1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2023 (08:37 IST)

कुंकू तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे? त्यामुळे लहान मुलांमध्ये मतिमंदत्व येतं का?

2013 ची गोष्ट आहे, अहमदाबादमधला 35 वर्षांचा माणूस चेहऱ्यावर सूज आली म्हणून दवाखान्यात आला. त्याला बद्धकोष्ठ, मळमळ, उलट्या, पोटात दुखणं, अंगदुखी आणि रात्री झोप न येणे असे त्रास होत होते.
 
डॉक्टरांकडे गेल्यानंतर निदान झालं की या रुग्णाला लेड पॉयझनिंग झालं आहे, म्हणजेस शिसे या धातूमुळे विषबाधा.
 
ही व्यक्ती 11 वर्षं सलग पूजा आणि इतर धार्मिक विधी करताना कुंकू वापरत होती. तपासाअंती लक्षात आलं की या रुग्णाच्या हिरड्यांवर निळ्या आणि करड्या रंगाच्या रेषा उमटल्या आहेत आणि त्याच्या किडन्या खराब झाल्या आहेत.
 
या प्रसंगावरून लक्षात आलं की कुंकू वापरल्यामुळे त्यातल्या शिसे या धातूपासून विषबाधा होऊ शकते.
 
शिसे हा धातू आरोग्यासाठी घातक आहे. तज्ज्ञांना अभ्यासाअंती दिसून आलंय की यामुळे मुलांची तसेच प्रौढांचा बुद्ध्यांक (आय क्यू) पाच अंकांनी कमी होऊ शकतो.
 
शिश्यावर झालेल्या एका संशोधनातून दिसून आलं की औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी मानवी शरीरात जेवढं शिसं सापडायचं त्याच्या तुलनेत आता शिशाचं प्रमाण जवळपास 500-1000 पटींनी वाढलं आहे.
 
युनिसेफ आणि आंतरराष्ट्रीय संस्था ‘प्युअर अर्थ’ यांच्या एका अहवालानुसार आज जवळपास 27.5 कोटी लहान मुलं शिशाच्या संपर्कात आहेत. मानवी अधिवासाच्या जवळ अधिक प्रमाणात शिसे सापडण्याला लेड पोल्युशन किंवा शिसे प्रदूषण म्हणतात.
 
शिशाच्या संपर्कात येणाऱ्या मुलांचा मेंदू विकसित होण्यात अडचणी येऊ शकतात.
 
पण ही मुलं शिशाच्या संपर्कात येतात कशी?
लहान मुलं सहसा बाहेर खेळतात आणि खेळताना अनेक वस्तूंना स्पर्श करतात ज्यात शिसं असतं.
 
शिसे जमिनीत सापडणारा एक धातू आहे. तो पाण्यात आणि वनस्पतींमध्येही आढळतो.
 
हा धातू नैसर्गिकरित्या विषारी आहे. निळसर-करड्या रंगाचा हा धातूचं पृथ्वीच्या आवरणातलं प्रमाण 0.002% इतकं आहे.
 
रोहित प्रजापती पर्यावरणावादी कार्यकर्ते आहेत आणि वडोदरामध्ये पर्यावरण सुरक्षा समिती या नावाने एक संस्था चालवतात.
 
बीबीसीशी बोलताना ते म्हणातात, “खाणकाम, खनिजं वितळवून धातू तयार करणे, शिसेयुक्त पेट्रोल आणि विमानांसाठी वापरलं जाणारं इंधन, तसंच उत्पादन क्षेत्र, पुनर्वापर (रिसायकलिंग) शस्त्रास्त्र तयार करणे, सिरॅमिकची भांडी, खेळणी, सौंदर्यप्रसाधानं, परंपरागत औषधं, पिण्याच्या पाण्यासह इतर कामांसाठी वापरले जाणारे पाईप्स यासगळ्यात शिसे असतं. त्यामुळे आपण सतत त्याच्या संपर्कात येतच असतो.”
 
तसंच या गोष्टींच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही शिशामुळे विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते.
 
“दुसरं म्हणजे घराला किंवा इमारतींना दिले जाणारे रंग. यातही मोठ्या प्रमाणावर शिसं असतं त्यामुळे शिशाच्या संपर्कात आपण येत असतो,” ते पुढे म्हणतात.
 
प्रकिया केलेल्या अन्नातही शिसे असतं.
 
जगदीश पटेल यांचीही वडोदरामध्ये एक संस्था आहे. त्यांनी शिशामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणांमावर अभ्यास केला आहे.
 
त्यांच्यामते शिसेयुक्त बॅटरीमुळे आता सर्वाधिक शिसे प्रदूषण होतंय.
 
ते म्हणतात, “कुंकू आणि इंस्टंट नुडल्स यामध्येही शिसं असतं.”
 
मुंबईत 733 विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं असता 172 मुलांमध्ये शिशाचं प्रमाण जास्त आढळलं कारण त्यांच्याकडे इंस्टंट नुडल्सची पाकिटं होती.
 
शिसे आरोग्यावर कसा परिणाम करतं?
एकदा शरीरात गेल्यानंतर शिसं मेंदू, यकृत, किडन्या आणि हाडांवर परिणाम करतं. ते दातात आणि हाडांमध्ये साठवलं जातं.
 
एखाद्याच्या रक्तात किती शिसे सापडतं यावरून त्यांच्या शरीरात किती शिसे साठलं आहे हे मोजता येतं.
 
प्रक्रिया केलेल्या अन्नातही शिसं सापडतं 
नीती आयोगाच्या एका रिपोर्टनुसार दीर्घकाळ शिशाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. मज्जासंस्थेवर आघात होतो.
 
थोडाकाळ शिशाच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही डोकेदुखी, स्मृतीभंश, अशक्तपणा, बद्धकोष्ठता, रक्तक्षय, सूज, पोटात दुखणे आणि अंग आखडणे असे त्रास होतात.
 
एकदा शिसं शरीरात शोषलं गेलं की ते पेशींमार्फत शरीरात वितरित होतं. त्यामुळे सगळ्याच अवयवांवर परिणाम करतं. कधी कधी शरीर जास्तीचं शिसे विष्ठा आणि लघवीतूनही शरीराबाहेर फेकतं.
 
गरोदर महिलांच्याही हाडांमध्ये शिसं शोषलं जातं, ते नंतर रक्तात वितरित होतं आणि त्या रक्ताव्दारे भ्रुणापर्यंत पोचतं.
 
लहान मुलं आणि माता होऊ शकण्याच्या वयात असणाऱ्या महिला यांच्यासाठी शिशाच्या संपर्कात येणं अधिक धोकादायक असतं.
 
लहान मुलांच्या शरीरावर शिशाचे काय परिणाम होतात?
यूनिसेफने भारतातल्या मुलांच्या रक्ताचं सर्वेक्षण केलं होतं. त्यातून असं लक्षात आलं की ज्या मुलांचा शिशाची सतत संपर्क आला त्यांच्या बुद्धीमत्तेची वाढ खुंटली.
 
लहान मुलं बाहेर खेळताना काहीही तोंडात घालू शकतात, त्यामुळे त्यांच्या शरीरात शिसं प्रवेश करतं.
 
दीर्घकाळ शिशाच्या संपर्कात आल्याने त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो, अशा मुलांना मतिमंदत्व येऊ शकतं. कधी कधी अशी मुलं कोमात जाऊ शकतात किंवा त्यांचा मृत्युही होऊ शकतो.
 
यातून जी मुलं वाचतात त्यांना कायमचं बौद्धिक अपंगत्व येऊ शकतं किंवा त्याच्या वागण्यात फरक पडू शकतो.
 
शिशाच्या संपर्कात अल्पकाळ जरी आलं तरी त्याचे शरीरावर परिणाम होतातच. ते परिणाम कायमस्वरूपी असतात. युनिसेफनुसार भारतातली अर्ध्याहून जास्त लोकसंख्या शिशाच्या संपर्कात आलेली आहे आणि याचे त्यांच्या शरीरावर परिणाम झालेले आहेत.
 
दीर्घकाळ शिशाच्या संपर्कात आल्यानंतर लहान मुलांमध्ये दिसणारी लक्षणं
बौद्धिक तसंच शारिरिक वाढ खुंटणे
आकलनशक्ती कमी होणे
भूक न लागणे
चक्कर येणे आणि थकवा
पोटात दुखणे, उलट्या
ऐकायला कमी येणे
यामुळे लहान मुलांची शाळेतली प्रगती खुंटते आणि त्यांच्यात हिंसक प्रवृत्ती निर्माण होऊ शकते.
 
प्रौढांमध्ये दिसणारी लक्षणं
स्नायू दुखणे
स्मृतिभंश
डोकेदुखी
पोटदुखी
नंपुसकत्व
वेळेआधी प्रसुती होणे
मन विचलित होणे
शिशामुळे आरोग्यावर परिणाम होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तसंच लहान मुलांना यापासून वाचवण्यासाठी खालील पावलं उचलली पाहिजेत.
 
घराचं रिनोव्हेशन होत असेल किंवा रंग दिला जात असेल तिथून मुलांना लांब ठेवा. शक्यतो या गोष्टी टाळा
मुलांना सतत हात धुण्याची सवय लावा.
मुलं बाहेर कोणत्या घातक गोष्टी तोंडात घालत नाही ना याकडे लक्ष ठेवा.
 
Published By- Priya Dixit