शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (13:47 IST)

चित्रपट समीक्षा : पुष्पक विमान

स्वप्नं म्हणजे, माणसाच्या अपुर्‍या राहिलेल्या इच्छा-आकांक्षांची पोतडी. ही पोतडी सहसा कधी रिकामी होत नाही. अन्‌ तरीही माणून स्वप्नांमागे धावत असतो. कारण अनेकदा स्वप्नंच असतात प्रत्येकाच्या जगण्यामागची जिजीविषा. या स्वप्नांच्या आधारेच प्रत्येकजण चिवट आशा बाळगून असतो. असंच एक स्वप्न आहे 'पुष्पक विमान' चित्रपटातील तात्यांचं(मोहन जोशी). तात्या जळगावातील मोठे कीर्तनकार. तुकारामांना सदेह वैकुंठाला घेऊन जाणार्‍या पुष्पक विमानाचं कीर्तन म्हणजे तात्यांचा हुकमी एक्का. तात्यांनी हे कीर्तन सुरू केलं की, उपस्थित श्रोते त्यात रंगून जातच, परंतु पुष्पक विमानाचं वर्णन करता करता तात्यांची स्वतःचीच अशी ब्रह्मानंदी टाळी लागायची की त्यांच्या चित्तचक्षूंसमोर प्रत्यक्ष पुष्पक विमानच अवतरत असे. प्रत्यक्ष विष्णूने तुकारामांना आणण्यासाठी पाठवलेले हे पुष्पक विमान म्हणजे, तात्यांच्या भावभूमीतलं अंतिम सत्य जणू. त्यामुळेच त्यांचा नातू विलास (सुबोध भावे)ने कितीही सांगितलं की, विमानाचा शोध राइटबंधूनी लावला, तरी ते त्यांच्या डोक्यात कधीच शिरत नाही. पुष्पक विमानातून तुकारामांचं सदेह वैकुंठाला जाणं, यामिथकाशी तात्या एवढे एकरूप होऊन जातात, की एकदा मुंबईला आलेल्या तात्यांना विलास जेव्हा आकाशातून उडणारं खरंखुरं विमान दाखवतो, तेव्हा त्यांना ते विष्णूचं पुष्पक विमानच वाटतं आणि सतत त्याचंच चिंतन केल्यामुळे तुकाराम आपल्याला पुष्पक विमानात बोलावत आहेत, असे आभास त्यांना व्हायला लागतात... मग सुरू होतो तात्यांचा पुष्पक विमानात बसण्याचा धोशा. तात्यांची ही स्वप्नपूर्ती होते का? विलास त्यांना पुष्पकविमानाची सैर घडवतो का? या प्रश्र्नांच्या उत्तरपूर्तीसाठी तुम्हाला सिनेमाच बघायला हवा आणि सिनेमा तुमचा वेळ कारणी लावेल एवढं नक्की! खरंतर सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट छान आहे. सिनेमातल्या पात्रांना आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांना-संवादांना दिलेली अर्कचित्रात्मक शैली सुरेख आहे. काहीसे डामरट स्वभावाचे तात्या, मोहन जोशीनी ज्या ताकदीने साकारलेत, त्यासाठी त्यांना शंभराहून अधिक गुण द्यावे लागतील. मुंबईला गेलेल्या विलासची वाट पाहणारे तात्या, तो आल्यावर डोळ्यांत चमक आलेले तात्या, कोकणातल्या नातसुनेला फणसावरुन सतत टोचून बोलणारे इरसाल तात्या, अगदी तुकोबाच्या भेटीसाठी आणि पुष्पक विमानात बसण्यासाठी आतुर झालेले तात्या... या तात्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही.