बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2022 (20:29 IST)

सेक्स करणं थांबवल्यास तुमच्यावर 'हे' 7 परिणाम होऊ शकतात...

तुमच्या सेक्सच्या 'दुष्काळा'ची कारणं काहीही असोत; मग ते ब्रेकअपचं असो वा व्यग्र वेळापत्रकाचं असो किंवा अगदी सेक्सपासून ब्रेक घेण्याचं असो, पण सेक्स करण्यातलं अंतर वाढवलंत, तर तुमच्या आरोग्यावर मात्र त्याचे परिणाम दिसू लागतील.
 
नियमित सेक्स तुम्हाला केवळ आनंदी ठेवत नाही, तर निरोगी सुद्धा ठेवण्यास मदत करतं. सेक्स करणं थांबवल्यास आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात, हे पाहूया.
 
1) हृदयाच्या आरोग्यावर परिणाम
बऱ्याच काळापासून सेक्स न करणं हे हृदयासाठी चांगलं नाहीय. 'सेक्सचा दुष्काळ' हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांना निमंत्रण देतं.
 
सेक्स केवळ अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यासाठीच नव्हे, तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीतला समतोलपणा राखण्यासही मदत करतं. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांची शक्यता कमी होते.
 
2) तणाव आणि चिंतेच्या पातळीत वाढ
लैंगिक संभोगादरम्यान एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन यांसारखे 'हॅपी हार्मोन्स' शरीरात तयार होतात. जर तुम्ही काही काळ लैंगिक आयुष्याला थांबवलंत, तर तुमच्या शरीरात हे दोन्ही हार्मोन्स स्रवत नाहीत. परिणामी तणाव आणि चिंता या दोन समस्यांमध्ये वाढ होते.

3) स्मरणशक्तीसंबंधी समस्या
सेक्सची कमतरता तुम्हाला विसराळूपणाला बळी पाडू शकते. काही अभ्यासांमधून हे दिसून आलंय की, लैंगिक आयुष्य थांबवल्यानंतर अनेकांना स्मरपणशक्तीसंदर्भात अडचणी निर्मण झाल्या आहेत.
 
त्याचवेळी, नियमितपणे सेक्स करणाऱ्यांमध्ये स्मरणशक्तीची क्षमता वाढल्याचे दिसून आलीय. हे निरीक्षण विशेषत: 50 ते 89 या वयोगटात दिसलंय.
 
4) कामेच्छा कमी होते...
'सेक्सचा दुष्काळ' तुमच्यामधील कामेच्छाही कमी करू शकते. केवळ तुमचं नियमित लैंगिक आयुष्यच तुमची कामेच्छा वाढवू शकतं. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त लैंगिक आयुष्य असेल, तेवढं तुम्हाला भविष्यात ते अधिक करावं वाटेल.
 
5) रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम
तुमच्या आयुष्यात 'सेक्सचा दुष्काळ' असल्यास तुमचं शरीर सर्दी आणि फ्लूला निमंत्रण देऊ शकतं. नियमित सेक्स शरीराला आजारांशी लढण्यासाठी तयार करतं. शरीरात 'इम्युनोग्लोबुलिन ए' या अँटी-बॉडीची पातळी वाढवतं.
 
6) योनी आरोग्य
दोन सेक्समध्ये बरंच अंतर असल्यास योनीवरती परिणाम दिसून येतात. अशामुळे चांगल्या सेक्ससाठी आवश्यक असणारा योनीमध्ये कामसलील तयार होण्यास वेळ लागतो तसेच उद्दिपित होण्य़ासाठीही वेळ लागतो.
 
नियमित सेक्समुळे किंवा हस्तमैथुनामुळे योनीमध्ये रक्तप्रवाह वाढल्यामुळे तेथील टिश्यू (उती, मेदतंतू)चे आरोग्य चांगले राहाते.
 
7) खाज आणि वेदना
वेदना आणि खाजेपासून मुक्ती मिळवण्यासाठी चांगला ऑर्ग्याजम एक उत्तर असू शकतं. सेक्सच्या काळात स्रवणाऱ्या एंडॉर्फिन आणि इतर रसायनांमुळे डोके, पाय, पाठ यावरील खाज कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे संधीवात आणि पाळीच्यावेळेस होणाऱ्या वेदना कमी होऊ शकतात.
 
सेक्समधून मिळू शकणारे हे फायदे असले तरी चांगले आरोग्य राहाण्यासाठी सेक्स हा काही एकमेव मार्ग नाही. प्रत्येकाची सेक्सबद्दलची इच्छा वेगवेगळी असू शकते. सेक्सच्या दुष्काळासारखी स्थिती येणं अगदीच सामान्य आहे.