गुरूवार, 7 डिसेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (14:33 IST)

निपाह विषाणूचा धोका वाढला, केरळमध्ये दोघांचा मृत्यू;विषाणूची लागण कशी होते? लक्षणे काय?

कोरोना महामारीनं जवळपास सर्व जग आपल्या विळख्यात घेतलं होतं. कोरोनावर मात करत अनेकजण कोरोनामुक्त झाले, तर अनेकांनी आपले प्राणही गमावले. कोरोना व्हायरसच्या प्रकोपातून जग आणि भारत आता बऱ्यापैकी सावरला आहे. कोरोनाची भीती आता समूळ नष्ट झाली आहे. मात्र अशातच नव्या संकटाने आता डोकं वर काढलंय. केरळमध्ये निपाह व्हायरसच्या फैलावाची भीती पुन्हा एकदा सतावू लागली आहे.
 
मिळालेल्या माहितनुसार, कोझिकोड जिल्ह्यात निपाहच्या संसर्गामुळे दोन संशयित मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. निपाह विषाणूचा धोका लक्षात घेता, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतलाय.
 
संशयास्पद मृत्यूची नोंद झाली आहे. दोन जणांना निपाह व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतांपैकी एकाच्या नातेवाईकांनाही आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. 2018 आणि 2021 मध्‍येही कोझिकोड जिल्‍ह्यात निपाह व्हायरसच्‍या संसर्गामुळे मृतांची नोंद झाली होती.
 
निपाह व्हायरस कसा पसरतो?
WHOच्या म्हणण्यानुसार, निपाह व्हायरसचा संसर्ग प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो आणि दूषित अन्नाद्वारे किंवा थेट एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. निपाह व्हायरसची लागण झालेले लोकांना श्वसनाचे आजार आणि घातक एन्सेफलायटीस यासह विविध प्रकारचे रोग पसरवू शकतात. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी निपाह विषाणूसंदर्भात केलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात 10 राज्यांत हा व्हायरस पसरत आहे.
 
निपाह व्हायरसची लक्षणे
निपाह व्हायरस अत्यंत घातक आहे. या व्हायरसचा संसर्ग झाल्यास २४ ते ४८ तासात रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. सुरुवातील रुग्णांना श्वसनाचा त्रास जाणवतो. काही रुग्ण असेही आहेत ज्यांना न्यूरो संबंधित आजारांचे लक्षणे दिसून येतात.

हा विषाणू सर्वप्रथम कुठं आढळला? त्याची लागण कशी होते आणि त्यापासून काळजी कशी घ्यावी, याबद्दल घेतलेला विस्तृत आढावा.
 
विषाणू सर्वप्रथम कुठे आढळला?
निपाह (एनआयव्ही) हा विषाणूमुळे मनुष्य आणि प्राणी या दोघांमध्येही गंभीर स्वरुपाचे आजार निर्माण होऊ शकतात. सर्वप्रथम एनआयव्ही १९९८ मध्ये मलेशियातील वराहपालकांमध्ये आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात निपाहचा प्रसार झाला. वाटवाघळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक आहेत.

निपाहचा प्रसार कसा होतो?
वटवाघूळ नैसर्गिक वाहक असल्यानं वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यानं निपाहचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसंच, निपाहचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो. एनआयव्हीचा संसर्ग झालेली वटवाघळे आणि डुकरांच्या थेट संपर्कातूनही हा संसर्ग होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मानवाला विषाणूंचा संसर्ग प्रामुख्याने डोळे, नाक, तोंडाद्वारे होण्याची शक्यता असते.
    
निपाहची लक्षणे काय?
'ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत. यासारख्या लक्षणांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सना विषाणूची माहिती नसल्यास त्यांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.
 
निपाहवर उपचार कोणते?
या विषाणूमुळं होणाऱ्या संसर्गावर कोणतेही ठोस उपचार नाहीत. या आजारावर अद्याप औषधे व लस उपलब्ध नसल्यानं संसर्गामुळं होणारा मृत्यूदरही अधिक आहे. 'निपाह' विषाणूचा 'स्वाइन फ्लू'सारखा वेगाने संसर्ग होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही. मात्र 'स्वाइन फ्लू'च्या तुलनेत 'निपाह' विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
 
प्राथमिक उपचार कोणते?
 
संसर्ग झाल्याचे लक्षात येताच रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येतात. या विषाणूमुळे होणाऱ्या आजार टाळण्यासाठी कोणतीही लस नाही. संसर्ग झाल्यावर इन्क्युबेशन कालावधी ५ते १४ दिवस असतो.
    
भारतात कधी आली होती साथ?
भारतात यापूर्वी २००१मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात सिलिगुडी (पश्मिम बंगाल) येथे निपाहचे ६६ रूग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रूग्णांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. २००७मध्ये एप्रिल महिन्यात पश्निम बंगालमधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता.
   
हेही लक्षात ठेवा
एका वटवाघळाकडून दुसऱ्या वटवाघळाला संसर्ग होत नाही. एका वटवाघळाला विषाणूची लागण झाल्याने दुसऱ्या वटवाघळांमध्ये 'अॅन्टीबॉडीज' तयार होतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होत नसल्याने सर्वच वटवाघळांमध्ये विषाणू असतो, असे समजू नये. मोजक्याच वटवाघळांमध्ये विषाणूचा संसर्ग होतो.

Edited by : Ratnadeep Ranshoor