शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2023 (08:50 IST)

दाते पंचांगाचा अंदाज : 108 वर्षांची पूर्वापार परंपरा : जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर काळात चांगला पाऊस

panchang
यंदा पर्जन्यमान समाधानकारक असून जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळात चांगला पाऊस पडेल. विशेष म्हणजे दक्षिण प्रदेशात तसेच महाराष्ट्रात पाऊस समाधानकारक असेल. महत्त्वाचे म्हणजे मराठवाडा प्रदेशात जुलै आणि ऑगस्टमध्ये बऱ्यापैकी पावसाची शक्यता दाते पंचांगकर्त्यांनी वर्तविली आहे. गोवा, कोकण आणि मुंबईमध्ये मात्र जूनच्या दरम्यान कदाचित अतिवृष्टी होऊ शकते, असे भाकितही वर्तविण्यात आले आहे. आज गुढी पाडवा. शके 1945 चैत्र शु. 1 बुधवार दि. 22 मार्च 2023 रोजी नूतन शोभमन संवत्सव सुरू होत आहे. गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते. आजही या दिवशी पंचांग पूजन करण्याची प्रथा कायम आहे. सर्व तऱ्हेचे शुभाशुभ दिवस, मुहूर्त, फणीचक्र, पर्जन्यमान, शेतीविषयक कामे यासाठी पंचांग पाहिले जाते. सोलापूर येथून प्रकाशित होणाऱ्या दाते पंचांगाची तर 108 वर्षांची पूर्वापार परंपरा आहे. याचा संदर्भ घेऊन बळीराजा आपल्या शेतीच्या कामाचे नियोजन करतो. कै. ल. गो. दाते यांनी 108 वर्षांपूर्वी पंचांग सुरू केले. त्यांच्यानंतर कै. धुंडीराज दाते यांनी हा वारसा पुढे चालविला तर आज अनंत (मोहन धुंडीराज दाते, विनय व ओंकार दाते) हे पंचांग प्रकाशित करतात. पर्जन्यमानाचा अंदाज मांडण्यासाठी ज्यो. सिद्धेश्वर मारटकर यांचेही सहकार्य लाभले आहे. वर्षप्रवेश कुंडलीत वृश्चिक लग्न उदित असून इंद्र मंडल योग होत आहे. मेष प्रवेश कुंडलीत सिंह लग्न उदित असून अग्नि मंडल योग होत आहे. मार्च 28 ची बुध, गुरू, युती, एप्रिल 11 ची रवी, गुरू युती, मे 1 ची रवी बुध युती आणि अन्य योग व ग्रहस्थिती पाहता एप्रिलच्या मध्यापासून उष्ण तापमानात वाढ होत राहिल. मेच्या मध्यात मेघगर्जनेसह काही ठिकाणी पावसाची शक्यता असेल. केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन नेहमीच्या वेळेच्या आसपास होईल. महाराष्ट्रात 15 जूनच्या जवळपास मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, पूर्वा आणि उत्तरा या नक्षत्रांच्या कालावधीत म्हणजे विशेष करून 20 जून ते 5 जुलै, 15 जुलै ते 2 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात पाऊस चांगला पडेल. मात्र एकंदरीत पर्जन्यमान मध्यम राहिल्याने सरासरी एवढा पाऊस होईल, असे वाटत नाही.
 
मृग नक्षत्र- दि. 8 जून 2023 रोजी गुऊवारी सायंकाळी 6.53 वाजता सूर्याचे मृग नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळी वृश्चिक लग्न असून इंद्रमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक हत्ती असून मंगळ, शुक्र, शनि हे जलनाडीत आहेत. 4 जूनच्या बुध, हर्षल युतीमुळे वादळे होतील. उष्ण तापमान कमी होऊ लागेल. खंडित वृष्टीचा योग आहे. वादळी पावसाने नुकसान होईल. काही प्रदेशात पुरामुळे त्रास होईल. दि. 8, 9, 10, 11, 12 पर्यंत पाऊस अपेक्षित आहे.
 
आर्द्रा नक्षत्र-दि. 22 जून 2023 रोजी गुऊवारी सायंकाळी 5.48 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. वृश्चिक लग्न उदित असून इंद्रमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन मेंढा असून मंगळ, शुक्र, शनि जलनाडीत आहेत. 1 जुलैची ऋतुउत्तेजक रवी, बुध युती आणि ग्रहस्थितीचा विचार करता या नक्षत्राचा पाऊस चांगला होईल. कोकण, गोवा, मुंबईमध्ये अतिवृष्टी आणि वादळामुळे हानी संभवते. दि. 23 व 27 जून व 4, 5 जुलै रोजी पाऊस अपेक्षित आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor