शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (14:19 IST)

क्रेझ झुम्बा डान्सची...

भारतातील पारंपरिक नृत्यप्रकारानंतर हळूहळू वेगवेगळे डान्सचे प्रकार भारतात येऊ लागले. हिप हॉप, सालसा, जॅझ अशा आंतरराष्ट्रीय डान्सच्या प्रकारांनी अनेकांना वेड लावलं. नवीन काहीतरी शिकयोत यामुळे अनेकांनी या डान्स क्‍लासेसना प्रवेश घेतला, पण या डान्स क्‍लासेसचा एक विशिष्ट वर्ग होता तो वर्ग म्हणजे ज्यांना डान्स येतो किंवा ज्यांना डान्सची आवड आहे असा वर्ग.
 
डान्सचं वेड असलेले लोक वगळता याकडे फारसं कोणी वळलंच नाही, पण कोणी असं सांगितलं की अमुक एक डान्स प्रकार शिकलात तर तुम्ही एकदम फिट व्हाल. आरोग्याविषयीच्या तुमच्या अनेक समस्या दूर होतील. हे ऐकून कोणीही तो डान्स प्रकार शिकण्यासाठी सहज तयार होईल. बरोबर ना! झुंबा नेमका हाच प्रकार आहे. हा एक डान्स फिटनेस प्रकार आहे. 90 च्या दशकात एका कोलंबीयन नृत्यदिग्दर्शकानं हा डान्स फिटनेस प्रकार तयार केला. विशेष म्हणजे हा झुंबा डान्स शिकण्यासाठी तुम्हाला उत्तम डान्स आलाच पाहिजे अशी कोणतीच अट नाही. सध्या जगभरातील 180 देशांमध्ये या झुंबाचे क्‍लासेस घेतले जातात.
फिटनेस म्हणजेच उत्तम आरोग्याची कल्पना हळूहळू भारतात पसरत चालली आहे. वाढतं वजन, सुटलेलं पोट अशा अनेक समस्या असतात. या समस्येपासून आपल्याला कसं दूर राहता येईल याचा विचार करून अनेक जण जिमिंग किंवा योगासनांकडे वळतात, पण या दोन पर्यायांपेक्षा तुम्हाला वेगळं काही हवं असेल तर झुंबा पर्यायाचा विचार करायला हरकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर संगीताच्या तालावर वेगवेगळ्या स्टेप्स करायच्या आणि त्यामार्फत आपलं वजन घटवायचं. थोडक्‍यात डान्स करता करता वजन घटवायचं. ही कल्पना एकदम भन्नाट आहे की नाही, पण हा डान्स फिटनेस प्रकार फक्त तरुणवर्गांनी शिकावा असं नाही. अगदी लहान मुलांपासून 60 ते 70 वर्षाचा वयोवृद्ध देखील झुंबा शिकू शकतो.