शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (23:01 IST)

World Aids Day: एड्सवर उपयांनी मात

AIDS
World Aids Day जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये 1988 मध्ये साजरा केला. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन दरवर्षी साजरा करण्यात येत आहे. जगात दर 6.5 सेकंदाला एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला एचआयव्हीची लागण होते. म्हणजे 4.85 मिलियन माणसाला दरवर्षी एचआयव्हीची लागण होते.  
 
हा दिवस साजरा करण्याचे कारण असे की, अजूनही समाजामध्ये एड्सबद्दल व्यक्तीच्या चेहेर्‍यावर शरमेची व अपराधीपणाची भावना असते. लोक या बाबत बोलायला सुद्धा घाबरतात आणि कुटुंबाची चिंता करीत बसतात. एड्स म्हणजे-अक्वायर्ड ईमून डेफिशियन्सी सिन्ड्रोम- एवढेच आपल्याला माहीत असून चालत नाही. त्यासहीत जगणार्‍या माणसाचे आयुष्य किती खडतर असते, ते त्यातून कसे बाहेर पडतात हेही माहीत असणे गरजेचे आहे. सहवेदनेतून जाणार्‍यांनी एकत्र येणे म्हणजे स्वमदत गट तयार करणे गरजेचे आहे. एड्स असणारी माणसे जेव्हा एकटी असतात तेव्हा असहायतेने दुर्बळ बनतात. आज आपण अभिमानाने सांगू शकतो की ह्या विषाला वाहून घेतलेल्या अनेक व्यक्ती, संस्था आहेत. अनेक मदत गट आहेत. ज्यावेळी एच.आय. व्ही.ग्रस्त माणसे एकत्र यायला लागतात, तेव्हा हळूहळू त्यांची मनाची उभारी वाढायला लागते. स्वमदत गटाकडून ह्या सर्वाना त्यांचे दु:ख, निराशा, यातना, व्यथा यातून बाहेर येण्याकरिता एक वाट मोकळी होते. 
 
एच.आय.व्ही.चे संक्रमण कसे होते : एच.आय.व्ही. विषाणू हा वीर्यातून, योनीस्त्रावातून, रक्तातून व स्तनपानातून संक्रमित होतो. संक्रमणाचे प्रमुख मार्ग पुढील- असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्ताद्वारे, दूषित रक्त असलेल्या सुई, इंजेक्शनमधून, सांसर्गिक महिलेकडून तिच्या बाळाला प्रसूतीसमयी किंवा स्तनपानाद्वारे होतो.
 
एच.आय.व्ही.चा विषाणू सहजरीत्या शरीराच्या बाहेर जगू शकत नाही. त्यामुळे स्वच्छतागृह वापरल्यामुळे, आलिंगन दिल्यामुळे, चुंबनाने किंवा हातात हात घेतल्याने, ताट-वाटी किंवा पिण्याची भांडी वापरल्याने किंवा खोकल्याने पसरत नाही. डास चावल्यानेही एच.आय.व्ही.चा प्रसार होत नाही. 
 
एच.आय.व्ही.चे संक्रमणाचे क्रम : तीव्र संसर्ग, लक्षणविरहित प्रदीर्घ अवधी पण प्रोगशाळेतील चाचण्यामध्ये रोगाच्या वाढीचा आढावा घेता येतो, प्रतिकारशक्तीच्या अभावी संधिसाधू आजार जे मृतूचे मुख्य कारण आहे. (उदा. क्षयरोग)
 
एच.आय.व्ही.ची तपासणी का करून घ्यावी : आधीच घेतलेली काळजी ही आपल्या भविष्यातील निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली ठरते. तंदुरुस्त राहणे आणि योग्य ती काळजी घेणे, एच.आय.व्ही.ची लागण न होण्यासाठी पहिली पारी आहे. एच.आय.व्ही. चाचणी नियमित करणे आणि आपण पॉझिटिव्ह निघाल्यास ताबडतोब एच.आय.व्ही. स्पेशालिस्टना जाऊन भेटणे, त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य ते उपचार घेणे.
 
एच.आय.व्ही. लस : लस ही शरीरात रोगप्रतिकारक जागृत करून, रोगजंतूंच्या संसर्गाला प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. मानवाच्या शरीरात उपजतच रोगप्रतिकारक क्षमता असते. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते, तेव्हा तिची रोगप्रतिकारक शक्ती शरीराचे त्या जंतुसंसर्गापासून रक्षण करण्यास शिकवते. 
 
जगात आणि भारतात लाखो लोक एच.आ.व्ही.बाधित जीवन जगत आहेत. एड्समुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षित वर्तणूक आणि सवयीमुळे एच.आय.व्ही.च्या संसर्गाला प्रतिबंध करता येतो, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. या सर्वांच्या बरोबरच या साथीचा वाढता प्रसार थोपविण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीसारखे नवे उपाय विकसित करण्याचे प्रयत्न करणेही आवश्क आहे. 
 
एॅन्टीरेट्रोव्हारल उपचार पद्धती : हा एक एच.आय.व्ही. आणि एड्सवर करण्यात येणार्‍या उपचारांपैकी एक मुख्य उपचार आहे. ह्या उपचारामुळे हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण आयुष्य वाढवतो. ह्या उपचारांमध्ये घेण्यात येणारी औषधे ही कायम घ्यावी लागतात. 
 
निर्णय व सद्य:स्थितीचा विचार : आयुष्यात आपल्याला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावयाचे असतात. परंतु प्रत्येक निर्णयाच्या वेळी आपल्याला त्याची HIV शी सांगड घालूनच निर्णय घ्यावा लागतो. आपण पॉझिटिव्ह आहात हे माहीत असेल, आणि आपल्याला मूल होऊ द्यायचे असेल, तर पहिल्यापासूनच काळजी घेतली तर मूल पॉझिटिव्ह न होता आपण त्याला जन्म देऊ शकता. पोटातल्या बाळाचाही आपण बचाव करू शकतो. 
 
PSI व NMP + हे एच.आय.व्ही.सह जगणार्‍या व्यक्तीरित्या आरोग्य विमा उपलब्धीसाठी एकत्रितरीत्या काम करीत आहेत. HIV  शुश्रूषा विम्याची रचनाच मुळात ग्रस्त लोकांच्या गरजांवर प्रकाश टाकण्यासाठी आहे. 
 
आरोग्याची नियमित तपासणी करुन घेणे, CD4 चाचणी करुन घेणे, आणि त्या त्या वेळी योग्य व्यक्तीला योग्य ते प्रश्न विचारून व्यवस्थित काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. 
 
आपल्या निर्णयावरच उद्याच्या समाजाचे भविष्य अवलंबून आहे.