सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 जुलै 2022 (09:58 IST)

मंकीपॉक्सचं पुरळ कसं ओळखायचं?

monkeypox
- मिशेल रॉबर्टस
तुमच्या अंगावर बर्‍याच कारणांमुळे पुरळ उठू शकतं. अगदी मंकीपॉक्स या नव्या विषाणूमुळे सुद्धा उठू शकतं. मात्र हे फारच क्वचित घडण्याची शक्यता आहे.
 
पुरळ कशामुळे उठलंय यासाठी आपण कोणत्या गोष्टी तपासल्या किंबहुना विचारात घेतल्या पाहिजेत?
 
खरोखरच मंकीपॉक्स असण्याची शक्यता आहे का ?
यासाठी तुम्ही स्वतःलाच पहिला प्रश्न विचारला पाहिजे. तो प्रश्न म्हणजे तुम्ही या रोगाच्या संपर्कात आला आहात असं वाटतं का? संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात आल्यास किंवा मग त्वचेचा संपर्क आल्यास हा रोग होऊ शकतो.
 
सध्या जगात मंकीपॉक्सने आजारी असलेले लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यामुळे हा आजार होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे.
 
आफ्रिकन देशांतील दुर्गम भागातही जिथं या रोगाचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे तिथल्या लहान मुलांमध्ये ही या रोगाचा प्रसार कमी प्रमाणात आढळून आला आहे.
 
जर तुम्हाला मंकीपॉक्स झाला असेल, तर तुम्हाला फ्लू सारखी लक्षणं असल्यासारखं जाणवेल. यात तुम्हाला थकल्यासारखं वाटेल. अस्वस्थ वाटेल, ताप येईल. जेव्हा हा व्हायरस तुमच्या पेशींमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो त्याचा संक्रमण कालावधी असतो असं डॉक्टर म्हणतात.
 
तुमची रोगप्रतिकारक शक्ती या संक्रमणाशी लढण्यासाठी वाढत राहील आणि त्यामुळे तुमच्या ग्रंथींना सूज आल्यासारखं वाटेल.
 
पुढे शरीरावर लालसर चट्टे उठतील. नंतर त्याच रूपांतर पुरळ येण्यामध्ये होईल. हे पुरळ उठण्याचेसुद्धा टप्पे आहेत. सुरवातीच्या टप्प्यात चपट आणि लाल रंगाचे पुरळ उठेल. नंतर हे चपटे फोड मोठे आणि गोल होतील. आणि त्यानंतर त्याठिकाणी खपली येईल.
 
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे सदस्य डॉ. रोसामुंड लुईस सांगतात की, "या संसर्गाची सुरुवात आपण ज्याला मॅक्युल्स म्हणतो त्यापासून होते. सुरुवातीला शरीरावरील तो भाग फक्त लालसर होतो. नंतर त्याच रूपांतर फोडांमध्ये होतं. या सर्व टप्प्यांत तुम्हाला हे जाणवतं की हा संसर्ग पसरतो आहे."
 
ते लाल फोड नंतर सुजू लागतात. आणि त्यात पस तयार होतो.
 
हे फोड नंतर कोरडे होऊ लागतात आणि त्या जागेवर खपली धरते. शेवटच्या टप्प्यात खपली धरल्याने संसर्ग बरा होतो आणि थांबतो.
 
"या मंकीपॉक्सला कांजिण्या समजून लोकांचा गोंधळ उडू शकतो." असं डॉ. लुईस म्हणतात.
 
मंकीपॉक्सचे पुरळ सहसा चेहऱ्यावर उठायला सुरू होतं. कधीकधी ते तोंडात आणि नंतर काखेत, पायांवर, हातांवर आणि संपूर्ण शरीरावर पसरायला सुरुवात होते.
 
अलीकडील काही प्रकरणांमध्ये मंकीपॉक्सचे पुरळ जांघेत जननेंद्रियाच्या आसपास उठलेलं दिसले. डॉ लुईस म्हणतात, "तिथलं पुरळ कदाचित दिसणार नाही कारण तो भाग झाकलेला असतो."
 
त्वचेच्या पोतानुसार हे पुरळ ही वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. यांचा संसर्ग कपडे, अंथरून पांघरुणातून ही झाल्याचं समोर आलं आहे.
 
त्वचेत काही बदल किंवा जखम जाणवल्यास, विशेषत: गुप्तांगांच्या आसपास. तर लोकांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा.
 
ब्रिटीश असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्टच्या अध्यक्ष डॉ. तान्या ब्लेकर सांगतात, "विविध प्रकारच्या संसर्गात जे पुरळ उठतं त्यात फरक करणं कठीण आहे. त्यामुळे शंका असल्यास एजन्सीचा सल्ला लक्षात घेऊन तपासणी करावी."
 
आणखीन कोणत्या संसर्गात पुरळ उठू शकतं?
पुरळ उठण्याच्या बऱ्याच शक्यता आहेत. पण काही समान अशा संसर्गजन्य आजारातही पुरळ उठतं.
 
कांजिण्या
कांजिण्या आल्यावर अंगावर पुरळ उठून त्याला खाज सुटते. ही लक्षणं मंकीपॉक्स सारखी असून शेवटच्या टप्प्यात खपली धरून हा आजार बरा होतो.
 
तुमच्या आयुष्यात तुम्हाला एकापेक्षा अधिकवेळा कांजिण्या उठू शकतात. तुम्हाला लहानपणी कांजिण्या येऊन गेल्या असतील तरी प्रौढ झाल्यावरही त्याचा संसर्ग होऊ शकतो.
 
कांजिण्यांचे विषाणू पुन: सक्रिय होतात आणि पुरळ उठतं याला शिंगल्स म्हणतात. याचे चट्टे वेदनादायक असतात.
 
खरुज
खरुज त्वचेमध्ये अंडी घालणाऱ्या माइट्समुळे होतो. यामुळे अंगाला खूप खाज सुटते आणि त्वचा लाल होते. याचे पुरळ शरीरावर कुठेही येऊ शकतं. पण बऱ्याचदा दोन बोटांच्या बेचक्यात ही खरूज उठते.
 
तुम्हाला त्वचेवर रेषा किंवा पुरळाचे अगदी बारीक बारीक ठिपके दिसतील. हा संसर्ग तितका गंभीर नसला तरी तो संसर्गजन्य आहे. आणि त्यावर उपचार करणं आवश्यक आहे.
 
ढेकूण किंवा एखादा किडा चावल्यास
तुम्ही ज्या बेडवर किंवा गादीवर झोपता त्याला जर ढेकूण झाले असतील तर हे किडे तुम्हाला चावू शकतात. ढेकूण लहान असल्याने चटकन लक्षात येत नाहीत.
 
हे ढेकूण किंवा कोणतेही इतर कीटक चावल्यास त्या ठिकाणी खाज सुटते. त्वचा लाल होते. अंगावर बारीक बारीक पुरळ येतं.
 
सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन (STI)- सिफिलीस किंवा हर्पिस उठल्यास
 
सिफिलीस (गरमी) हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवल्यास या रोगाची लागण होते. तर जननेंद्रियाच्या भागात हर्पिसचं पुरळ उठणं हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा सुद्धा लैंगिकरित्या संक्रमित होऊ शकतो.
 
या दोन्ही रोगांमध्ये शरीरावर फोड येतात. तुम्हाला सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन म्हणजेच एसटीआय आहे असं वाटत असेल तर शक्य तितक्या लवकर चाचणी करून आणि उपचार घेणं आवश्यक आहे.
 
अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी / अॅलर्जी / अर्टिकेरिया
 
जेव्हा आपल्या शरीराला असं वाटत की आपल्याला काहीतरी धोका आहे तेव्हा शरीर त्यावर प्रतिक्रिया देतं. ती प्रतिक्रिया म्हणजे अंगाला खाज सुटणे, लाल पुरळ, चट्टे उठणे.
 
शरीर असा प्रतिसाद का देतं याचं मूळ कारण कधीकधी सापडत नाही. पण शक्यतो आपल्या खाण्यातून किंवा विशिष्ट वनस्पती, रसायनं किंवा औषधं यांच्याशी संपर्क आला की शरीरावर अशी अॅलर्जी होते.
 
मोलोस्कम
हा विषाणूजन्य संसर्ग असून बहुतेकदा मुलांमध्ये दिसून येतो. याचा त्रास नसला तरी हा संसर्ग संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. यात अंगाला खाज सुटते, अंगावर कडक असे फोड येतात.
 
या फोडाच्या मध्यभागी एक लहान बी असते. या संसर्गाचे पुंजके सहसा काखेत, गुडघ्यांच्या मागे किंवा मांडीवर आढळतात. हा संसर्ग त्वचेच्या संपर्कातून किंवा टॉवेलसारख्या वस्तूंमधून पसरतो.
 
हात, पाय आणि तोंडाचा संसर्ग झाल्यास
हा विषाणू संसर्गजन्य असून खोकल्यावाटे, शिंकेवाटे तसेच घरगुती वस्तूंद्वारे पसरतो. यामध्ये फ्लू सारखी लक्षण दिसतात, तोंडात फोड येतात.
 
हातापायांच्या तळव्यावर लाल पुरळ येऊ शकतं. हा संसर्ग स्वतःहून बरा होतो.
 
इम्पेटिगो
हा संसर्गजन्य जीवाणू आधीच खराब झालेल्या त्वचेला संक्रमित करतो. या जीवणूमुळे चेहऱ्यावर लाल चट्टे उठतात.
 
पस वाहू लागतो. त्या ठिकाणी फोड येतात. हा संसर्ग गंभीर दिसत असला तरी अँटीबायोटिक क्रीमने बरा करता येऊ शकतो.