मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : रविवार, 21 मे 2023 (17:33 IST)

गोड चवीसाठी कृत्रिम साखर वापरत असाल तर हे नक्की वाचा..

भारतात घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना चहा-पाणी विचारणं अगदी सामान्य गोष्ट आहे. जर एखाद्या पाहुण्याने सरबत किंवा लस्सी ऐवजी चहा मागितला, तर मग त्याला किती गोडाचा चहा हवा हे विचारावं लागतं.
मग काही पाहुणे असे देखील असतात जे म्हणतात, "आरोग्याची काळजी म्हणून मी साखर खायचं सोडून दिलंय. मी आजकाल चहा-कॉफीमध्ये शुगर फ्री वापरतो."
 
पण जर साखर खाणं सोडून दिलं किंवा शुगर फ्री किंवा आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर केला तर तुमचं वजन कमी होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) म्हणणं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचं नेमकं म्हणणं काय आहे?
संयुक्त राष्ट्रांची आरोग्य संघटना असलेल्या डब्ल्यूएचओने आपल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नॉन-शुगर स्वीटनर्स (एनएसएस) न वापरण्याचा सल्ला दिला आहे. एनएसएस म्हणजे गोडवा देणारी पण साखर नसलेली गोष्ट.
 
डब्ल्यूएचओने ही शिफारस काही पुनरावलोकनांच्या आधारे केली आहे. यात असं आढळून आलंय की, आर्टिफिशियल स्वीटनर वजन कमी करण्यात मदत करत नाहीत किंवा संबंधित रोगांचा धोकाही यामुळे कमी होत नाही.
 
शिवाय, साखरेऐवजी एनएसएस वापरल्याने प्रौढ किंवा मुलांचं वजन कमी होत नसल्याचं आढळून आलं आहे.
 
डब्ल्यूएचओचे पोषण आणि अन्न सुरक्षा संचालक फ्रान्सिस्को ब्रँका म्हणतात, "लोकांनी साखरेचा वापर कमी करण्यासाठी नैसर्गिक गोडवा असलेले पदार्थ, फळं, पेयं, आदी पर्याय शोधले पाहिजेत."
 
त्यांच्या मते, "एनएसएस मध्ये कोणतेही पौष्टिक मूल्य नसते. लोकांनी आरोग्य सुधारण्यासाठी त्यांच्या आहारातील साखर लवकरात लवकर कमी करण्यावर भर दिला पाहिजे."
 
कोणकोणत्या गोष्टींमध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स असते?
टूथपेस्ट, स्किन क्रीम आणि औषधांमध्ये एनएसएसचा वापर केला जातो. मग आपणही त्याचा वापर करायला पाहिजे का?
 
डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की, स्वत:ची काळजी घेण्यासाठी, स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांना ही शिफारस लागू होत नाही.
 
सुक्रालोज, एस्पार्टम, निओटेम आणि स्टीव्हिया हे नेहमीच्या वापरातील एनएसएस आहेत. सर गंगाराम हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजी आणि मेटाबॉलिझम विभागाचे डॉ. सुरेंद्र कुमार म्हणतात की हे सर्व आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत. आपण जर एक किंवा दोन आठवडे याचा वापर करत असू तर ठीक आहे. पण याच्या सततच्या वापरामुळे वाईट परिणाम होऊ शकतात.
 
त्यांनी याविषयीचं एक उदाहरण सांगितलं. ते म्हणतात, "आपण गोडपणासाठी स्टीव्हिया वनस्पतीच्या पानांचा थेट वापर करीत असू तर ठीक आहे. पण कोणतीही प्रक्रिया केलेल्या गोळ्या खाणे शरीरासाठी हानिकारक ठरेल."
 
मधुमेहग्रस्त लोक याचा वापर करतात. आम्ही डॉक्टरांना यासंबंधी प्रश्न विचारले
 
मधुमेही रुग्णांनी साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरणं योग्य आहे का?
डॉ सुरेंद्र कुमार म्हणतात, मधुमेही रुग्णांनी कोणत्याही स्वरूपातील एनएसएसचा वापर करू नये. कधीतरी चव यावी यासाठी घेत असाल तर त्यावर नियंत्रण असायला हवं.
एनएसएस शरीरात कोणत्या पद्धतीने काम करतं?
डॉ. सुरेंद्र सांगतात की, आर्टिफिशियल स्वीटनर्स साखरेपेक्षा 700 पट अधिक शक्तिशाली असतात. ते मेंदूच्या एका भागावर परिणाम करतात आणि यामुळे तुमच्या चयापचयावरही परिणाम होतो.
 
जसं की तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त खाऊ लागता आणि यातून तुमचं वजन वाढतं. त्यानंतर वेगवेगळे आजार होण्याचा धोका वाढतो.
प्रश्न : कोणते रोग होण्याची शक्यता असते?
डब्ल्यूएचओच्या मते, तुम्ही जर दीर्घकाळापासून एनएसएसचा वापर
 
करत असाल तर तुम्हाला टाइप-2 मधुमेह आणि हृदयविकाराची शक्यता बळावते. याशिवाय यामुळे मृत्यूचा धोकाही वाढतो.
 
डॉ. नीरू गेरा सांगतात की, एनएसएसच्या वापरामुळे वजन वाढते. परिणामी तुम्हाला रक्तदाब, कोलेस्टेरॉलचा, हृदयविकाराचा त्रास वाढू शकतो.
 
एनएसएसच्या वापरामुळे होणाऱ्या इतर आजारांची माहिती देताना डॉ. सुरेंद्र कुमार सांगतात की, "एनएसएसच्या दीर्घकालीन वापराने नैराश्य, डोकेदुखी, मधुमेह, हृदयविकार, मेंदूचा झटका आणि कर्करोगाचा धोका वाढतो."
 
ते सांगतात की, शुगर फ्री असल्याचं समजून लोक आईस्क्रीम किंवा इतर खाद्यपदार्थ खात सुटतात. पण आपण कॅलरीज खातोय हे त्यांच्या लक्षात येत नाही. सर्वच खाद्यपदार्थ झिरो कॅलरीज आहेत असं म्हणता येणार नाही.
 
दुसरीकडे लोक उन्हाळ्यात डाएट कोला पितात, पण त्यात फॉस्फरस असतो. याचा किडनीवर वाईट परिणाम होतो.
 
प्रश्न : साखर किती प्रमाणात खावी?
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, भले ही तुम्हाला गोड खाऊन आनंद मिळत असेल, पण कोणत्या प्रमाणात गोड खायला हवं याची माहिती तुम्हाला असायला हवी.
 
डॉक्टर साखर संतुलित प्रमाणात खाण्याचा आणि साखरेला पर्याय म्हणून ब्राऊन शुगर, मॅपल सिरप, मध, गूळ खाण्याचा सल्ला देतात.
 
त्यांच्या मते, "जर तुम्ही प्रत्येक खाद्यपदार्थामधून साखर खाऊ लागतात तर शरीरात त्याचं प्रमाण वाढेल. चहा, कॉफी पिण्यापूर्वी तोंडात थोडी साखर घोळवा आणि मग कमी साखरेचा चहा प्या."
 
ते पुढे सांगतात, "गोडाचे पदार्थ खाण्यापूर्वी तुम्ही हा प्रयोग करत असाल तर तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राखण्यास मदत होईल आणि तोंडात गोडवाही येईल."
 
गूळ खाताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गूळ तोंडात टाकून चावू नका, तो घोळवून खा. यामुळे एक फायदा होईल की तुम्हाला सारखा सारखा गूळ खावा लागणार नाही आणि गोडाचा आस्वादही घेता येईल. त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त खाण्याची इच्छा होणार नाही.
 
डॉक्टरांच्या मते, साखर खाऊन आपल्याला एकप्रकारची तृप्ती मिळते. पण गरजेच्या पेक्षा जास्त साखर खाल्ली तर ती तुमच्यासाठी विषासमान ठरते.
 
Published By - Priya Dixit