गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : गुरूवार, 11 एप्रिल 2019 (10:20 IST)

डोळे आले म्हणजे काय?

सध्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागात डोळ्यांची साथ पसरलेली आहे. लोकांचे डोळे येण्याचे वाढते प्रमाण आणि डॉक्टरांनी दिलेला धोक्याचा इशारा यामुळे सर्वांनीच सतर्क राहण्याची गरज आहे. याबाबत माहिती देणारा हा लेख...
 
डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणी खालील भागामध्ये एक पारदर्शक पडदा असतो त्यालाच कान्जुक्टीव्हा असे म्हणतात. या कॉन्जुक्टिव्हाची जळजळ किंवा आग होणे याला कॉन्जुक्टीव्हिटीज किंवा डोळे येणे असे म्हणतात. डोळ्यातील रक्त कोशिकांची आग होऊन त्या मोठे होतात व त्यामुळे डोळे लाल किंवा गुलाबी होतात. त्यामुळे डोळे आले असल्यास त्याला कधी कधी गुलाबी डोळे (पिंक आय) असेही म्हणतात. डोळे येण्याचे दोन प्रकार आहेत. एक संसर्गिक व दुसरा ऍलर्जिक. 
 
डोळे येण्याच्या दोन्ही प्रकारामध्ये लक्षणे ही बहुतेक सारखीच असतात. ऍलर्जिक प्रकारामध्ये दोन्ही डोळ्यांना एकावेळी त्रास होतो. संसर्गिक प्रकारामध्ये प्रथम एक व त्यानंतर दुसऱ्या डोळ्याला त्रास सुरू होतो. डोळे आल्यावर डोळ्यातून पाणी येणे, डोळे लालसर होणे, डोळ्यांच्या पापण्या चिटकणे, डोळे खुपणे अशी लक्षणे दिसतात. परंतु, संसर्गाच्या प्रकारानुसार लक्षणेही धोकादायक असू शकतात.
 
डोळे येणे हे सामान्यत: संसर्गामुळे होते. जंतू किंवा बॅक्टेरिया किंवा विषाणू हे डोळे येण्यास कारणीभूत आहेत. सर्दीमुळेही डोळे येऊ शकतात आणि सर्दीमुळे डोळे येण्याच्या साथीचा प्रसारही होऊ शकतो. त्याचप्रकारे रसायने, द्रव्ये, वायू यामुळे मोठ्या प्रमाणात डोळे आल्याचे निदर्शनास आले आहे. नेत्र सौदर्य प्रसाधनाच्या वापरामुळे, जास्त प्रमाणात डोळ्यावर वार्‍याचा मारा झाल्याने तसेच अतिनील किरणांमुळे डोळे आल्याचे दिसून आले आहे.
 
डोळे येण्याच्या रोगावर दृश्य लक्षणावरुन विशेषत: डोळ्याचा लालसरपणा व डोळ्यावर आलेली सूज यावरुन उपचार केले जातात. डोळ्यातील प्रभावित पेशी आणि डोळ्यातील मळ (चिपड) यांचे परीक्षण करुन डोळे आल्याची कारणे शोधली जातात. डोळे हे बॅक्टेरियल, व्हायरल किंवा ऍलर्जिक प्रकारामुळे आले आहे हे बघणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन त्यावर योग्य उपचार करणे शक्य होते.
 
डोळे आल्यास व त्याचा प्रभाव सौम्य असल्यास त्यावर उपचाराची गरज नसते. त्यावर डोळ्याच्या मलमाद्बारे उपचार होऊ शकतो. रासायनिकदृष्ट्या मानवाचे अश्रू हे डोळ्याच्या संसर्गाशी प्रतिकार करतात. परंतु, याउलट झाल्यास नेत्रचिकित्सकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 
डोळ्याची जळजळ होत असल्यास डोळ्यावर थंड पाणी टाकावे. डोळ्यांतून चिपड येत असल्यास कोमट पाण्याने व टिश्यू पेपरने डोळे वारंवार साफ करावे आणि वापरानंतर टिश्यू पेपर नष्ट करावा. त्यामुळे इतरांना होणारा संसर्ग टाळता येईल. कॉन्टॅक्ट लेन्सच्या वापरामुळेही डोळे लाल होऊ शकतात. अशा वेळी नेत्रचिकित्सकाचा सल्ला घेऊन कॉन्टॅक्ट लेन्सचा प्रकार बदलता येईल. डोळे हे विषाणूच्या संसर्गाने आले असल्यास त्याचा प्रभाव डोळ्यातील बुबुळावर होतो. अशा वेळी डोळे दृष्टीहिनता ही येऊ शकते. अर्भकामध्ये डोळे येणे ही सामान्य बाब आहे.
 
डोळे आले असल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास तत्काळ हात धुऊन घ्यावे. त्याचबरोबर ज्या व्यक्तिचे डोळे आले आहेत अशा व्यक्तीचा हातरुमाल, टॉवेल आदींचा वापर करु नये. ऍलर्जिक डोळे आले असल्यास तात्काळ नेत्रचिकित्सकाकडे जाऊन योग्य उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच सर्दी, ताप आल्यास नाक शिंकरल्यानंतर डोळ्याना स्पर्श करु नये.
 
डोळे येणे हा डोळ्याचा संसर्गजन्य रोग आहे. डोळे हे देवाने मानवाला दिलेली अमूल्य भेट आहे. त्याची निगा राखणे आपल्याच हाती आहे. खबरदारी हा रोग न होऊ देण्यापेक्षा सर्वात चांगला उपाय आहे.