1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Modified: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:49 IST)

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

marathi rajbhasha din
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा
 
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
 
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
 
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
 
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान
 
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
 
रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
 
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
 
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा