शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (17:03 IST)

एण्डोमेट्रीऑसिसमुळे गर्भधारणेची समस्या होते का?

DR HRISHIKESH PAI
भारतातील बर्‍याच महिलांमध्ये एण्डोमेट्रीऑसिस आरोग्य समस्या आहे. गर्भधारणेच्या वेळी ती एक सामान्य समस्या बनत चालली आहे. “एण्डोमेट्रीऑसिसची समस्या असलेली स्त्री गर्भवती होऊ शकते की नाही?”हा सवाल आज मोठ्या प्रमाणात स्त्रीरोग तज्ञांना विचारला जातो. तुम्हांला देखील हीच समस्या असून, गर्भधारणेचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल, तर ही माहिती अवश्य वाचा. इथे आपण एण्डोमेट्रिऑसिस म्हणजे काय? हे जाणून घेणार आहोत. एण्डोमेट्रिऑसिसची समस्या असलेल्या स्त्रीच्या मातृत्वाविषयी आपण महत्वपूर्ण माहिती, आणि विविध पैलूंवर चर्चा करणार आहोत. 
 
एण्डोमेट्रिऑसिस- काय आहे? 
मासिक पाळीच्या काळात शरीराबाहेर टाकले जाणारे गर्भाशयाचे अस्तर म्हणजे एण्डोमेट्रिअम. अशाप्रकारचे अस्तर जेव्हा अंडाशयाभोवती आढळते, तेव्हा त्या स्थितीला एण्डोमेट्रिऑसिस म्हंटले जाते. 
 
एण्डोमेट्रिऑसिस या आरोग्य समस्येमध्ये महिलांच्या गर्भाशयातील अस्तर जे आतील बाजूने असणे अपेक्षित असते ते त्या महिलेच्या गर्भाशयाच्या बाहेरील बाजूला असते. प्रत्येक स्त्रीचे दर महिन्याला गर्भशयातील अस्तर वाढते, जर स्त्रीबीज फलित झाले तर ते त्या गर्भाशयाच्या अस्तराला चिकटून तिथे गर्भधारणा होऊ शकते. तसेच जर गर्भधारणा नाही झाली तर त्या स्त्रीला मासिक पाळी येते व ते अस्तर त्याद्वारे बाहेर पडते.
 
मात्र, एण्डोमेट्रिऑसिसची समस्या असणाऱ्यांमध्ये एण्डोमेट्रीयल पेशींचे अस्तर शरीरातील एखाद्या दुस-या भागात असू शकतात. अशा परिस्थितीत या पेशी अंडाशय, आतडे, गुदाशय, मूत्राशय, पेल्विक भागात किंवा ओटीपोटीच्या आतील पोकळीमध्ये असण्याची शक्यता असते. एण्डोमेट्रियम पेशींची मेदयुक्त उती तुटल्याने, गर्भाशयात रक्तस्राव होतो. तथापि या रक्ताला पडण्याची जागा मिळत नसल्याने, कालांतराने त्याचे गाठीमध्ये आणि अल्सरमध्ये रूपांतरीत होते. जे बाहेरील अवयवांना चिकटून बसते. 
 
आता आपण एण्डोमेट्रिऑसिसच्या काही लक्षणांबद्दल बोलू.
 
एण्डोमेट्रिऑसिसची लक्षणे:
मुख्य सामान्य एण्डोमेट्रिऑसिसचे लक्षण म्हणजे वेदना, ज्यामध्ये तीव्र ओटीपोटाच्या वेदना आणि पेटके यांचा समावेश आहे. वंध्यत्व देखील एण्डोमेट्रिऑसिसचे लक्षण असू शकते. 
तर, आता एण्डोमेट्रिऑसिसचा गर्भधारणेवर कसा परिणाम होतो याबद्दल आपण जाणून घेऊ. 
 
एण्डोमेट्रिऑसिस समस्येचा गर्भधारणेवर कसा परिणाम होतो?
एण्डोमेट्रिऑसिसमुळे होणाऱ्या गर्भधारण समस्येला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. 
फेलोपियन ट्यूबमधून अंडाशयातील स्त्रीबीज गर्भाशयात प्रवास करत असतात. मात्र, फेलोपियन ट्यूबच्या अवतीभवती एण्डोमेट्रीयमचे अस्तर वाढल्याने, स्त्रीबीज गर्भाशयात जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. 
एण्डोमेट्रिऑसिस समस्या स्त्रीबीज आणि पुरुष शुक्राणू नष्ट करू शकतात. याचे नेमके कारण डॉक्टर सांगू शकत नसले तरी, एण्डोमेट्रिऑसिसच्या सिध्दांतानुसार शरीरात त्यामुळे मोठ्या प्रमाणात दाह निर्माण होते. आपल्या शरीरात उत्पन्न झालेल्या या प्रतिरोधक पेशी स्त्री बीज आणि पुरूष शुक्राणूला हानी पोहोचवतात. ज्यामुळे शूक्राणू आणि स्त्रीबीजाचे फलन होत नाही व गर्भधारणा होत नाही.
एण्डोमेट्रिऑसिस प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करते हे आपण आता जाणून घेतले, ह्याच्या उपचारांबद्दल माहिती घेऊयात.
 
एण्डोमेट्रिऑसिसमुळे येणाऱ्या गर्भधारण समस्यांवर उपचार:
जर तुम्हांला एण्डोमेट्रिऑसिसमुळे गर्भवती होण्यास समस्या येत असेल तर आपण मुंबईत प्रजननतज्ञांकडे उपचार घेऊ शकतात. एण्डोमेट्रिऑसिस समस्येची तीव्रता निश्चित करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेऊ शकता. 
एण्डोमेट्रिऑसिस संबंधित गर्भधारण समस्यांच्या उपचारांमघ्ये खालील प्रक्रियांचा समावेश होतो:
स्त्रीबीजाचे गोठण:
एण्डोमेट्रिऑसिस गर्भाशयातील राखीव भागांवर परिणाम करतो. म्हणूनच, जर तुम्हाला नंतर गर्भवती होण्याची इच्छा असेल तर बरेच डॉक्टर अंडी गोठवण्याची शिफारस करतात.
सुपरव्यूलेशन आणि इंट्रायूटरिन इनसेमिशन (एसओ-आययूआय)
जर फॅलोपियन ट्यूबमध्ये सौम्य एंडोमेट्रिओसिस असेल आणि आपल्या जोडीदाराकडे दर्जेदार शुक्राणू असतील तर एसओ-आययूआय प्रक्रिया ऊत्तम मार्ग आहे. ह्या प्रक्रियेमध्ये स्त्रीला स्त्रीबीज तयार करण्यासाठी काही विशिष्ट औषधे दिली जातात. स्त्रीबीज परिपक्व झाली आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी अल्ट्रासाऊंड करावे लागते. अंडे फुटण्याच्या वेळी, पुरुषाचे शुक्रजंतू साफ करुन त्यातील शुक्रजंतूंची शक्ती वाढवून ते गर्भपिशवीच्या वरच्या भागात एका छोट्याशा नळीद्वारे नेऊन सोडले जातात. अशा पद्धतीने शुक्रजंतूंना स्त्रीबीजाजवळ नेऊन सोडल्यामुळे शुक्रजंतू आणि स्त्रीबीज ह्यांचे मिलन होऊन फलन होण्याची शक्यता बळावते.
 
इन विट्रो फर्टिलायझेशन (आय.व्ही.एफ) :
गर्भवती होण्यासाठी आय.व्ही.एफ. सर्वोत्तम पर्याय आहे. या प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि पूरूष शुक्राणूंचे मिलन प्रयोगशाळेत केले जाते. त्यांचे संयोग जुळवून आणल्यानंतर गर्भाशयाच्या आत त्याचे रोपण करतात. 
या प्रक्रियेमुळे गंभीर एण्डोमेट्रिऑसिस असलेल्या बर्‍याच महिला यशस्वीरित्या गर्भवती झाल्या आहेत. 
तर, मुंबईतील आपल्या आय व्ही एफ केंद्रातील तज्ञांचा सल्ला आणि उपचार घेऊन, आपल्या एण्डोमेट्रिऑसिस स्थितीची माहिती करून घ्या, आणि शंकेच निरसन करा. 
लॅपरोस्कोपी:
गर्भाशयात एण्डोमेट्रिऑसिसमुळे वाढलेल्या एण्डोमेट्रियमच्या अवांछित पेशी लॅपरोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे काढल्या जातात. विशेष लॅपरोस्कोपिक सर्जनद्वारे एण्डोमेट्रिऑसिस शल्यक्रिया काढून टाकल्यास गर्भधारणेचे दर सुधारतात.
 
वरील सर्व उपचार प्रक्रियेबरोबरच, गर्भधारणेची शक्यता वाढविण्यासाठी निरोगी जीवनशैली देखील आत्मसात करणे आवश्यक आहे.  
गर्भधारणा निरोगी आणि आपल्या गर्भाची वाढ चांगल्याप्रकारे होण्यासाठी सदृढ आणि व्याधीमुक्त जीवनशैली अबलंबवायला हवी. 
त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:
- संतुलित वजन
- फळे, भाज्या, धान्य आणि पातळ प्रथिनयूक्त आहाराचा समावेश असावा. 
- दररोज मध्यम व्यायाम करावा (वजन उचलणे, चालणे आणि एरोबिक्सच्या वर्गात भाग घ्या)
 
भारतात एण्डोमेट्रिऑसिस असणार्‍या अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी निरोगी बाळांना जन्म दिला आहे. गर्भवती होण्यापूर्वी आपल्या गर्भधारण पर्यायांवर चर्चा करणे हीच मुख्य गोष्ट आहे.
जर, तुम्ही आई होण्याचे स्वप्न पाहत आहात, तर त्या स्वप्नांना पंख द्या. आपल्या फर्टिलिटी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन, एण्डोमेट्रिऑसिस बद्दलच्या शंका दूर करा. खास करून गेली सहा महिने प्रयत्न करून देखील जर गर्भधारणा होत नसेल, तर या गोष्टींचा विचार तुम्ही नक्की करायला हवा.
Published By -Smita Joshi