गुरूवार, 30 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (15:27 IST)

आपल्याला वृद्धत्व का येतं? औषधांच्या मदतीने म्हातारपण टाळता येईल का?

वृद्धत्व हे नैसर्गिक आणि अटळ असून ते प्रत्येकाच्याच नशिबी असतं. आपल्यापैकी बहुतांश लोकांचा जीवनाकडं असाच दृष्टीकोन असतो. पण अनुवंशशास्त्र तज्ज्ञ डेव्हिड सिन्क्लेर यांचं मात्र तसं नाही.
सुमारे दोन दशकांहून अधिकच्या संशोधनाच्या आधारे ते असा दावा करतात की, काही अगदी सोप्या सवयींद्वारे वृद्धत्व लांबवून आपण दीर्घकाळ आणि निरोगी जीवन जगू शकतो.
अद्याप चाचणी सुरू असलेल्या औषधांच्या माध्यमातून लवकरच हे शक्य होईल, असा विश्वास सिन्क्लेर यांना वाटतो. त्याद्वारे आपण वृद्धत्व दूर करू शकू किंवा ते परतवून लावू शकू, असं ते म्हणतात.
 
सिन्क्लेर यांनी ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातून डॉक्टरेट आणि अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पोस्ट डॉक्टरेट मिळवली आहे.
 
सध्या ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रयोगशाळेचे प्रभारी असून ते आपल्याला वृद्धत्व का येतं, यावर संशोधन करत आहेत.
 
या कामासाठी त्यांना वैज्ञानिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळं ते सेलिब्रिटीही बनले आहेत(टाईम मॅगझिनच्या जगातील 100 सर्वांत प्रभावशाली लोकांच्या यादीत त्यांना स्थान मिळालं होतं आणि ट्विटरवर त्यांचे जवळपास 2 लाख फॉलोअर्स आहेत).
त्यांच्या नावावर 35 पेटंट असून काही बायोटेक्नॉलॉजी कंपन्यांचे ते संस्थापक किंवा त्यांच्याशी संलग्न आहेत. त्यापैकी काही कंपन्या वृद्धत्व कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठीच्या उपायांवर काम करतात.
या उद्योगांची उलाढाल आधीच 110 अब्ज डॉलर एवढी असून 2025 पर्यंत 600 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असं मूल्यांकन मेरील लिंच बँकेनं 2019 मध्येच मांडलं होतं.
सिनक्लेअर हे लाईफस्पॅन (व्हाय वुई एज-अँड व्हाय वुई डोंट हॅव टू) या बेस्ट सेलिंग पुस्तकाचे लेखकही आहेत.
पुस्तकाच्या मजकुरात ते लोकप्रिय मान्यतेच्या विरोधी म्हणजे, वृद्धत्व हे अपरिहार्य नसतं असा युक्तीवाद करतात.
वृद्धत्वाबद्दल आपण ज्या पद्धतीनं विचार करतो ती विचार करण्याची पद्धतही पूर्णपणे बदलायला हवी असंही शास्त्रज्ञांना वाटतं.
 
वृद्धत्व ही अगदी सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया समजण्याऐवजी तिला आजार समजून त्यावर उपचार होऊ शकतो किंवा त्यातून बरे होता येऊ शकते असा विचार करायला हवा.
सिन्क्लेअर यांच्यामते वृद्धत्वाबाबत आपल्या दृष्टीकोनात आमुलाग्र बदल केला तरच आपलं आयुर्मान वाढू शकतं.
 
अन्यथा, वैद्यकीय प्रगतीमुळं आपल्याला आणखी काही वर्षे मिळू शकतात, पण "आपल्याला आणखी काहीतरी खास करावं लागेल."
बीबीसी मराठीनं सिन्क्लेअर यांच्याशी यासंदर्भात केलेल्या चर्चेचा सारांश याठिकाणी देत आहोत.
आपण वृद्ध का होतो?
शास्त्रज्ञांनी वृद्धत्वाची 9 प्रमुख कारणं शोधली आहेत. माझ्या 25 वर्षांच्या संशोधनात मला आढळलेली बाब म्हणजे, यापैकी एक कारण हेच इतर अनेकांसाठी कारण ठरतं. जर इतर कारणं तशी नसतील, तर ती माहितीचं नुकसान (गळती) होण्यात सहभागी असतात.
 
 
 
आपल्याला पालकांकडून वारसा म्हणून मिळालेल्या शरिरावर पर्यावरण तसंच वेळ याचा प्रभाव पडत असतो. या शरिरात दोन प्रकारची माहिती असते.
 
 
 
एक म्हणजे डिजिटल माहिती म्हणजे अनुवांशिक कोड. तर दुसरी माहिती असते अॅनालॉग म्हणजे एपिजेनोम. ही पेशीतील एक यंत्रणा असते. ती जीन्स म्हणजे जनुकांचं कार्य सुरू आणि बंद करत असते. 
या प्रक्रियेतून पेशीतील 20,000 जनुकांना ते कोण आहेत याची माहिती मिळून ओळख प्राप्त होते. तसंच त्यांना कसं काम करायचं हेही सांगितलं जातं.
पण जसे सीडीला ओरखडे पडले तर डेटा लॉस होतो तशीच काळानुसार एपिजेनोममधील माहिती कमी होऊ लागते. त्यामुळं पेशींची योग्य जनुकांचं काम योग्यवेळी सुरू करण्याची क्षमता नष्ट होते. ते त्यांचं कामही गमावतात.
मला वाटतं कदाचित आपलं वय वाढण्यामागं हेच कारण आहे.
तुम्ही म्हणता की आपल्याला वृद्ध होण्याची गरज नाही. पण का?
जीवशास्त्रात असा कोणताही नियम नाही, जोआपण वृद्ध व्हायलाच हवं असं सांगतो. ते थांबवायचं कसं हे आपल्याला माहिती नाही. पण त्याचा वेग कमी करण्यात आपल्याला यश मिळतंय. तसंच प्रयोगशाळेत प्रयोगाद्वारे आपण ते परतवूनही लावू शकतो.
माझा मुद्दा हा आहे की, एपिजेनोम हे बदलता येऊ शकतात.
आपण जीवन कसं जगतो याचा सीडीवर ओरखडे येण्यासारखा मोठा परिणाम होत असतो. योग्य गोष्टी केल्यास कदाचित वृद्धत्वाचा वेग कमी करता येऊ शकतो. आज आपण हा वेग मोजूही शकतो. रक्त आणि लाळेच्या चाचण्यांद्वारे ते शक्य आहे.
 
उंदीर, व्हेल आणि हत्तीसह मानवासारख्या विविध जीवनशैली असलेल्या प्राण्यांमध्ये वेगळ्या प्रमाणात वृद्धत्व येत असल्याचं आढळून आलंय. म्हणजे भविष्यात तुमचं आरोग्य कसं असणार हे 80% तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असेल, डीएनएवर नव्हे.
शास्त्रज्ञांनी दीर्घकाळ जगलेल्या लोकांचं निरीक्षण करून काही गोष्टी शोधल्या आहेत. त्यात योग्य आहाराचा (मेडिटेरेनियन डाएट हा सुरू करण्याचा योग्य पर्याय ठरू शकतो) समावेश असतो. कमी वेळा आणि कमी कॅलरींचे सेवन करावे. शारीरिक व्यायामही फायदेशीर ठरतो.
थंड पाणी आणि बर्फाच्या मदतीनं शरिराचं तापमान बदलणं हेही यात फायद्याचं ठरू शकतं, असंही काहींना वाटतं.
 
वृद्धत्वाचा वेग कमी करण्यात या सर्वाची मदत कशी होऊ शकते?
जीवनशैली आणि त्याच्या यातील भूमिकेबाबत शास्त्रज्ञांना विश्वास असण्याचं कारण म्हणजे, यामुळं आजारपण आणि वृद्धत्वाविरोधात संरक्षण करणाऱ्या शरिराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीला ते चालना देत असते.
गर्मी होणं किंवा थंडी वाजणं, श्वास लागणं, हे या संरक्षण प्रणालीला सक्रिय करण्याचे मार्ग आहेत.
संरक्षणाच्या मुळाशी काही जनुकांचा समावेश असतो. एपिजेनोमवर नियंत्रण ठेवतात आणि व्यायाम आणि भुकेमुळं सक्रिय होतात, अशा जनुकांच्या संचाचा आम्ही अभ्यास केला. त्यामुळं योग्य आहार आणि उपवास यामुळं वृद्धत्वाचा वेग कमी करता येऊ शकतो, असं आपण मानतो.
वृद्धत्व हे बहुतांश आजारांचं कारण असतं. आतापर्यंत हृदयविकार, अल्झायमर आणि मधुमेह यासाठी ते सर्वात प्रमुख कारण ठरलंय. त्यामुळं तुम्हाला अधिक निरोगी बनवून दीर्घायुष्य मिळवता यावं ही यामागची कल्पना आहे.
नेचर जर्नलमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, वानरांमध्ये वृद्धत्वाचा बदलता न येणारा असा दर पाहायला मिळतो. त्यामुळं तुमच्या संशोधनाच्या अगदी विरुद्ध म्हणजे, वृद्धत्व थांबवू शकतं नाही असे संकेत यातून मिळतात?
 
200 वर्षांपूर्वी मानवाचा प्रवासाचा सर्वाधिक वेग हा घोड्याच्या वेगाएवढा होता.
सध्या असंही तंत्रज्ञान उपलब्ध आहे, ज्याद्वारे आपण आपल्याच जीवशास्त्रावर मात करू शकतो. तंत्रज्ञानाद्वारे समस्या सोडवून आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक सरस बनता येतं.
आपण नवनिर्मिती करणाऱ्या प्रजातींपैकी आहोत. तंत्रज्ञानाशिवाय आपण जगू शकलो नसतो.
 
लाखो वर्षांपासून आपण हेच करत आलो आहोत आणि यावर मात करण्यासाठी आपण आणखी तंत्रज्ञानाचा शोधही नक्कीच लावू. 
आपल्याला वारसानुसार मिळालेल्या आरोग्याच्या मर्यादांवर मात करण्यासाठीची ही पुढची पायरी आहे.
आपण अॅस्प्रिन घेतो किंवा कपडे परिधान करतो तेव्हा रोज आपण हे करत असतो. आपण वातावरणात बदल करतो आणि शरिराच्या रसायनशास्त्रातही बदल करतो.
तुम्ही वृद्धत्वाबाबत वेगळा दृष्टीकोन मांडता. या प्रक्रियेवर आजाराप्रमाणे उपचार करण्याचा. असे का?
आजार ही अशी प्रक्रिया असते जी काळानुसार निर्माण होते किंवा वाढते आणि त्यातून अपंगत्व किंवा मृत्यू ओढावतो. वृद्ध होणंदेखील असंच असतं.
 
वृद्धत्व हा आजार आहे. ते सर्वांसाठी सारखं असल्याचं समोर आलंय. पण काहीतरी समान आणि नैसर्गिक आहे म्हणून ते स्वीकार्य ठरत नसतं.
त्यामुळं ते कर्करोगापेक्षा जास्त स्वीकार्य ठरू शकत नाही. यावर उपचार शक्य असल्याचं आम्ही सिद्ध करत आहोत. म्हणजेच त्याचा वेग कमी करू शकतो आणि होण्यापासून रोखूही शकतो.
वृद्धत्वाला आजार समजलं जात नाही या वस्तुस्थितीचा अर्थ असा आहे की, लोकं अधिकाधिकवर्षे निरोगी जीवन जगू शकतील अशी औषधं देण्यास डॉक्टर संकोच करत आहेत. 
त्यामुळं वृद्धत्व हा आजार आहे, किंवा किमान उपचार करता येण्यासारखी वैद्यकीय स्थिती आहे, हे आपण जाहीर करायला हवं.
सध्या असलेल्या समजाच्या अगदी वेगळं हे आहे. कारण आज आपण वृद्धत्वाला अपरिहार्य समजतो, पण तुमच्या मते तसं नाही. तर आपण त्यावर उपचार करू शकतो, ते लांबवू शकतो किंवा परतवून लावू शकतो असंही तुम्ही म्हणता. हे अगदीच मूलगामी नाही का?
नक्कीच आहे. पण विमान उडवणं किंवा अँटिबायोटिक्स किंवा कम्प्युटरचा वापर हेदेखील तसंच तर आहे.
मानवानं याच मार्गाचा अवलंब करायला हवा.
आपल्याला औषध आणि दीर्घायुष्याच्या बाबतीत लक्षणीय प्रगती करावी लागेल. आपण आज सर्व आजार पूर्णपणे बरे करू शकलो, तरीदेखील आपल्या आयुर्मानात सरासरी केवळ दोन वर्षांची वाढ शक्य आहे. त्यामुळं आपल्याला यात आणखी चांगलं यश मिळवणं गरजेचं आहे.
 
प्रयोगशाळेत तुम्ही वृद्धत्व परतवून लावण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकलात, असं तुम्ही म्हणाले. त्याबद्दल अधिक सांगाल का?
 
सीडीवरचे ओरखडे पॉलिश करण्यासाठी म्हणून आम्ही एपिजेनोम शून्य करण्याचा मार्ग शोधत होतो. 
वृद्धत्व सुरक्षितपणे परतवून लावण्याच्या दृष्टीनं आम्ही अनेक जनुकांचा अभ्यास केला.
अनेक वर्षं आम्हाला अपयश आलं आणि प्रयोगशाळेतील पेशींमध्ये कॅन्सर आढळल्यामुळं त्याचा शेवटही झाला.
पण आम्हाला यमनाका घटक म्हटले जाणारे तीन जनुकं सापडले. त्याच्या मदतीनं पेशी त्यांचं अस्तित्व न गमावता वृद्धत्व परतवून लावू शकतात.
मानवाच्या त्वचेच्या पेशी आणि नसांच्या पेशींमध्ये हे करण्यात आलं.
 
त्यानंतर आम्ही ऑप्टिक नर्व्ह खराब झालेल्या उंदरांवर याची चाचणी केली आणि त्यातून त्यांची ऑप्टिक नर्व्ह पुन्हा पूर्ववत करून त्यांना पुन्हा दृष्टी मिळवून देऊ शकलो.
मग हे भविष्यात मानवाच्या बाबतीत शक्य होऊ शकतं का?
 
काही असे गुंतवणूकदार आहेत, ज्यांना हे शक्य वाटतं. आज सकाळीच मी त्यांच्याशी फोनवर बोललो.
 
 
 
यासंदर्भात उंदरांवर दोन वर्षे केलेला अभ्यास हा अत्यंत आशादायक आहे. आम्ही आगामी दोन ते तीन वर्षांत मानवी चाचणी सुरू करून अंधपणा दूर करू शकतो का? हे तपासून पाहणार आहोत.
 
 
 
वृद्धत्वाचा वेग कमी करण्यासाठीच्या तुम्ही उल्लेख केलेल्या औषधाबाबत विज्ञानानं आतापर्यंत काय संशोधन केलं आहे आणि आणखी काय संशोधन सुरू आहे?
 
असेही काही रेणू आहेत जे नैसर्गिक आणि कृत्रिमही आहेत. ते प्राण्यांचं आयुष्य आणि मानवी अभ्यासातदेखील वृद्धत्व कमी करण्यासंदर्भात सकारात्मक संकेत देतात.
त्यापैकी किमान दोन औषधं ही सध्या बाजारात आहेत.
 
या औषधांपैकी टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांना दिलं जाणारं मेटमॉर्फिन हा एक चांगला पुरावा आहे.
मधुमेह नसलेल्या लोकांच्या तुलनेत मधुमेह असलेले लोक अधिक काळ जगत असल्याची आशादायक चिन्हं आढळली आहेत. एका संशोधनाच्या माध्यमातून मेटमॉर्फिन घेतलेल्या हजारो लोकांचा अभ्यास करून, त्यांच्यात कर्करोग, हृदयविकार आणि अल्झायमर यांचा दर काढला जात आहे.
 
म्हणजे, आपण कायमचे जगू पाहत आहोत का?
नाही. सिन्क्लेर यांनी हसत उत्तर दिलं. वैद्यकीय संशोधनाचा उद्देश काय आहे?
 
आपल्याला दीर्घकाळ आणि निरोगी जगण्यात मदत करणं?
बरोबर. मग इथंही तसंच आहे.
फरक एवढाच आहे की, आजार झाल्यानंतर उपचार करण्याऐवजी आपण त्याच्या मुळाशी जात आहोत.
या मुळाशी असलेल्या कारणावरच हल्ला केल्यास, अधिक चांगला परिणाम होईल. शिवाय तो संपूर्ण शरिरासाठी असेल.
आपण केवळ हृदयाचं वृद्धत्व कमी करून मेंदूचं वय वाढणं सुरू ठेवू शकत नाही. कारण त्यामुळं आणखी जास्त लोकांना अल्झायमर आजाराला सामोरं जावं लागेल.
आपल्याला अशारितीने काम करावं लागेल की, शरिराचे सर्व अवयव निरोगी आणि अधिक काळ सुस्थितीत राहतील. हाच दृष्टीकोन मी ठेवला आहे.
 
एकूण विचार करता या नव्या कल्पनांचा समाजावर कसा प्रभाव पडेल?
तुमच्या वयाच्या नव्वदीत किंवा त्यानंतर निरोगी राहण्याचे अनेक वैयक्तिक फायदे आहे. एकापेक्षा जास्त करिअर साध्य करणे. नातवंडांबरोबर खेळता येणं, मुलांवर ओझं न बनणं अशा अनेकांचा त्यात समावेश असू शकतो.
 
दुसरा फायदा हा आर्थिक आहे.
माझ्यासह माझे सहकारी आणि लंडनचे काही अर्थतज्ज्ञ आमच्या सर्वांच्या अंदाजानुसार एकट्या अमेरिकेत सरासरी आयुर्मान हे दोन वर्षांनी जरी वाढलं, तरी पुढील काही दशकांत अर्थव्यवस्थेत 86 अब्ज डॉलरची भर पडेल आणि आपण जर निरोगी आयुर्मानाची 10 वर्षे वाढवली तर हा आकडा 300 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.
लोक आजारी पडणारी नाहीत, या वस्तुस्थितीवरून हा आकडा आला आहे. अमेरिकेत अब्जावधी डॉलरचा खर्च हा रोगांसंबंधी सेवेवर खर्च केला जातो. मला सांगायला आवडते त्याप्रमाणे हे वैद्यकीय सेवेपेक्षा अधिक आहे. हा पैसा शिक्षण आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी वापरला तर समाजात परिवर्तन आणण्यास मदत होऊ शकते.
हे असं क्षेत्रं आहे, ज्याचं मूल्य मेरील लिंचनं अब्जावधी डॉलर्समध्ये ठेवलं असून ते लवकरच शेकडो अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. यात एवढा पैसा आणि वेळ का गुंतवला जात आहे?
 
ही जगातील सर्वात मोठ्या गरजांपैकी एक आहे. या संपूर्ण विश्वास एकही असा व्यक्ती नाही, ज्याला याचा फायदा होत नाही. अगदी लहान मुलही. 
शरिरानं रोगाविरोधात लढण्याची नैसर्गिक शक्ती वाढवण्याची क्षमता जगामध्ये क्रांती आणू शकते. त्यातून आगामी दशकांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेतील अब्जावधी डॉलर्सची बचत होऊ शकते.
यातून एका अशा जगाची निर्मिती होईल जे आजच्या जगापेक्षा अगदी वेगळं असेल. अगदी अँटिबायोटिक्सच्या अस्तित्वापूर्वी आपलं जग होतं तसं.
तुम्ही अशा काही कंपन्यांशी संलग्न आहात ज्या वृद्धत्वाचा वेग कमी करण्याच्या किंवा ते परतवून लावण्याच्या उद्देशानं उत्पादनं तयार करतात किंवा सेवा देतात. त्यामुळं, केवळ एक संशोधक बनून जगाला अधिक निरोगी आणि दीर्घकाळ आयुर्मान मिळण्याच्या उद्देशानं मदत करण्याऐवजी, तुम्ही या क्षेत्रातून नफा कमावण्याचा प्रयत्न करत आहात असे वाटू शकते, याची चिंता वाटत नाही का?
 
माझा उद्देश लोकांना निरोगी बनवणं आहे. आणि औषध बनवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे टीम तयार करून ती औषधं तयार करणं.
मी हेच तर करत आहे.
तुम्ही उद्योजक बनून हे करण्याऐवजी संशोधक बनू करू शकत नाही का?
नाही. कारण एक औषध तयार करण्यासाठी लाखो डॉलरचा खर्च येतो.
पण या कंपन्यांतील तुमच्या सहभागामुळं तुम्ही ज्या विज्ञानाचा प्रचार, प्रसार करत आहात, त्यावर काही लोकांना शंका निर्माण होईल, असं वाटत नाही का?
माझे विज्ञान हे स्वतःच्या पायावर उभे आहे. ते कधीही चुकीचं सिद्ध झालेलं नाही.
 
Published By - Priya DIxit