शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2017 (12:12 IST)

Health Tips : पपई खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे !

चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाण्याचे आणखी दहा फायदेदेखील आहेत…
 
* शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते – पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृद्यविकाराचा धोका संभवतो.
 
* वजन घटवण्यास मदत होते – एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.
 
* रोगप्रतिकारशक्ती वाढते –आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.
 
* मधुमेहींसाठी गुणकारी – पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो.
 
* डोळ्यांचे आरोग्य सुधारते – पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्‍यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.
 
* सांधेदुखीपासून आराम मिळतो – पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.
 
* पचन सुधारते- आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूड किंवा बाहेरचे जेवण टाळणे हे काहीसे कठीण आहे. त्यामुळे अशा खाण्याने पचनशक्ती बिघडण्याची शक्‍यता असते. अशावेळी पपई खाल्ल्याने अरबट-चरबट खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते. पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते.
 
*मासिक पाळीचा त्रास कमी होतो- अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास अशा समस्या दूर करण्यासाठी पपई फारच उपयुक्त आहे.
 
* कर्करोगापासून बचाव होतो- पपईमधील ऍन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.
 
* ताण-तणाव कमी होतो – दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.