शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (13:47 IST)

सालं काढून फळं खात असाल तर, सावधान...

Fruits
अनेक लोक फळं आणि भाज्या खाण्याच्या आधी सोलायला घेतात. प्रत्येकवेळी त्याची गरज नसते.
भाजी आणि फळाच्या सालात अतिशय महत्त्वाचे घटक असतात. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे टाकून दिलेली सालं तर जागतिक तापमानवाढीचा धोका वाढवतात. फळं, भाज्यांमध्ये अनेक व्हिटामिन्स, मिनरल, फायबर्स, असतात. असे पोषणयुक्त पदार्थ खाल्ले नाहीत तर हृदयरोग, मधुमेहासारखे अनेक आजार होतात.

2017 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या एका अहवालानुसार, जगात 39 लाख लोकांचा मृत्यू असा पोषणयुक्त आहार न घेतल्याने झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सूचना केल्याप्रमाणे रोज आहारात 400 ग्रॅम फळं आणि भाज्या खायला हव्यात. अनेक लोकांसाठी ते कठीण आहे. अशा परिस्थितीत फळं आणि भाज्या सालीसकट खाल्ल्या तर लोकांच्या आहारात योग्य पोषणमुल्य असलेल्या गोष्टी जातील का, हा खरा कळीचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. उदा. बीटरुट, गाजर, रताळं, आलं, बटाटे  अशा जमिनीच्या आत उगवलेल्या भाज्यांच्या सालीत व्हिटामिन सी, रायबोल्फेविन, लोह, झिंक हे पोषणघटक आढळतात.

अमेरिकेच्या शेतकी विभागानुसार साल न काढलेल्या सफरचंदात 15 टक्के जास्त व्हिटामिन, 267 टक्के जास्त व्हिटामिन के, 20 टक्के अतिरिक्त कॅल्शिअम, 19 टक्के अतिरिक्त पोटॅशियम आणि 85 टक्के जास्त फायबर आढळतात.
 
तसंच सालींमध्ये फ्लॅवोनाईड्स, पॉलिफेनॉल्स नावाची द्रव्यं असतात. त्यांच्यात अँटिऑक्सिडंट आणि अँटिमायक्रोबियल तत्त्वं असतात.
 
साली कचऱ्यात टाकल्या तर त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो. संयुक्त राष्ट्रांच्या खाद्य आणि शेती विभागाच्या मते न खाल्लेलं अन्न, साली यांच्यामुळे 8 टक्के ते 10 टक्के हरितवायू उत्सर्जन होतं.
जे अन्न जमिनीत जाऊन सडतं त्यामुळे मिथेन वायू उत्सर्जित होतो. हा अतिशय महत्त्वाचा हरितवायू आहे.
न्यूझीलंडची लोकसंख्या फक्त 51 लाख आहे. तिथे दरवर्षी 13,658 टन भाज्या वाया जातात आणि 986 टन फळांच्या साली वाया जातात.
 
सालींमुळे अन्न वाया जाण्याचं प्रमाण पाहता लोक सालं का काढतात, हा प्रश्न राहतोच.
काही फळांच्या साली काढाव्याच लागतात कारण ते भाग खाण्यालायक नसतात, त्यांची चव चांगली नसते, त्यांची स्वच्छता करणं कठीण असतं, त्यामुळे कचरा होतो.
 
उदा. केळ, संत्री, टरबूज, अननस, आंबे, अव्होकॅडो, कांदा आणि लसूण. बरेचदा तो त्या पाककृतीचा भाग असतो. उदा. जेव्हा मॅश पोटॅटो. मात्र बटाटा, बीट, गाजर, किवी, काकडी यांच्या साली खाण्यालायक असतात. मात्र लोक त्यांची सालं काढतात.

कीटकनाशकांचा अंश
कीटकनाशकाचा काही अंश फळांच्या आणि भाज्यांच्या सालीत असतो. त्यामुळे फळाचं साल काढण्याकडे लोकांचा कल असतो. फळांच्या सालीवर कीटकनाशकांचा अंश असतोच. ते प्रत्येक फळ किंवा झाडावर अवलंबून असतं. मात्र तो अंश स्वच्छ फळं- भाज्या स्वच्छ धुवून काढता येतो. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनातर्फे भाज्या आणि फळं थंड पाण्याने स्वच्छ धुवून त्यावर एक ब्रशने कीटकनाशक, धूळ, रसायनं सगळं काढण्याचा सल्ला दिला जातो.

अन्नपदार्थ उकळल्याने आणि वाफवल्यानेही कीटकनाशकांचा अंश फळ आणि भाज्यांवरून निघून जातो.
मात्र सर्वच कीटकनाशकं धुतल्याने जात नाही. हीच भीती मनात ठेवून मग लोक साल काढत राहतात.
काही देशात फळं आणि भाज्यांवर किती प्रमाणात कीटकनाशकं फवारली आहेत याचं प्रमाण देण्यात येतं. त्यामुळे किती साल काढायचं याचा अंदाज येतो.
 
फळांच्या सालीचं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला ऑनलाईन टिप्स मिलतील. तसंच या सालीचं खत कसं तयार करायचं, त्या सालींमधून काही पदार्थ तयार करता येतील का याचीही माहिती ऑनलाईन मिळू शकते.
 
थोडंसं संशोधन केलंत किंवा सर्जनशीलता दाखवली फळं आणि भाज्यांचं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. एकदा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. काय वाटतं?  

Published By- Priya Dixit