काही लोकांच्या नाभीत कापडाच्या धाग्याच्या तंतूसारखा मळ किंवा घाण (lint) अजिबात नसते. तर काही लोकांना त्यांच्या नाभीत असणारी कापसाच्या तंतूंच्या गोळ्यासारखी असणारी घाण दररोज साफ करावी लागते.
जेसन जी गोल्डमन यांनी नाभीसंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमागचं कारण शोधलं आहे...कापडी तंतू, केस आणि इतर घटक साठल्यानं तुमच्या नाभीत तयार होणाऱ्या विशिष्ट घाणीसंदर्भातील दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत.
यातील पहिली बाब म्हणजे याला वैज्ञानिक दृष्टीनं नाभीतील तंतू म्हणतात, तर सर्वसामान्यपणे याला बेंबीत तयार होणारी घाण (belly button lint) (BBL) म्हणतात. दुसरी बाब म्हणजे या प्रकारची घाण मध्यमवयीन, अंगावर अधिक लव असलेल्या पुरुषांमध्ये आणि खासकरून अलीकडेच वजन वाढलेल्या पुरुषांच्या नाभीत अनेकदा तयार होते.
कार्ल क्रुझेलनिकी या सिडनी विद्यापीठातील संशोधकाच्या संशोधनातून या गोष्टी समोर आल्या आहेत. डॉ. कार्ल या नावानं त्यांचे चाहते त्यांना ओळखतात.ते एक ऑस्ट्रेलियन सायन्स रेडिओ शो चालवतात. त्यांच्या एका श्रोत्यानं त्यांना नाभीत तयार होणारा तंतूमय मळ किंवा घाण कुठून येते आणि कशी तयार होते याबद्दल विचारलं होतं.
यातून क्रुझेलनिकी यांना एक ऑनलाइन सर्व्हेक्षणाची कल्पना सुचली. त्यातून त्यांनी निष्कर्ष काढला की नाभीत तयार होणारी जी कापडाच्या किंवा कापसाच्या तंतूसारखी घाण असते, ती मुख्यत: केसाळ मध्यवयीन पुरुषांना असणारा त्रास आहे.त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना 2002 मध्ये आयजी नोबेल पुरस्कारानं ( Ig Nobel Prize) सन्मानित करण्यात आलं.
(आयजी नोबेल पुरस्कार हा विशिष्ट श्रेणीतील संशोधनाला दिला जातो. 1991 पासून हा एक उपहासात्मक पुरस्कार चाकोरी बाहेरच्या किंवा किरकोळ वाटणाऱ्या वैज्ञानिक संशोधनाला दिला जातो. ज्या संशोधनामुळे आधी लोकांना हसू येतं आणि नंतर ते लोकांना विचार करण्यास भाग पडतं अशा संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जातो.)
क्रुझेलनिकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑनलाईन सर्व्हेक्षणाबरोबरच इच्छूक स्वयंसेवकांकडून नमुने गोळा केले आणि त्यांना त्यांच्या नाभी भोवतीचे केस कापण्यास सांगितलं.
नाभीभोवतीचे केस कापल्यामुळं नाभीमध्ये कापडाच्या धाग्यांसारख्या तंतूचं गोळा होणं थांबल्याचं दिसून आलं.
या वेगळ्या विषयावर स्पष्टीकरण देण्यासाठी जगातील आघाडीचे तज्ज्ञ नसताना डॉ. कार्ल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नाभीमध्ये ही विशिष्ट घाण तयार का होते यामागचं कारण सापडलं. ज्यातून किमान या विषयाचं आकलन तरी होतं.त्यांना वाटतं की, नाभीभोवतीचे केस एकाच दिशेने काम करणाऱ्या यंत्रासारखे काम करतात. तुमच्या अंगावरील कपड्यांवरील धाग्यांमधून ते लहान-लहान तंतू एकप्रकारे चोरतात आणि तुमच्या नाभीत गोळा करतात. यातून तंतूमय घाण तयार होते.
जुने कपडे असल्यास घाण कमी
जगभरातील लोकांच्या नाभीमध्ये गोळा होणाऱ्या घाणीबद्दल बोलणारी क्रुझेलनिकी ही काही एकमेव व्यक्ती नव्हती. 2009 मध्ये जॉर्ज स्टाईनहॉसर या व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकानं मेडिकल हायपोथेसिस (Medical Hypotheses)या खास जर्नलमध्ये त्याचं गृहितक प्रकाशित केलं.
(मेडिकल हायपोथेसिस हे इतर वैज्ञानिक नियतकालिकांसारखं नाही. या जर्नलमध्ये चाकोरी बाहेरच्या किंवा अपारंपारिक कल्पना कोणत्याही वैज्ञानिक आढाव्यासह प्रकाशित होतात. फक्त त्या कल्पना सुसंगतपणे आणि स्पष्टपणे व्यक्त केलेल्या हव्यात)
का कोण जाणे, स्टाइनहॉसर यांनी तीन वर्षे दररोज संध्याकाळी त्याच्या स्वत:च्या नाभीतील घाण किंवा मळ गोळा केला. ते सांगतात की ते वैयक्तिक स्वच्छतेची चांगली काळजी घेतात. दररोज सकाळी आंघोळ करतात. मात्र असू असूनही दिवसअखेर त्यांच्या नाभीमध्ये कापडाच्या धाग्यातील तंतूंसारखी घाण जमा होते. स्टाइनहॉसर यांनी स्वत:च्या नाभीमधील घाणीचे एकूण 503 नमुने गोळा केले.
या सर्वांचं एकत्र वजन एक ग्रॅम सुद्धा नव्हतं. सरासरी प्रत्येक नमुन्याचं वजन 1.82 मिलीग्रॅम इतकं होतं. यातील सात नमुन्यांचं वजन 7.2 मिलीग्रॅमपेक्षा अधिक होतं. तर एका नमुन्याचं म्हणजे तंतूमय घाणीच्या गोळ्याचं वजन 9.17 मिलीग्रॅम इतकं होतं."केस शर्टाचे बारीक किंवा लहान तंतू ओढून घेतात आणि नंतर हे तंतू नाभीमध्ये जमा करतात."
"नाभीतील घाण ही कापसाचे तंतू गोळा झाल्यानं तयार होते हे स्पष्ट होतं. कारण या घाणीचा किंवा गोळा झालेल्या तंतूंचा रंग शर्टच्या रंगासारखाच होता," असं स्टाइनहॉसर यांनी लिहिलं आहे. त्यांनी जेव्हा जुने टी-शर्ट घातले किंवा शर्ट घातले तेव्हा त्यांच्या नाभीत कमी घाण जमा झाली. कारण त्यातील मोकळे धागे किंवा तंतू आधीच साफ केले गेलेले होते.
स्टाइनहॉसर अखेर क्रुझेलनिकी यांनी काढलेल्या निष्कर्षांवरच पोचले. त्यांनीदेखील हाच निष्कर्ष काढला की नाभीच्या अवतीभवती असणारे केसच नाभीमध्ये ही तंतूमय घाण गोळा करत होते.
केस शर्टातील बारीक तंतू ओढून घेतात आणि मग हे तंतू नाभीच्या दिशेनं सरकावतात. तिथेच सर्व तंतू गोळा होतात. असं कारण त्यांनी स्पष्ट केलं."हे सर्व घडत असताना केस एकप्रकारे एखाद्या हुकप्रमाणे काम करतात," असं स्टाइनहॉसर म्हणतात.
त्यांनीसुद्धा एकदा त्यांच्या नाभीभोवतीचे केस काढून टाकले होते. डॉ. कार्ल यांनी सर्वेक्षणातून ज्या स्वयंसेवकांचा अभ्यास केला होता त्यांच्याप्रमाणेच स्टाइनहॉसर यांना देखील आढळलं की नाभीमध्ये जमा होणारी तंतूमय घाण थांबवण्यासाठी नाभीभोवतीचे केस काढून टाकणं पुरेसं आहे.
मात्र स्टाइनहॉसर यांनी त्यांचं संशोधन एक पाऊल पुढे नेलं. त्यांनी 100 टक्के कॉटनचा पांढरा शुभ्र टी-शर्ट घातल्यानंतर नाभीत जमा झालेल्या तंतूमय घाणीच्या नमुन्याचं रासायनिक विश्लेषण देखील केलं.
जर त्यांच्या नाभीत गोळा झालेले कापडाचे बारीक तंतू जर त्यांच्या टी-शर्टच्या धाग्यांमधूनच आलेले असते तर रासायनिक विश्लेषणातून दिसून आलं असतं की नाभीतील तंतूमय घाण ही पूर्णपणे सेल्युलोझपासून म्हणजे कापडाच्या धाग्यांपासून बनलेली आहे.
मात्र या विश्लेषणातून त्यांना असं आढळून आलं की, नाभीमध्ये जमा झालेल्या तंतूबरोबर इतर घाणसुद्धा गोळा झाली होती. रासायनिक विश्लेषणाच्या आधारे स्टाइनहॉसर यांना वाटतं की कापडाच्या तंतूव्यतिरिक्त घरातील धूळ, त्वचा, चरबी, प्रथिनं आणि घाम यापासून घाणीचा उर्वरित भाग बनलेला असावा. पोटावरील केस घाण गोळा करताना या विविध घटकांमध्ये फरक करत नसावेत असं दिसतं.
या आधारावर त्यांनी नाभातील घाणीमागचं स्पष्टीकरण दिलं ते असं की ज्यांच्या नाभीमध्ये तंतूमय मळ किंवा घाण जमा होते त्यांची नाभी सर्वसाधारणपणे अधिक स्वच्छ असू शकते. कारण या तंतूमय मळ काढून टाकल्यावर त्याच्यासोबत इतरही गोष्टी निघून जातात.
नाभीतील मळ किंवा घाणीबाबत संशोधन करण्यासाठी काही मोजक्याच संशोधकांनी त्यांचा वेळ आणि ऊर्जा खर्च केली आहे. किंबहुना क्रुझेलनिकी आणि स्टाइनहॉसर हे असे अपवादात्मक संशोधक आहेत. आपल्या नाभीमध्ये आणखी काय असतं हे जाणून घेण्यासाठी नॉर्थ कॅरोलिना राज्य विद्यापीठात एक गंभीर संशोधन सुरू आहे.
रॉब डन हे नॉर्थ कॅरोलिना राज्य विद्यापीठातील केक सेंटर फॉर बिहेविरल बायोलॉजी आणि जीवशास्त्र विभागातील संशोधक आहेत. ते 'बेली बटन डायव्हर्सिटी प्रोजेक्ट' या नावाच्या एका प्रकल्पावर काम करत आहेत.
"नाभी आपल्या अत्यंत जवळचं निवासस्थान आहे आणि आतापर्यत तुलनेनं ते दुर्लक्षित राहिलं आहे."
2011 मध्ये डन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर कॅरोलिनातील रॅलेघ मधील 2011 सायन्स ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये आणि रॅलेघच्या म्युझियम ऑफ नॅचरल सायन्सेस येथील डार्विन डे कार्यक्रमात 500 पेक्षा अधिक स्वयंसेवकांकडून नमुने गोळा केले. मात्र संशोधकांना फक्त नाभीतील तंतूमय घाणीत किंवा मळात रस नव्हता. किंबहुना त्यांना नाभीतील मायक्रोबायोम म्हणजे तेथील सूक्ष्मजीवाचं विश्व जाणून घ्यायचं होतं.
"नाभी आपल्या अत्यंत जवळचं निवासस्थान आहे आणि आतापर्यत तुलनेनं ते दुर्लक्षित राहिलं आहे," असं डन यांनी लिहिलं आहे. अर्थात त्यांना आपल्या नाभीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या जीवाणूंबद्दल जाणून घ्यायचं होतं.
प्रारंभिक अभ्यासातून सुरूवात करताना (त्यानंतर नमुने गोळा करण्याची दुसरी फेरी पार पडली आहे) डन आणि त्यांच्या टीमनं नाभीमध्ये दडलेली प्रचंड सूक्ष्मजीवशास्त्रीय विविधता शोधून काढली आहे. त्यांना एकप्रकारे सूक्ष्म जीवसृष्टीचा खजिनाचा सापडला आहे.
नाभीशी जीवाणूंनी जुळवून घेणं
सुरूवातीला अभ्यास केलेल्या 60 नमुन्यांमध्ये त्यांनी किमान 2,368 प्रजाती मोजल्या. त्यांना वाटतं की हा आकडा आखणी जास्त असू शकतो. एखाद्या संदर्भानिशी समजून घ्यायचं तर उत्तर अमेरिकेतील पक्षी किंवा मुंग्यांच्या जैवविविधतेच्या ते दुप्पट आहे. मात्र यातील बहुतांश प्रजाती दुर्मिळ आहेत. त्यापैकी 2,128 प्रजाती सहा जणांपेक्षा कमी लोकांच्या नाभीमध्ये होत्या.
किंबहुना यातील बहुतांश फक्त एकाच व्यक्तीमध्ये आढळले. जीवाणूंच्या बाबतीत आश्चर्यकारक विविधता असूनसुद्धा मानवी नाभीमध्ये आढळलेले बहुसंख्य जीवाणू काही मोजक्याच प्रजातीमधील आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणतीही प्रजाती सामाईक नसताना या अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी किमान 70 टक्के लोकांमध्ये आठ प्रजाती आढळल्या. एकत्रितरित्या त्या आठ प्रजातींची संख्या सापडलेल्या सर्व जीवाणूंच्या जवळपास निम्म्याइतकी होती.
संशोधकांना आर्कियाच्या तीन प्रजाती आढळल्या. हा प्रकार सहसा अत्यंत विषम हवामानात आढळतो. गंमतीची बाब म्हणजे तीनपैकी दोन प्रजाती एकाच व्यक्तीकडे सापडल्या होत्या. या व्यक्तीनं सांगितलं की त्यानं अनेक वर्षे आंघोळ केलेली नाही.
नाभीमध्ये इतकी जैवविविधता का आढळते?
डन आणि त्यांच्या टीमला वाटतं की सामान्य प्रजातींचे समूह किंवा गट मानवी त्वचेशी आणि तिथल्या वातावरणाशी किंबहुना नाभाशी जुळवून घेतात. तर उर्वरित प्रजाती अधूनमधून नाभीच्या अवतीभोवती वावरतात.
त्यांना नाभीच्या तोंडाजवळ एक साम्य दिसून येतं. नाभीमध्ये कायमस्वरुपी वास्तव्यास असणाऱ्या जीवाणूंनी तोंडाजवळच्या भागाशी जुळवून घेतलेलं दिसून येतं. तर इतर प्रजाती तिथं काही काळ दिसू शकतात मात्र दीर्घकाळासाठी त्या तिथं वास्तव्य करण्यास सक्षम नाहीत.
उदाहरणार्थ उष्णकटिबंधीय प्रदेशातील वनांमधील काही झाडं तिथं विशिष्ट पद्धतीनं जुळवून घेतात. इतर प्रकारची झाडं त्या प्रकारच्या मातीत वाढू शकतात मात्र ते तिथं मोठ्या प्रमाणात एकत्रितरित्या वाढू शकत नाहीत.
प्रचंड जैवविविधतेमुळे एखाद्या व्यक्तीच्या नाभीमध्ये कोणत्या प्रकारचे जीवाणू आढळतील हे सांगता येणं अशक्य आहे. मात्र संशोधक कोणत्या प्रजातीचे जीवाणू वारंवार आढळतील आणि कोणते क्वचित आढळतील याचा अंदाज वर्तवू शकतात.
त्यामुळे तुमच्या नाभीमध्ये नियमितपणे कापडाचे लहान तंतू जमा होऊन जर त्याचा गोळा किंवा घाण तयार होत नसेल तरीही चिंतेचे कारण नाही. कारण तुमची नाभी अजूनही अशी जागा आहे जिथं सूक्ष्मजीवांचं वास्तव्य आहे.
Published By- Priya Dixit