणाशी जसा आहे, तसा बलिष्ठ मराठा जातीशी संघर्ष करायलाही ही एकताच कारणीभूत ठरेल, हा हिशेबी हेतूही आहे. म्हणूनच मराठा आरक्षणाचा बार झाला, त्यावेळी ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्था जाहीर झाली आणि ती प्रकटही करून दाखवली गेली.

पण मुळात ओबीसी जाती तरी कुठे एक आहेत? तेली, शिंपीं, माळींसह इतर सगळ्या जाती 'आपले' मेळावे साजरे करून 'जातीय' एकता अबाधित राखण्याचे काम करतात. पण समस्त ओबीसी म्हणूनही त्यांचा विचार फक्त व्यासपीठावर होतो. कारण त्याचा संबंध आरक्षणाशी होतो. कारण आरक्षणासाठी तुम्ही एक असणे गरजेचे असते. ओबीसी जातींमध्ये तर फारसे समाज व्यवहारही होत नाहीत. मराठी अस्मितेच्या मुद्यावर इतर मराठी समाजासमवेत एकत्र येऊन ते आवाज उठवू शकतील?

दलितांची कथाच निराळी. दलितांमध्येच इतके अंतर्गत मतभेद आहेत की त्या जातीही परस्परांशी फारसे संबंध ठेवत नाहीत. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची तर त्यांच्या अनुयायांनी शकले करून टाकली. या महामानवाचे विचारही त्यांच्या नेत्यांना पेलले नाहीत. गटातटात फुटली गेलेली दलित अस्मिताही निदान स्वतःच्या विकासासाठी एकत्र येऊ शकली नाही. मग मराठी समाजात मिसळणे तर दूरच राहिले. तीच कथा आदिवासी आणि भटक्यांची. अशा वेळी स्वतःच्या विकासाचे पडले असताना मराठीच्या मुद्याचे त्यांना किती देणेघेणे असेल?

सत्ताधारी मराठा समाजाचे तरी वेगळे काय? मराठ्यांमध्ये तर तुम्ही किती कुळी त्यावर सगळे काही ठरणार? जात्याच आलेल्या पुढारीपणाच्या जोरावर या जातीने राजकारण, सहकार, शिक्षण ही क्षेत्रे काबीज केली आहेत. तरीही त्यांच्याकडून आरक्षणाची मागणी होतेच आहे. त्यासाठी प्रसंगी आंदोलनांचीही भाषा होते आहे. याच जातीच्या संघटनांनी दोन वर्षांपूर्वी जेम्स लेनप्रकरणी ब्राह्मण समाजावर तीव्र टीकेची झोड उठवली होती. त्यातल्या काहींनी तर पुरोहितशाही वर्चस्ववादी दृष्टिकोनाला 'शिवधर्म' स्थापून कठोर उत्तर दिले होते आणि त्यानिमित्ताने ब्राह्मणांवरही पुष्कळ आगपाखड केली होती.

दुसरीकडे पुरोगामीत्वाचा कायम ठेका घेतलेल्या ब्राह्मण समाजाचे तर काय सांगावे? आम्ही मेळावे घेत नाही, असे म्हणणार्‍या याच समाजातल्या कोकणस्थ पोटजातीयांनी गेल्या वर्षी पुण्याच्या स. प. महाविद्यालयाचे मैदान मारून आम्ही परशुरामाचे वंशज असे अभिमानाने मिरवले. आता याच पुण्यनगरीत अखिल भारतीय ब्राह्मणांचे मोठे संमेलन होऊ घातले आहे. आपण एकत्र येण्यात कुठेतरी आपल्यावर टीका करणार्‍या समजाला उत्तर देण्याचा गुढार्थही लपलेला दिसून येतो. असे असताना आता कुठे गेला 'तुमचा मराठी धर्म?' असे विचारण्याची वेळ आली आहे.

मराठी समाजातील मतभेद एवढ्यावरच संपत नाहीत. बृहन्महाराष्ट्रातील मराठी, परदेशातील मराठी यांच्या भूमिका पुन्हा वेगळ्या.

हे सगळे चित्र पहाता ज्या मराठी समाजसाठी राज ठाकरे भांडताहेत तो तरी कुठे समस्तरित्या एक आहे? उद्या, सगळे काही राज ठाकरे यांच्या मनासारखे झाले तरी महाराष्ट्रात अंतर्गत भांडणे सुरू होणार नाहीत हे कशावरून? जातीसाठी एकत्र येणारी मंडळी मराठी म्हणून एकत्र आलेली दिसली नाही आणि आल्यानंतरही परत ती जातीत वाटली गेली तर मग 'हेचि फळ काय मम तपाला'? असे म्हणण्याचीच वेळ राज ठाकरेंवर आली नाही म्हणजे मिळवली.