शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By BBC|
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (14:31 IST)

सकाळी लवकर उठायची सवय लावायची कशी? लवकर उठणं आणि यशाचा काय संबंध?

morning
इंग्रजीत म्हण आहे, 'अर्ली टू बेड अँड अर्ली टू राइज, मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज'... आपल्याकडेही 'लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे' म्हणतातच. जगभरात कुठेही गेलात तरी हा सल्ला मिळतोच.
 
सल्ला किंवा 'म्हण' म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात असं काही असतं का? चला याचा शोध घेऊ.
 
इंग्लंडमध्ये राहणारे टीम पॉवेल यांना खरं तर सकाळी उठायला आवडत नाही. पण ते दररोज सकाळी 6 च्या पूर्वीच उठतात. जिमला जाऊन व्यायाम करतात.
 
पहिल्या दिवशीच एव्हरेस्टचं लक्ष्य नको
कामावर जाण्याची तयारी करतात. सकाळी 9ला काम सुरू होण्यापूर्वी ऑफिसला पोहचतात. काम सुरू होण्यापूर्वी ऑफीसच्या जवळ असलेल्या पार्कमध्ये फेरफटकाही मारतात.
 
टीम यांचा गुरुवार तर फारच लवकर सुरू होतो. गुरुवारी ते पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी उठतात, कारण त्यांना नोकरीला जाण्यापूर्वी जर्मन भाषेच्या क्लासला जायचं असतं.
 
टीम दररोज अर्धा तास व्यायाम करतात. निवांत नाष्टा करतात. थोडावेळ बागेत फेरफटका मारतात. ही सर्व कामं ते सकाळी कामावर जाण्यापूर्वी पूर्ण करतात.
 
टीम पॉवेल आठवड्याला 70 तास काम करतात. ते पेटंट संबंधित दावे हाताळणारे वकील आहेत. नोकरीच्या नाईलाजाने त्यांना सकाळी लवकर उठावं लागतं. जर सकाळी लवकर नाही उठलो तर आयुष्यात इतर काम करण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नसता.
 
ते दररोज सकाळी लवकर उठत असले तरी त्याना ही सवय लावून घेणं फार जड गेलं.
 
ते म्हणतात, "सुरुवातील सकाळी लवकर उठल्यानंतर मला बराच वेळ आळस वाटत असे. कितीतरी वेळा मी पुन्हा झोपी जात होतो. कालांतराने ही सवय लागली."
 
पहिल्याच दिवशी एव्हरेस्ट सर करण्याचा विचार करू नका, असं ते म्हणतात.
 
बरेच यशस्वी लोक आपली आवश्यक काम सकाळी लवकर कसलीही खळखळ न करता पूर्ण करतात.
 
प्रसिद्ध नियतकालिक व्होगच्या संपादक एना विंटोर यांचा दिवस सकाळी पावणेसहा वाजता सुरू होतो. काम सुरू करण्यापूर्वी त्या एक तास टेनिसही खेळतात.
 
सकाळी लवकर उठायची सवय लावायची कशी?
तज्ज्ञांचं असं मत आहे की, सकाळी उठण्यापासून ऑफिसला पोहोचेपर्यंतचा वेळ महत्त्वाचा असतो. या वेळेत ऑफीसशी संबंधित नसलेली पण महत्त्वाची बरीचशी वैयक्तिक काम मार्गी लावता येतात.
 
पण आता प्रश्न असतो तो सकाळी लवकर उठायची सवय लागणार कशी?
 
ऑस्ट्रेलियातील पर्थ युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक मार्टिन हॅगर यांच्या मते, आपला दिनक्रम फार महत्त्वाचा असतो आणि हा दिनक्रम आपल्या वैयक्तिक सवयींवर अवलंबून असतो.
 
लोक स्वतःच्या सवयींवर कसं नियंत्रण मिळवतात, यावर हॅगर संशोधन करत आहेत.
 
आपण जर आपला दिनक्रम सुधारला, तर आपल्या बऱ्याच सवयीसुद्धा सुधारतात, असं त्यांचं मत आहे.
 
जर दिनक्रम सुधारला तर रात्री उशिरापर्यंत काम करणारे लोकसुद्धा सकाळी लवकर उठू शकतात, असं त्यांचं मत आहे.
 
हॅगर यांनी आपला अनुभव स्वतःवरच लागू करून पाहिला. ते सकाळी 6 वाजता उठतात. जिमला जातात, पौष्टिक नाष्टा करतात. इतकं करूनसुद्धा त्यांना सकाळी 8 वाजता ऑफिसला पोहोचणं शक्य होतं.
 
जर त्यांनी सकाळी व्यायाम टाळला तर सायंकाळनंतर व्यायामासाठी त्यांच्याकडे उर्जाच राहिलेली नसते. हे टाळण्यासाठी ते सकाळी लवकर उठण्याची तयारी करूनच झोपी जातात.
 
सकाळी लवकर उठण्यासाठी काही खास नियमच असला पाहिजे असं नाही, असं तज्ज्ञांना वाटतं.
 
सकाळचा वेळ स्वतःसाठी
सकाळची सुरुवात कशी करावी हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. कारण प्रत्येक व्यक्तीचा दिनक्रम वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीचं ध्येय, उद्दिष्ट आणि जीवनशैली वेगळी असते, त्यानुसार दिनक्रम ही बदलतो, असं तज्ज्ञांना वाटतं.
 
मुख्य प्रश्न आहे तो आपल्या दिनक्रमातून सकाळी वेळ काढायचा कसा?
 
जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचा कंटाळा येत असेल, तर दररोज सकाळी थोडा थोडा वेळ आधी गजर लावावा. त्यातून हळूहळू सकाळी लवकर उठायची सवय लागते.
 
'व्हॉट द मोस्ट सक्सेसफुल पीपल डू बिफोर ब्रेकफास्ट' या पुस्काच्या लेखिका लॉरा वँडरकाम म्हणतात, "सकाळचा वेळ आपला स्वतःचा असतो, जो आपल्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही."
 
"इतर जबाबदाऱ्या दिवसाच्या इतरवेळी पूर्ण करू शकता म्हणून पण सकाळचा वेळ तुम्ही स्वतःसाठीच राखून ठेवा", असं त्या म्हणतात.
 
वँडरकाम यशस्वी आणि अतिशय व्यग्र व्यक्तींच्या दिनक्रमाचा जवळून अभ्यास करत आहेत.
 
त्यांच असं निरीक्षण आहे की, यशस्वी लोक सकाळचा वेळ खास स्वतःसाठी देतात. यातील काही लोकांना आरोग्य जपण्याची आवड असते तर काहींना नवीन शिकण्याची हौस असते.
 
जर तुम्हाला काही करायची इच्छा आहे आणि तुम्हाला त्यासाठी वेळ मिळत नसेल, हे काम सकाळी करण्याचा प्रयत्न करा, असं वँडरकाम यांचं मत आहे.
 
कल्पकता वाढवण्यासाठी
सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्हाला लवकर झोपावं लागेल. म्हणजेच सायंकाळचा वेळ तुम्ही टीव्ही, इंटरनेट यात वाया घालवणार नाही.
 
अमेरिकेतील मिशिगन येथील अल्बियन कॉलेजचे सहायक प्राध्यापक मारिके वीथ म्हणतात, "ज्याप्रमाणे सकाळी लवकर उठणारे वेळेचा लाभ घेतात त्याच प्रमाणे रात्री उशिरापर्यंत जागणारे सकाळच्या दिनक्रमाचा लाभ घेऊ शकतात."
 
त्यांच्या अभ्यासात असं लक्षात आलं आहे की, रात्री उशिरापर्यंत जागणारे सकाळच्या वेळी जास्त कल्पकता दाखवू शकतात.
 
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. रॉय बॅमिस्टर म्हणतात, "सकाळी लवकर उठल्याने नोकरीतील समस्यांना चांगल्याप्रकारे तोंड देता येतं."
 
ते म्हणतात "सकाळी आपली इच्छाशक्ती जास्त प्रबळ असते, त्याच्या सहाय्याने तुम्ही कितीतरी संकटांशी सामना करू शकता. म्हणून यशस्वी लोक सकाळच्या वेळेचा उपयोग विचारपूर्वक करतात."

Published By : Rupali Barve