शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

उलटं चालण्याचा शरीर आणि मेंदूला काय फायदा होतो? वाचा

19 व्या शतकात “उलटं-चालणं” हा थोडा विक्षिप्त छंद होता, परंतु आजघडीला संशोधनातून हे उघड झालंय की ते तुमचं आरोग्य आणि मेंदूसाठी फायदेशीर असू शकतात.
 
पॅट्रिक हार्मन नावाच्या 50 वर्षीय सिगार-शॉप मालकाने 1915 च्या उन्हाळ्यात एक वेगळंच आव्हान स्वीकारलं - 20,000 डॉलर जिंकण्याची पैज लावत त्यांनी सॅन फ्रान्सिस्को ते न्यूयॉर्क शहरांदरम्यान उलटं चालायचं ठरवलं.
 
आपण कुठे जातोय पाहण्यासाठी एका मित्र आणि त्याच्या छातीवर लावलेल्या कारच्या एका छोट्या आरश्याच्या मदतीने हार्मन यांनी 3,900 मैल (6,300 किलोमीटर) प्रवास 290 दिवसांत पूर्ण केला, संपूर्ण प्रवासात त्यांनी प्रत्येक पाऊल उलट दिशेने टाकलेलं.
 
हार्मन यांनी दावा केला की या प्रवासामुळे त्यांच्या पायाचे घोटे इतके मजबूत झालेत की “त्याला कुठलीही इजा करण्यासाठी थेट हातोड्याचाच वापर करावा लागेल."
 
जगावेगळं पण...
संशोधनानुसार, मायकल मोस्ले यांनी अलिकडेच बीबीसी पॉडकास्ट आणि रेडिओ 4 कार्यक्रम ‘जस्ट वन थिंग’च्या अलिकडच्याच भागामध्ये शोधून काढल्याप्रमाणे, उलटं चालण्याने तुमचं शारीरिक आरोग्य आणि मेंदूला आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात.
 
उलटं-चालणं हा प्रकार संशोधन वर्तुळात चांगलाच परिचित असून त्याला एक समृद्ध इतिहास आहे.
 
19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील लोकं शेकडो आणि कधी कधी हजारो मैल उलटं चालत असल्याच्या बातम्या आहेत.
 
अनेकजण तेव्हा पैजा लावायचे आणि काहीजण आपण कसा जगावेगळा विक्रम केला याच्या बढाया मारत असत.
 
परंतु जैवयांत्रिक (बायोमेकॅनिक्स) मधील बदलामुळे, उलटं चालण्याचे प्रत्यक्षात काही शारीरिक फायदे असू शकतात. पाठदुखी, गुडघेदुखी आणि संधिवातापासून मुक्ती मिळवण्यासाठी फिजिओथेरपीमध्ये याचा वापर केला जातो.
 
काही अभ्यासातून असंही दिसून आलंय की, उलटं चालण्याचा स्मरणशक्ती, प्रतिक्रिया देण्याचा कालावधी आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये यांसारख्या आकलन क्षमतांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
 
निरोगी आरोग्यासाठी उलटं चालण्याची प्रथा प्राचीन चीनमध्ये सुरू झाली, असं मानलं जातं, परंतु खेळातील कामगिरी सुधारण्यासाठी आणि स्नायूंची ताकद वाढवण्याचा एक मार्ग म्हणून अलिकडे अमेरिका आणि युरोपमधील संशोधक याकडे अधिक गांभीर्याने पाहू लागलेत.
 
आगळेवेगळे विक्रम आणि मैत्रीत पैजेसाठी उलटं चालणं हा प्रकार लोकप्रिय आहे, परंतु संशोधन असं सांगतं की ते आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं आहे.
 
अमेरिकेतील नेवाडा विद्यापीठातील बायोमेकॅनिक्समधील तज्ज्ञ जेनेट दुफेक 20 वर्षांहून अधिक काळ उलटं चालण्यावर संशोधन करतायत.
 
दररोज फक्त 10-15 मिनिटं उलटं चालण्याने चार आठवड्यांच्या कालावधीत 10 महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या गुडघ्याच्या मागच्या स्नायूंची लवचिकता वाढल्याचं, दुफेक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं.
 
उलटं चालण्याने मणक्याची स्थिरता आणि लवचिकतेसाठी कारणीभूत असणारे पाठीचे स्नायू बळकट होतात.
 
दुफेक यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आलेल्या आणखी एका अभ्यासात असं दिसून आलं की, काही काळ उलटं चालल्यानंतर पाठीच्या वेदना कमी झाल्याचं पाच खेळाडूंच्या टीमने स्वत:हून सांगितलं.
 
"आमच्या संशोधनात असं दिसून आलंय की, उलटं चालताना तुम्ही गुडघ्याच्या मागच्या स्नायूंना ताणत असल्याने पाठीच्या मणक्याचं दुखणं थांबवण्यास मदत होणं, हे त्याचे काही अप्रत्यक्ष फायदे असल्याचं दुफेक सांगतात.”
 
"अनेकदा पाठीचं खालचं दुखणं संबंधित स्नायू घट्ट झालेला असल्यामुळे उद्भवतं."
 
काही क्रीडा प्रशिक्षणांमध्ये, विशेषत: सांघिक आणि चपळाईची आवश्यकता असलेल्या रॅकेटच्या खेळांमध्ये उलटं चालणं आणि उलटं धावण्याच्या कवायतींचा आधीपासूनच वापर केला जातो. कारण स्नायूंना मजबूत करण्यासोबतच गुडघ्याच्या सांध्यावर येणारा ताण कमी होत असल्याने, खेळाडूंची दुखापतीपासून सुटका करण्याच्या दृष्टीनेही उलटं-धावणं फायदेशीर ठरतं.
 
धावपटू तसेच उलटं चालणारे वयोवृद्ध, तरुण, लठ्ठ व्यक्ती, ऑस्टियोआर्थरायटिस ग्रस्त आणि स्ट्रोक नंतर चालण्यात कमकुवत असलेल्या रुग्णांना हे फायदेशीर असल्याचं आढळलंय. सरळ चालण्यापेक्षा उलटं चालण्याने जास्त कॅलरी जाळल्या जातात असंही आढळून आलंय.
 
पण ते इतके फायदेशीर का आहे?
“उलटं चालण्याचे बायोमेकॅनिक्स सरळ चालण्यापेक्षा खूप वेगळे आहेत,” असं दुफेक यांनी मोस्ले यांना सांगितलं. “उदाहरणार्थ, उलटं चालताना गुडघ्याची हालचाल कमी होते ज्यामुळे गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींसाठी झालेली हानी भरून काढण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं."
 
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलंय की उलटं चालताना नितंब आणि गुडघ्याच्या दोन्ही सांध्यातील हालचाल खूप कमी होते. सरळ चालताना टाचा सर्वात आधी जमिनीच्या संपर्कात येतात, तर उलटं चालताना पायाच्या बोटांच्या संपर्काने चाल सुरू होते आणि कधी कधी टाचेचा जमिनीशी संपर्कच येत नाही. परिणामी, गुडघ्याच्या सांध्यावर कमी परिणाम जाणवतो आणि नेहमीच्या चालण्याच्या तुलनेत यामध्ये वेगवेगळ्या स्नायूंचा वापर होतो.
 
उलटं चालणाऱ्या सहभागींची प्रतिक्रिया सर्वात जलद होती, कदाचित त्यांच्या मेंदूला आधीच विसंगत काम करण्याची सवय होती.
उलटं चालताना घोट्याचा सांधा सर्वात जास्त आघात सहन करतो हे खरं आहे. पायाच्या वळणाच्या हालचालीत सक्रिय झालेले स्नायू (आपल्या पायाच्या बोटांवर तोल सांभाळताना किंवा उभं राहण्यासाठी) घोट्याचा वेग कमी करणं आणि आघात सहन करण्याच्या दृष्टीने उलटं चालण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
 
त्यामुळे असं दिसतं की हार्मनने वाटेत काही वेळा रेल्वे प्रवास केला असला तरी उलटं चालण्याने घोटे मजबूत होण्यास मदत होते हा दावा खरा ठरतो.
 
परंतु याचे फायदे केवळ घोटे मजबूत करण्यापुरतेच मर्यादित नाहीत.
 
संशोधकांना सरळ चालण्याच्या तुलनेत उलट पाऊल टाकताना मज्जातंतूंच्या सक्रियतेच्या स्थानांमध्ये फरक आढळलाय.
 
प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, म्हणजेच मेंदूचा असा भाग जो निर्णय घेणं आणि समस्या सोडवण्यासारख्या आकलनात्मक कौशल्यांसाठी विशेषत: उलटं पाऊल टाकताना सक्रिय होण्यासाठी जबाबदार असतो.
 
एका डच अभ्यासाअंतर्गत 38 सहभागींची क्षमता तपासण्यासाठी स्ट्रूप चाचणी केली केली - ज्यामध्ये लाल अक्षरात "निळा" शब्द लिहिण्यासारख्या विरोधाभासी उत्तेजकांचा वापर केला जातो- उलटपक्षी उलटं, सरळ किंवा कडेकडेने जाताना लोकं प्रॉम्प्टला किती लवकर प्रतिसाद देतात, हे पाहिलं गेलं. त्यात असं आढळून आलं की उलटं जाणाऱ्या सहभागींची प्रतिक्रिया सर्वात जलद होती, कदाचित त्यांच्या मेंदूला आधीच विसंगत काम करण्याची सवय होती.
 
सरळ चालण्याच्या तुलनेत उलटं चालताना वेगवेगळे स्नायू गुंतलेले असतात.
 
आणखी एका अभ्यासातून असा निष्कर्ष निघालाय की, उलट्या दिशेनं चालणं, उलट्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनच्या प्रवासाचा व्हीडिओ पाहणं आणि अगदी उलटं जाण्याची कल्पना करणं याचबरोबर उलट हालचालींच्या विविध प्रकारांमुळे सहभागींच्या गोष्टी आठवण्याच्या क्षमतेत सुधारणा झालेली दिसलं.
 
मोठी निरोगी लोकसंख्या तसंच आजारी लोकांच्या अभ्यासाने उलटं-चालण्याच्या संशोधनात भर घालायला सुरुवात केल्याने त्याचे फायदे आणि मर्यादा स्पष्ट होतायत.
 
"मला वाटतं की तंत्रज्ञानातर्फे सध्या मोठ्या प्रमाणावर बायोमेकॅनिक्स संशोधन सुरू आहे”, असं दुफेक म्हणतात.
 
"ज्यावेळी मला प्रशिक्षण दिलं गेलेलं, त्यावेळी तुम्ही जर 10 सहभागी असलेल्या अभ्यास गटाचे भाग असाल तर ती फार मोठी गोष्ट होती. आणि आता, मी आणि माझे अभ्यासाचे गट मोठ्या डेटासोबत काम करतोय कारण भरपूर माहिती गोळा करणं आणि सर्वोत्तम संख्याशास्त्रीय परिणाम मिळवणं खूप सोपं झालंय.”
 
परंतु जेव्हा उलटं-चालण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्यात जोखमही असते. न दिसणारे अडथळे टाळण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. अशीही काही उदाहरणं आहेत ज्यामध्ये फिजिओथेरपी दरम्यान उलटं चालल्याने पडणं आणि गंभीर दुखापत झाली.
 
यासारखाच परिणाम साध्य करण्याचे इतर मार्ग देखील आहेत. उदाहरणार्थ, चीनमधील शास्त्रज्ञांना असं आढळून आलंय की, उलटं चालणं, जॉगिंग करणं किंवा व्यायाम न करणं यापेक्षा ‘ताई ची’ (स्वसंरक्षण आणि आरोग्यासाठीचा चिनी मार्शल आर्टचा प्रकार) आणि पोहणं हे पाठदुखी असलेल्या खेळाडूंसाठी अधिक प्रभावी उपाय आहेत.
 
पण दुफेक यांनी म्हटल्याप्रमाणे, नवलाई ही गोष्ट उलटं चालण्याचा प्रयत्न करण्याचं आणखी एक कारण आहे.
 
म्हणजे गुडघ्याग्या मागाच्या भागाचे स्नायू ताणण्याचे इतर अनेक मार्ग आहेत, असं दुफेक म्हणतात. “पण उलटं चालण्याने तुम्ही कितीतरी मजेदार गोष्टी देखील करू शकता, बरोबर की नाही
 

Published by- Priya Dixit