शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 11 डिसेंबर 2023 (19:31 IST)

दातांचे आजार तुमच्या पोट आणि हृदयाच्या आजारांनाही निमंत्रण देऊ शकतात

दातांच्या डॉक्टरांकडे जाताना अनेकदा फक्त दातांच्या आरोग्याचा विचार केला जातो. तोंडाच्या इतर पैलूंकडे दुर्लक्ष केलं जातं.तुम्ही जर असं करत असाल तर अतिशय मौल्यवान माहितीला मुकत आहात.
 
तोंडाच्या आरोग्याचं मूल्यांकन सहजपणे करता येतं. याशिवाय तुमच्या शरीरात काय घडतंय हे तोंडाच्या आरोग्याद्वारे अचूकपणे ओळखता येतं. शिवाय, तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तोंडाचं आरोग्य चांगलं राखायला हवं.
 
"डोळ्यातून होणाऱ्या रक्तस्त्रावाकडे तुम्ही दुर्लक्ष करता का? मग हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असताना लोक निष्काळजीपणे का वागतात?’’ असं लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातील दंतचिकित्सा संस्थेचे संचालक निकास डोनस यांनी विचारलं.
 
“हे लोक हिरड्यांच्या गंभीर आजारासह आपलं आयुष्य जगत असतात. शिवाय, त्यांना असं वाटतं की हे आजार सामान्य आहेत,” असं निकस यांनी बीबीसीला सांगितलं.
 
हिरड्यांचे आजार हे मधुमेह आणि ह्रदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांसंबंधीत आजाराशी निगडीत असल्याचे असंख्य पुरावे आहेत.
 
अनेक अभ्यासांतून असं दिसून आलंय की, या आजारांविरुद्धच्या लढ्यात तोंडाचं आरोग्य राखण्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केलं गेलंय.
 
“तोंडाचा शरीराच्या इतर भागांशी असलेल्या संबंधांबद्दल विचार करताना असं दिसून येतं की, अनेक जुन्या आजारांवर हिरड्यांच्या आजाराचा प्रभाव आहे.”
 
हिरड्यांचा आजार हा मानवजातीतील सहाव्या क्रमांकाचा सर्वात सामान्यपणे आढळणारा जुना आजार आहे. जगातील 101 कोटी लोकं म्हणजेच 11.2 टक्के लोक हिरड्यांच्या आजाराने ग्रस्त आहेत,” असं निकस म्हणाले.
 
हिरड्यांचे आजार
हिरड्यांचे आजार किंवा पीरियडॉन्टायटिस हा हिरड्यांना होणारा एक गंभीर संसर्ग आहे, जो दातांच्या सभोवतालच्या नाजूक टिश्यूंवर परिणाम करतो, असं अमेरिकेतील मायो क्लिनिक सांगतात.
 
"पिरियडॉन्टायटीसवर उपचार न केल्यास दातांना आधार देणारी हाडं नष्ट होतात. परिणामी, दात खिळखिळे होतात किंवा पडतात,”, असं त्या म्हणाल्या.
 
हिरड्यांमधून रक्त येणं, लालसरपणा, वेदना आणि श्वासाला दुर्गंधी ही पीरियडॉन्टायटीसची सामान्य लक्षणं आहेत.
 
टाईप-2 मधुमेहाचा संबंध हिरड्यांच्या आजाराशी जोडणारे असंख्य पुरावे आहेत.
“खरंतर पीरियडॉन्टल आजार असलेल्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. मधुमेह झालेल्या रुग्णांना पीरियडॉन्टल आजार देखील असतो,” असं निकस म्हणाले.
 
इंग्लंडमधील सॅलिसबरी हॉस्पिटलमधील रेडिओलॉजिस्ट डॉ. ग्रॅहम लॉयड जोन्स म्हणाले की, तोंड आणि मधुमेह यांचा एकमेकांशी संबंध आहे.
 
"तोंडाकडे एक रोगप्रतिकारक अवयव म्हणून आपण पाहायला हवं. जेव्हा तोंडाच्या आरोग्याशी तडजोड केली जाते, तेव्हा सामान्यपणे तोंडात राहणारे जीवाणू शरीराच्या इतर भागांकडे आपला मोर्चा वळवतात. हे जीवाणू अनेक रोगांना कारणीभूत ठरतात. ते आधीच असलेल्या आजारांना अधिक त्रासदायक बनवू शकतात,” असा इशारा त्यांनी दिला.
 
तोंडापासून हृदयापर्यंत
हिरड्यांचे आजार फक्त टाईप-2 मधुमेहाशीच नाही तर इतर रोगांशी देखील संबंधित आहेत.
 
पिरियडॉन्टायटीसचे जीवाणू रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरतात. शेवटी हृदयावर त्याचा परिणाम होतो.
 
"पीरियडॉन्टायटिसमुळे दाहक घटक रक्तात जमा होतात आणि त्याचा थर तयार होतो. या थरामुळे रुग्णांमध्ये हृदय निकामी होणं आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या उद्भवतात,”, असं निकास डोनस यांनी सांगितलं.
 
कोणतीही रोगप्रतिकारक प्रणाली किंवा औषधांच्या वापरामुळे तोंडाची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत झाल्यास एंडोकार्डिटिस नावाचा प्रचलित जीवघेणा संसर्ग होतो.
 
"हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. हृदयाच्या आतील टिश्यूंवर याचा परिणाम होतो," असं डॉ लॉयड जोन्स यांनी स्पष्ट केलं.
 
रोगकारक (जीवाणू) तोंडावाटे शरीराच्या इतर अवयवांमध्ये जातात हे स्पष्ट आहे. हळूहळू हे जीवाणू तोंडातून रक्ताद्वारे शरीराच्या इतर भागात पोहोचतात. यामुळे इतर आजार होऊ शकतात किंवा विद्यमान आजार अधिक गंभीर रूप धारण करू शकतात,” असं ते म्हणाले.
 
बौद्धिक क्षमतेत घट होते का?
काही संशोधकांचं म्हणणं आहे की या जीवाणूंचा संबंध वृद्धापकाळात बौद्धिक क्षमता कमी होण्याशी असू शकतो. असं असलं तरी, तोंडी सेवनामुळे बौद्धिक क्षमता कमी होण्याशी मधुमेह आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध जोडणारा सबळ पुरावा अस्तित्वात नाही.
 
डॉ. विवान शाह यांना त्यांच्या अभ्यासात असं आढळून आलंय की, जेव्हा एखादी व्यक्ती उतारवयात पोहोचते तेव्हा 21 किंवा त्याहून अधिक दात असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत 21 पेक्षा कमी दात असलेल्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेमध्ये जास्त प्रमाणात घट होते.
 
"हा अलिकडील अभ्यास आहे. पण आपल्याला असं म्हणता येईल की जर स्मरणशक्ती कमी झाली असेल, तर दात घासण्याच्या आणि दात कोरण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल.
 
याचा संबंध पोषणाशी देखील आहे. दात कमी असल्यास सर्व प्रकारचे अन्नपदार्थ खाता येऊ शकणार नाहीत. ज्याचा परिणाम अंतिमत: स्मरणशक्तीवर होऊ शकतो”, असं शाह म्हणाले.
 
लॉयड जोन्स म्हणाले की काही जीवांचा संबंध हिरड्यांच्या आजाराच्या सुरुवातीशी आणि तीव्रतेशी जोडलेला असतो.
 
“जिंजिवलिस (Gingivalis) हा एक विलक्षण आणि मनोरंजक जीव आहे. हा जीव मज्जातंतूंच्या पेशी नष्ट करणाऱ्या न्यूरोटॉक्सिनने झाकलेला असतो. हा जीव केवळ तोंडातच राहत नाही तर लालसर झालेल्या हिरड्यांद्वारे शरीरात प्रवेश करतो. अल्झायमर असलेल्या लोकांचा मेंदू आणि सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडमध्ये तो दिसून येते,” असं लॉयड म्हणतात.
 
तोंड आणि शरीरातील इतर प्रणालींमधील संबंध हे अधोरेखित करतात की पिरियडॉन्टल आजाराला त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात रोखणं किती महत्त्वाचं आहे.
 
तोंडाची काळजी
"तोंडाचे सर्व रोग टाळता येतात आणि काही प्रमाणात त्यावर उपचार देखील करता येतात. पण तोंडाचा कर्करोग याला अपवाद आहे. तो पूर्णपणे वेगळा आहे”, असं डोनस म्हणाले.
 
दंतचिकित्सा आणि औषधांचं पुढे एकत्रीकरण करून डॉक्टर फक्त दातांची तपासणी करण्याऐवजी संपूर्ण शरीरावर एक प्रणाली म्हणून उपचार करू शकतात, असं ते म्हणाले.
 
बाळाची जन्माच्या आधी काळजी घेणं, हे या विशेष वैद्यकीय संयोगाचं उत्तम उदाहरण आहे. गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे तोंडातील जीवाणू अधिक शक्तिशाली होऊ शकतात. आई आणि बाळाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असं शाह म्हणाले.
 
"त्यामुळे वेळेच्या आधी जन्माला येण्याचा आणि जन्माच्या वेळी वजन कमी असण्याचा धोका वाढतो. म्हणूनच मातांशी बोलणं आणि त्यांची योग्य काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.”, असं ते म्हणाले.
 
लॉयड जोन्स म्हणाले की तोंडाच्या आरोग्याविषयी आपल्या विचारपद्धतीत बदल करणं गरजेचं आहे.
 
आपल्या तोंडातील निरोगी सूक्ष्मजीवांचं संरक्षण करण्यासाठी तोंडाची काळजी घेणं आवश्यक आहे.
 
Published By- Priya Dixit