शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (22:57 IST)

मेनोपॉज : 'पाळी थांबून दोन वर्षं झालीयेत, आता संबंध ठेवताना खूप त्रास होतो, नकोच वाटतं'

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी
प्रसंग पहिला- “डॉक्टर,माझी पाळी थांबून आता दोन वर्ष झाली आहेत. अलीकडे संबंध येताना खूप दुखायला लागलंय. अक्षरशः नको वाटतं ते. नवऱ्याला कितीही सांगितलं समजावून तरी खोटंच वाटतं. मग चीडचीड, भांडणं...काय करू मी?”
 
पेशंट अगदी रडकुंडीला आली होती.
 
प्रसंग दुसरा- “डॉक्टर, आज माझ्या मैत्रिणीला घेऊन आलीये तुमच्याकडे. गेले काही महिने मी बघतीये तिची तब्येत बिघडतच चाललीये. पूर्वी इतकी उत्साही असायची सगळ्या गोष्टी करण्यात, पण गेल्या वर्षी तिचं गर्भपिशवी काढण्याचं ऑपरेशन झालं आणि आमची आनंदी खेळकर मैत्रीण हरवलीच त्यानंतर. सतत उदास असते, तिची सध्या नवऱ्याशी पण खूप भांडणं होताहेत.”
 
अशी पार्श्वभूमी वर्णन केल्यानंतर माझी पेशंट तिच्या मैत्रिणीला केबिनमध्ये घेऊन आली.
 
फिकुटलेला चेहरा, वाढलेले वजन, ढगळ कपडे आणि विस्कटलेले केस असं सगळं बघूनच अंदाज आला.
 
पेशंटशी बोलल्यावर असं लक्षात आलं की गर्भपिशवीच्या ऑपरेशन नंतर तिने ‘आता आपण स्त्रीत्व गमावलंय’ असा मनोग्रह करून घेतला होता. फायब्रोईड्समुळे अनेक महिने अतिरक्तस्त्राव अंगावर काढल्यावर नाईलाजाने ऑपरेशनचा निर्णय तिने घेतला होता, तरीही अजून हे ऑपरेशन करायला नकोच होतं, तसंच सहन करता आलं असतं मेनोपॉजपर्यंत अशी भाबडी समजून करून घेऊन पेशंट स्वतः ला दूषणे देत होती.
 
या पेशंटला आजूबाजूच्या लोकांच्या कंमेंट्स आणि तिची स्वतःची चुकीची मानसिकता यामुळे वयाच्या जेमतेम 48व्या वर्षी ‘आता आपलं सक्रिय आयुष्य संपलं’ असं उगीचच वाटत होतं. त्याचाच परिणाम तिच्या लैंगिक आयुष्यावर आणि परिणामी नवरा-बायकोच्या नात्यावरही झाला होता.
 
मेनोपॉजमधून जाणाऱ्या, पाळी थांबलेल्या किंवा त्याकाळात आरोग्याच्या काही समस्या निर्माण झालेल्या बऱ्याचशा स्त्रियांची ही समस्या असते. खरंतर मेनोपॉजच्या काळातील लैंगिक आयुष्याविषयीच्या समस्या घेऊन खूप कमी महिला आम्हा स्त्रीरोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी येतात.
 
बाकीच्या हा भाग त्यांच्या जीवनातून संपला असं गृहीत धरून ‘ते’ दार कायमचं बंद करून घेतात.
 
मेनोपॉजच्या काळात शरीरातील हार्मोन्स कमी कमी होत गेल्यामुळे योनीमार्गात कोरडेपणा येऊ लागतो. यामुळे काही स्त्रियांना लैंगिक संबंधांमध्ये त्रास होऊ लागतो.
 
या त्रासामुळे लैंगिक इच्छा कमी होऊ लागतेआणि त्यांच्या जोडीदाराची मात्र लैंगिक इच्छा टिकून असते . मुलं मोठी झालेली असतात आणि स्त्रिया स्वतःची अशी समजूत करून घेतात की आता लैंगिक आयुष्य संपले आहे.
 
ही अत्यंत चुकीची समजूत आहे आणि यात पुरुषांचाही अतिशय कोंडमारा होतो. त्याचा परिणाम दोघांच्याही वैवाहिक आयुष्यावर आणि मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो.
दरवर्षी 18 ऑक्टोबरला वर्ल्डस मेनोपॉज डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे मेनोपॉजविषय जागरुकता निर्माण करणे हा उद्देश असतो. याच निमित्ताने मेनोपॉजच्या टप्प्यात असलेल्या स्त्रियांमधले सेक्स लाइफबद्दलच्या गैरसमजाबद्दल बोलूया.
 
पण त्याआधी आपण मेनोपॉज म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती, याबद्दल जाणून घेऊया.
 
मेनोपॉज म्हणजे काय?
मेनोपॉज म्हणजेच मराठीत रजोनिवृत्ती. थोडक्यात बाईची पाळी थांबते त्याला मेनोपॉज म्हणतात. वयाच्या 51 व्या वर्षांपर्यंत स्त्रियांना मेनोपॉज होऊ शकतो.
 
हा स्त्रियांच्या प्रजननचा शेवटचा टप्पा असतो आणि यानंतर एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात होणार असते.
 
या दरम्यान स्त्रियांची मासिक पाळी अनियमित व्हायला सुरुवात होते. या स्टेजला पेरी-मेनोपॉज म्हणतात. वयाच्या 46 व्या वर्षी हे घडायला सुरुवात होते.
 
मेनोपॉज व्हायच्या आधी स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते, जास्त ब्लिडिंग होतं. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवायला लागतो. अशा भावना निर्माण होतात, ज्या आधी कधीच अनुभवलेल्या नसतात.
 
हे का होतं?
स्त्रियांमधील हार्मोन्सची पातळी बदलत असते. स्त्रियांची पाळी नियंत्रित करण्यामागे इस्ट्रोजेन या हार्मोनचा वाटा असतो. स्त्रियांच वय जसजसं वाढत जातं तसतसं त्यांच्या अंडाशयातील स्त्रीबीजं कमी होतात.
 
इस्ट्रोजेनची लेव्हल कमी जास्त होत असते, आणि नंतर तर ती कमी होऊन जाते आणि याच दरम्यान मेनोपॉजची लक्षणं दिसून येतात.
 
पण एका रात्रीत हे सगळं घडत नाही.यासाठी बरीच वर्ष जावी लागतात. हे हार्मोन्स टप्प्याटप्प्याने कमी होतात. आणि नंतर अगदीच कमी प्रमाणावर स्थिर राहतात. पण जेव्हा हार्मोन्स कमी होत असतात तेव्हा स्त्रियांच्या शरीरातही बदल घडत असतात.
 
जेव्हा अंडाशयात स्त्रीबीज तयार होणं थांबतं तेव्हा गर्भधारणा शक्य नसते आणि मेनोपॉज झालेला असतो.
 
मेनोपॉजच्या काळात लैंगिक संबंधाची इच्छा कमी का होते?
इस्ट्रोजेन नावाच्या हॉर्मोनची कमतरता मेनोपॉज आलेल्या स्त्रियांमध्ये दिसून येते.त्यामुळे योनीमार्ग कोरडा पडतो आणि हुळहुळा होतो. अशावेळी स्त्रियांना संबंध ठेवताना त्रास होतो.
 
लैंगिक संबंधांतील सातत्य) जितके कमी कमी होत जाईल तितकी स्त्रीची लैंगिक इच्छा कमी कमी होत जातेआणि मग योनिमार्ग झपाट्याने आकुंचन पावू लागतो.त्यामुळे स्त्रीला लैंगिक संबंधाच्या वेळी दुखू लागते आणि ती असे संबंध अजूनच टाळू लागते. हे दुष्टचक्र चालू होऊन पतीपत्नीच्या नात्याला ग्रहण लावते.
 
पण हे सगळं टाळता येणं सहज शक्य आहे.
 
नैसर्गिक गोष्टी म्हणून योनीमार्गाचा कोरडेपणा, संसर्ग याकडे दुर्लक्ष न करता याबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला वेळीच घेणे अत्यावश्यक आहे.
 
योनीमार्गाचा कोरडेपणा घालवण्यासाठी उत्तम क्रीम्स आणि जेल (gel) उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून स्त्रियां लैंगिक आयुष्याचा उत्तम आनंद घेऊ आणि देऊ शकतात.
 
गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करायची वेळ शक्यतो मेनोपॉजच्याच काळात येते. गर्भपिशवीचं ऑपरेशन झाल्यावर साधारणपणे दोन महिन्यानंतर लैंगिक संबंध पूर्ववत पणे सुरू होण्यास काहीच हरकत नसते. .त्यामुळे ऑपरेशन झालं म्हणून लैंगिक आयुष्य आता संपलं असा समज करून घेण्याचे काहीच कारण नाही.
 
योग्य तो वैद्यकीय सल्ला, आहार-विहार आणि औषधं
45 ते 50 या वयात रक्तदाब, मधुमेह हे नकोसे पाहुणेही दाराबाहेर उभेच असतात. मेनोपॉज नंतर हाडे ठिसूळ होण्याची सुरवात होते तसेच हृदयाला हॉर्मोन्सचे असणारे संरक्षणसुद्धा संपत येत असते.
 
त्यामुळे तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घेणे हे अत्यावश्यक आहे.
 
या वयात लागणाऱ्या व्हिटॅमिन्स,कॅल्शियम च्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर घ्याव्यात.
 
नियमित एक तास व्यायाम झालाच पाहिजे.
 
आपल्या समाजात वाढता मधुमेह बघता कार्बोदकांचे प्रमाण कमी करणे खूप फायद्याचे राहील. भात, बटाटा, मैदा, साखर, पोळी जमेल तितके कमी करून भाकरी, डाळी-उसळी,चिकन, अंडी या पदार्थांचे प्रमाण वाढवणे योग्य आहे.
 
दरवर्षी एकदा आवश्यक त्या तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की कराव्यात.
 
योनीमार्गाच्या कोरडेपणा मुळे विशेषतः मधुमेह असेल तर वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग,खाज सुटणे असे प्रकार होतात. मधुमेह नियंत्रणात आणणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय औषधांचा गुण येत नाही.पण वेळीच वैद्यकीय सल्ला आणि तपासण्या करून घेणे आवश्यक आहे.
 
मेनोपॉजनंतर हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते. हाडे,सांधे,स्नायूदुखी सुरू झाल्यास वैद्यकीय सल्ल्याने कॅलशियम, व्हिटामिन डीच्या गोळ्या घ्यायला हरकत नाही, मात्र फक्त या गोळ्या घेऊन व्यायाम न केल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही.
 
मेनोपॉजच्या काळात काही विशेष सूक्ष्मपोषक द्रव्ये म्हणजे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स घेतल्याने खूप फायदा होतो. ती आम्ही या पेशंट्सना जरूर देतो. कॅल्शिअमच्या गोळ्या काही जणींना खूप उपयोगी ठरतात.
 
'हॉट फ्लशेस' च्या रुग्णांसाठी काही हॉर्मोन्स नसलेल्या उत्तम गोळ्या उपलब्ध आहेत.
 
क्वचित काही वेळा मात्र मेनोपॉजचा त्रास खूप जास्त असल्यास हॉर्मोन्सच्या गोळ्या देत येतात अर्थात पूर्णपणे वैद्यकीय देखरेखीखालीच.
 
पती-पत्नीमधला संवाद, समुपदेशही आवश्यक
वर सगळे सांगितलेल्या वैद्यकीय गोष्टी पाळल्या की मेनोपॉजचा बाऊ न करताही शारीरिक संबंध उत्तम राहू शकतात, पण ते करायची इच्छाशक्ती हवी.
 
मेनोपॉज तर जाऊ द्या 42-43 वर्षाच्या कित्येक बायका मला क्लिनिकमध्ये सांगतात की, गेली काही वर्ष ‘तसलं’ काही नाही हो आमच्यात.
 
अशावेळी त्यांच्या सहजीवनाची काळजी वाटायला लागते. मानवी शरीराच्या मूलभूत गरजांकडे असं पूर्ण दुर्लक्ष केल्याचे परिणाम पतीपत्नींमध्ये वाढत जाणाऱ्या भांडणांमध्ये दिसायला लागतात.
 
एक अतिशय महत्त्वाचा मुद्धा म्हणजे मधुमेह ,रक्तदाब यासारख्या आजारांमुळे काहीवेळा पुरुषांना लैंगिक समस्या निर्माण होतात. पण त्यावर उपचार घ्यायला हे पुरूष अजिबात तयार नसतात. अशावेळी त्यांना समुपदेशनाची खूप गरज असते.
 
या सगळ्या परिस्थिती वाढत्या वयातही स्त्रीपुरुषांनी त्यांचे वैवाहिक जीवन तजेलदार ठेवण्यासाठी एकमेकांना वेळ देणे, मधून मधून दोघांनीच बाहेर जाणे आवश्यक आहे तसेच स्वतःला आकर्षक ठेवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
 
एकदा लग्न झालं "आता हा किंवा ही कुठे जाणार आहे मग कशाला चांगलं दिसायचा प्रयत्न करा?" ही वृत्ती वैवाहिक जीवनासाठी मारक आहे.
 
नियमित व्यायाम करून शरीर शक्य तेवढे बांधेसूद ठेवणे हे निरोगी आयुष्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच पतीपत्नींच्या कामजीवनासाठीही अतिशय आवश्यक आहे.
 
आपल्या समाजात घरांमध्ये जोडप्यांना जराही एकांत देण्याबद्दल बिलकुल जागरुकता दिसून येत नाही.एकदा लग्न झालं की त्यांच्यातला रोमान्स संपायला हवा असंच वातावरण निर्माण केलं जातं. चार लोकांमध्ये पतीने पत्नीचा हात धरणे किंवा खांद्यावर हात टाकणे हे सुद्धा काहींच्या कपाळावर आठ्या आणू शकतं. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना वेगळं झोपवायला हवं याबद्दलही कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत.
 
त्यामुळे वय वाढल्यानंतरही पती-पत्नीने दोघांना एकत्र वेळ कसा मिळेल, हे पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे जरा वय वाढलं की ज्येष्ठ जोडप्यांचं कामजीवन संपलं असं अजिबात नाही
 
एकमेकांचा स्पर्श आणि सहवास ज्येष्ठांसाठी खूप आश्वासक आणि सकारात्मकता देणारा असतो.
 
एकूणच मेनोपॉज आणि नंतरच्या काळात नियमित लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पती आणि पत्नी दोघांनीही मनापासून प्रयत्न करायला हवेत. शेवटी सर्वात महत्वाचा लैंगिक अवयव हा मानवी मेंदू आहे हे लक्षात घ्यायला हवं. (Brain is the most important sex organ).
 
चाळिशीनंतरही निरामय कामजीवन पतिपत्नी दोघांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, त्यात गैर किंवा चुकीचं काहीच नाही.