रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2024 (09:22 IST)

संभाजीनगर डॉक्टर आत्महत्या : प्रचंड दबावामुळं निर्माण होणारा ‘लर्नड् हेल्पलेसनेस’ कसा ओळखावा?

Crime
एखाद्या गडद अंधाऱ्या रात्री, सगळं जग शांततेत झोपलेलं असताना भरलेल्या डोळ्यांनी एखादी स्त्री आपला जीवनप्रवास संपवण्याचा निर्णय घेते तेंव्हा तिच्या या निर्णयामागे असंख्य कहाण्या, कैक अनुत्तरीत प्रश्न, अवघडलेल्या नात्यांचा गुंता असतो.
 
सगळं काही सुरळीत व्हावं म्हणून केलेले अनेक निष्फळ प्रयत्न असतात. हतबलता असते, पराजयाची भावना असते. समाजातील अनेक घटकांनी उचललेली बोटे असतात.
 
स्वतःला दिलेले दोष असतात. तिच्या या अंतिम निर्णयामागे असतात दडपलेले आवाज, दमलेल्या अपेक्षा, आणि न संपणारे ताणतणाव.
 
अशा घटना वारंवार घडतात आणि प्रश्न उभा राहतो की, अवतीभोवती हे असं का घडतंय ? समाजातील विवाहित स्त्रियांच्या आत्महत्येचा प्रश्न इतका गंभीर का होत चालला आहे? तिच्या या टोकाच्या निर्णयामागील कारणांचा शोध घेतल्यास, एक नकारात्मक सामाजिक , मानसिक दबाव आणि स्त्रियांची होणारी अवहेलना स्पष्ट होते.
 
छत्रपती संभाजीनगर इथं व्यवसायाने डॉक्टर असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका तरुणीने नवऱ्यानं दिलेल्या नकोश्या वागणुकीला, त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.
 
तिनं 4 पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यातून तिची मानसिक अवस्था, तिला दिली गेलेली वागणूक, तिच्याकडून असलेल्या इतरांच्या अपेक्षा, तिच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा, हुंड्याची मागणी, मुलाचा हव्यास, चारित्र्यावरचा संशय, हतबलता अशा कितीतरी बाजू डोकावत होत्या. अशाप्रकारच्या घटनांची आकडेवारी गंभीरतेने विचार करायला लावणारी आहे.
 
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या 2020 च्या अहवालानुसार, भारतात दर तासाला साधारणतः 20 विवाहित स्त्रिया आत्महत्या करतात.
 
हा आकडा जगभरात विवाहित स्त्रियांच्या आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आहे. अशा प्रकारे, विवाहित स्त्रियांच्या आत्महत्येचा प्रश्न केवळ एक कौटुंबिक समस्या नाही, तर एक सामाजिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या आहे. हे आकडे दर्शवतात की आपल्या समाजातील महिलांवर असणारे ताण, तणाव, आणि अन्याय किती गडद आहेत.
 
कारणं काय आहेत?
या गंभीर समस्येमागच्या ठळक कारणांचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की, विवाह ही केवळ दोन व्यक्तींमधील गोष्ट नसून दोन कुटुंब यात जोडली जातात आणि त्यांच्या अपेक्षांचे ओझे लग्न झाल्यावर प्रामुख्याने स्त्रियांवर लादले जातांना दिसते.
 
पतीच्या अपेक्षा, कुटुंबियांचा दबाव, समाजाच्या संकल्पनांची गोळाबेरीज या गोष्टी एकत्र होवून तिच्या मनावर अतोनात ताण येतो. या ताणातून बाहेर पडू शकणार नाही ही भावना प्रबळ होवू लागते, माझंच चुकतं, मलाच समजत नाही, काही करता येत नाही असा गिल्ट वाटू लागतो.
 
मानसशास्त्रीय संकल्पनेनुसार याला ‘लर्नड् हेल्पलेसनेस’ म्हंटले जाते.
 
पालक, समाज आणि यातून घडलेल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव यावर दिसून येतो. त्यांना वाटते की, परिस्थिती आता बदलू शकत नाही.
 
या त्रासातून, परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकणार नाही याचा परिणामस्वरूप त्या निराश, हताश होतात आणि आत्महत्येचा विचार करू लागतात.
 
याशिवाय निराशा-आक्रमकता सिद्धांत (Frustration - Aggression Hypothesis) असं सांगतो की, तुमच्या तीव्र इच्छा (Strong Drives) असतील आणि त्यात अडथळा निर्माण झाला की त्या आक्रमकतेमध्ये रुपांतरीत होतात.
 
यात सातत्याने अडथळे येत असतील तरी आक्रमकता वाढलेली दिसून येते. उदाहरणादाखल आपण असे म्हणू शकतो की, पूर्वी स्त्रियांना कार्यक्षेत्र वाटून दिलेले होते, आता तिला सर्व क्षेत्र खुली केली आहेत.
 
तोंडदेखलं तिला म्हंटल जात की, स्त्री- पुरुष समान आहेत. त्यांना समान हक्क आहेत, पण प्रत्यक्षात ही समानता दिसून येत नाही.
 
वास्तवात, अजूनही तिच्यावर खूप बंधने आहेत. सगळीकडे अडथळ्यांचा सामना तिला करावा लागतो. पूर्वी मर्यादित कार्यक्षेत्रात वावरत असल्याने इच्छा (Drive) जागृत व्हायला संधीही नव्हती.
 
पूर्वी शिक्षण हे चांगला नवरा, चांगलं घर मिळावं यासाठी दिलं किंवा घेतलं जायचं. इतकीच सर्वसाधारण त्यामागे इच्छा होती.
 
पण स्वतःला सिद्ध करत ‘ती’ने एका उंचीवर स्वतःला नेवून ठेवलं आणि त्या विशिष्ट उंचीला गाठण्याची तिची इच्छा असल्याने ते घेतलं जातं. सांगायचं तात्पर्य हे की, तिच्या बाबतीत अगदी लहान लहान इच्छा पूर्ण करतांना देखील अनेक अडथळे दिसून येतात, म्हणूनही या साठून राहिलेल्या अडथळ्यांच्या परिणामस्वरूप फ्रस्ट्रेट होवून ती जास्त आक्रमक होतेय असेही असू शकते. तसंच फ्रस्ट्रेशननंतर आलेली आक्रमकता व्यक्त करायला ती अवतीभोवतीच्या वातावरणातून शिकते.
 
आपला समाज हा पुरुषसत्ताक असल्याने तिच्या आक्रमकता व्यक्त करण्यावर पुरुषांच्या आक्रमकता व्यक्त करण्याचा प्रभाव, त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचा कळत- नकळत स्वीकार केला जातो. बहुतांश वेळी यावर आई-वडिलांच्या वर्तनाचाच प्रभाव जास्त दिसतो.
 
याशिवाय आपल्या सामाजिक संरचनेतून पुढे आलेली स्त्रियांवर असलेली ‘मालकी हक्काची भावना’ ही अत्यंत दबाव वाढवणारी आणि घातक आहे.
 
पत्नी ही आपली ‘जहागीर’ आहे असं समजून पत्नीला सगळीकडे गृहीत धरायचे असते. अनेक नकोश्या वाटणाऱ्या पण घडणाऱ्या गोष्टींसाठी जबाबदार ठरवायचे असते.
 
पती संशयी आणि अति पझेसिव असतील तर तिच्या सगळ्याच गोष्टींवर बंधने घातलेली दिसतात. अमुकच कपडे घाल, याला बोलू नकोस. दोन मिनिटाच्या कामाला इतका वेळ कसा लागला? कुणाशी बोलत होतीस? असंच का बोललीस ? तुला अक्कल नाही.
 
मी पुरुष आहे मला जास्त समजतं. मी सांगतो तेच केलं पाहिजे अश्या मनोवृत्तीने कुठल्याही स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा गळा घोटला जातो.
 
हे मानसिक त्रासाचे बीज ठरते आणि तिचा आत्मविश्वास कोलमडून ती खचून आत्महत्येकडे वळू शकते. इमिल दुर्खाईमच्या सिद्धांतानुसार, ‘फॅटॅलिस्टिक आत्महत्या’ ही अशीच एक आत्महत्येची प्रवृत्ती आहे, ज्यात व्यक्तीला स्वतःच्या जीवनावर कोणताही हक्क नाही असे वाटते, जिथे सामाजिक नियम फार कठोर आहेत.
 
विवाहानंतर, स्त्रिया ज्या कुटुंबातील नियम आणि मालकी हक्काच्या भावनेखाली जगतात, त्यांना आपले जीवन एखाद्या कैद्याप्रमाणे वाटते आणि या ताणातून सुटका म्हणून आत्महत्येचा विचार स्त्रिया करू शकतात.
 
आत्महत्या टाळता येऊ शकतात का?
या आत्महत्या खरं तर टाळता येवू शकतात. या डॉक्टर तरुणीसारख्या अनेक स्त्रिया अशा परिस्थितीचा सामना करतात. हे टाळण्यासाठी अलीकडच्या काळात विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन आवश्यक बाब झाली आहे.
 
समुपदेशन हे सर्व कुटुंबीयांचे झाले पाहिजे कारण सगळ्यांच्याच भूमिका बदलणार असतात. मुलगा हा लग्नानंतर फक्त मुलाच्या भूमिकेत नसणार तर तो नवरा असणार. मुलगी ही फक्त बायको नाही, तर सून देखील असणार.
 
दोघांचे आई-वडील हे सासू सासरे होणार असतात आणि जेंव्हा भूमिका बदलतात तेंव्हा काही जबाबदाऱ्या, काही हक्क, काही फायदे मिळणार असतात. याची जाणीव आणि भान या नात्यांमधून सहप्रवासी होणाऱ्या सर्वांना असायला हवे.
 
एकमेकांच्या भावनांचा आदर करता यावा, एखादी भूमिका निभावताना त्या भूमिकेत काय काय असावे, काय नसावे याची माहिती असणे अपेक्षित असते ही माहिती समुपदेशनातून शास्त्रीयदृष्ट्या मिळते त्यामुळे समुपदेशन गरजेचे ठरते.
 
ज्यांची लग्न झालेली आहेत आणि नात्यात वादविवाद होवून परिस्थिती विकोपाला जावू नये, समस्या उघडपणे मांडता याव्यात म्हणून समोरच्याचे म्हणणे ऐकले पाहिजे. आपले म्हणणे व्यवस्थितपणे मांडता आले पाहिजे, मिळून काही कामे केली पाहिजेत जेणेकरून कुटुंबीयांमध्ये खुल्या संवादाला वाव मिळेल. त्यातून लग्नाच्या सुरुवातीच्या काळातच संवादाची आणि संघर्ष सोडवण्याची कला अवगत केली तर भविष्यातील अनेक ताण- तणावाचे प्रसंग हाताळणे सोपे जाते.
 
वैयक्तिक आणि कौटुंबिक मानसिक आरोग्य सुदृढ राहते.
 
प्रत्येकाला राग येतो, तो येवूच नये ही अवास्तव अपेक्षा आहे, पण रागाच्या भरात होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही.
 
राग आणि आक्रमकता व्यक्त करण्याच्या पद्धती शिकवल्या गेल्या पाहिजेत, त्या प्रत्येकाने शिकून घेतल्या पाहिजेत आणि त्यांचा अवलंब केला पाहिजे.
 
स्वतःच्या भावना ओळखणे, त्यांचा स्वीकार करणे त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे देखील खूप महत्वाचे आहे. याशिवाय गरज पडली तर पालकांनी योग्य भूमिका घेत हस्तक्षेप करून नेमकी परिस्थिती समजून घ्यावी व संवेदनशीलतेने त्यांच्या सोबत उभे रहावे. आर्थिक स्थैर्य, आत्मनिर्भरता, साहस आणि मानसिक स्थैर्यासाठी कौशल्य विकास आणि शिक्षणाची कास धरली पाहिजे.
 
विवाहित स्त्रियांच्या आत्महत्येच्या समस्येचा सामना करण्यासाठी केवळ मानसशास्त्रीय उपायच नव्हे तर कुटुंब, समाज आणि यंत्रणेने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Published By- Dhanashri Naik