मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 17 जुलै 2019 (10:58 IST)

हँड ड्रायरखाली हात सुकवणं धोकादायक, जाणून घ्या याचे कारण

हॉटेल, थिएटरमध्ये, ‘हँड ड्रायर’खाली हात सुकवणं सर्वाधिक धोकादायक असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. टॉयलेटमध्ये हँड ड्रायरमुळे हात आणि शरीरावर बॅक्टेरिया चिकटण्याची शक्यता जास्त असून तज्ञ डॉक्टरांनी याला दुजोरा दिला आहे.
 
विमानतळ, रेस्टॉरंट, कॉर्पोरेट ऑफिस किंवा शहरातील काही टॉयलेटमध्ये हात सुकवण्यासाठी हँड ड्रायरचा वापर केला जातो. ओले हात सुकवण्यासाठी हँड ड्रायरखाली काही सेकंद हात धरले जातात. त्यामुळे हात कोरडे होतात. पण अशा पद्धतीने हात सुकवणं आरोग्यासाठी घातक आहे.
 
अॅप्लाईड आणि इन्वॉयर्नमेंटल मायक्रोबायोलॉगी जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, हँड ड्रायरखाली हात सुकवल्याने आपल्या स्वच्छ हातावर पुन्हा जंतू किंवा बॅक्टेरिया बसण्याची शक्यता असते.
 
ड्रायरच्या वापरामुळे हवेतील ‘बॅक्टेरियल पॉथजीन्स स्पोअर्स’ धारांमध्ये शिरू शकतात. ज्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. हँड ड्रायरच्या वापराने हातावर अधिक बॅक्टेरिया येण्याची शक्यता असते.
 
टॉयलेटमध्ये असणाऱ्या हवेत फ्लोटिंग बॅक्टेरिया असतात. त्यापैकी आपण हँड ड्रायरचा वापर करतो, त्यावेळी ते बॅक्टेरिया हातावर चिकटण्याची शक्यता असते. या बॅक्टेरियामुळे अनेक आजारही होऊ शकतात, असं सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी सांगितलं.
 
सशोधकांनी एक प्लेट 30 सेकंद हँड ड्रायरखाली धरली. या प्लेटवर 18 ते 60 विविध बॅक्टेरिया जमा झालेले दिसले. पण हँड ड्रायरच्या आतील बाजूस मात्र कमी प्रमाणात बॅक्टेरिया होते. हँड ड्रायर बंद करूनही प्लेट दोन मिनिटे धरली. त्या प्लेटवर कमी प्रमाणात बॅक्टेरिया आढळून आले. ही प्लेट पुन्हा टॉयलेटमध्ये फॅन सुरू ठेवून 20 मिनिटे धरण्यात आली. या प्लेटवर 15 बॅक्टेरिया सापडले. मात्र या मशिनशिवाय आपण टॉवेल किंवा टिशू वापरु शकतो आणि या मशिनचा वापर टाळू शकतो, असा सल्ला तज्ञांनी दिलाय.