सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 18 मार्च 2024 (11:23 IST)

घरच्या घरीही दूध बनवता येतं, हे आहेत पर्याय

milk
गाय, म्हैस, शेळी यांच्यापासून मिळणारं दूध बहुधा प्रत्येक घरात प्यायलं जातं. त्याहून पुढे जाऊन आपण गाढविणीचं, घोडीचं, सांडणीचं दूध ऐकलं आहे. पण आता बदाम, नारळ, सोया आणि ओट्स या पदार्थांपासून बनवलेलं दूध घरोघरी लोकप्रिय होऊ लागलंय. बदाम, ओट्स इत्यादी गोष्टींपासून बनवलेल्या दुधाला प्लांट बेस्ड मिल्क असं म्हणतात. ज्यांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी पर्याय म्हणून हे प्लांट बेस्ड मिल्क वापरता येतं.
 
आता जग खूप बदललं आहे. आता आपल्याला वनस्पतीजन्य पदार्थांपासून तयार केलेलं दूध मिळतं. पण जसजशी त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे तसे वादही निर्माण होऊ लागलेत. या पदार्थांना डेअरी उत्पादनांची नावं देता येणार नाहीत, असं युरोपियन युनियनने म्हटलंय.

हार्वर्डच्या टी. एच चेन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मधील पोषण विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक अविवा म्युझिकस म्हणतात, "हवामान बदलाबद्दल चिंतित असलेल्या आणि आहारातील कार्बन फूटप्रिंट्स कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे फायद्याचं आहे."
 
2018 च्या एका अभ्यासात असं आढळून आलंय की एक ग्लास डेअरी (गाय-म्हशीचे दूध) दूध मिळवण्यासाठी जवळजवळ तीनपट जास्त हरितगृह वायूचं उत्सर्जन होतं. आणि वनस्पतीजन्य दुधापेक्षा नऊ पट जास्त जमीन वापरली जाते.मात्र वनस्पतीजन्य दूध खूप लोकप्रिय असलं तरी डेअरी दुधाच्या तुलनेत ते खूप महाग आहे. कॉफी शॉप्स मध्ये जर तुम्ही वनस्पतीजन्य दुधापासून बनविलेली कॉफी मागितली तर खूप पैसे मोजावे लागतात.बदामापासून बनवलेलं दूध खूप महाग असतं. या दुधाची किंमत सामान्य गाई-म्हशीच्या दुधापेक्षा कितीतरी पट जास्त असते.
 
अमेरिकेच्या सुपरमार्केटमध्ये वनस्पतीजन्य दुधाची किंमत प्रति गॅलन 7.27 डॉलर असते. भारतीय चलनात याची किंमत सांगायची झाल्यास 600 रुपयांपेक्षाही जास्त आहे. तर गाईच्या दुधासाठी प्रति गॅलन 4.2 डॉलर (रु. 330 पेक्षा जास्त) आकारले जातात.डेअरी व्यवसायात अत्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी असल्याकारणाने आणि खूप आधीपासून डेअरी दुधाचा वापर होत असल्याने ते स्वस्त आहे.
 
अविवा म्युझिकस सांगतात, वनस्पतीजन्य दूध गायीपासून मिळत नाही याचा अर्थ याचा पर्यावरणावर परिणाम होत नाही असं नाही. सर्व वनस्पती जन्य पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात असं म्हणता येणार नाही. बदामाचं दूध हे अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय आहे मात्र रेकॉर्ड वाईट आहे. जगातील 80 टक्के बदाम कॅलिफोर्नियामध्ये तयार होतात. एक बदाम पिकवण्यासाठी 4.6 लिटर पाणी लागतं. ज्या पद्धतीने पारंपारिक बदामांची लागवड केली जाते ते मधमाशांसाठी हानिकारक असतं. तांदूळ आणि नारळापासून बनवलेल्या दुधाच्या देखील अनेक समस्या आहेत. तांदूळ पिकवण्यासाठी भरपूर पाणी लागतं, तर नारळाच्या पुरवठा साखळ्यांमध्ये नैतिक समस्या असू शकतात. त्यामुळे ओट्स, हेम्प (गांजा) यांच्यावर अधिक भर दिला जातोय. हे सर्व पर्यावरणास अनुकूल असे पर्याय आहेत.
 
किंमतींचा आपल्या आहारातील पर्यायांच्या निवडीवर अंशतः प्रभाव पडतो. जर वनस्पतीजन्य दूध तयार करण्याची प्रक्रिया आणि पॅकेजिंग महाग असेल तर ते घरी बनवून खर्चाची समस्या सोडवता येऊ शकते.
मी हे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि मला कळलं की अशा प्रकारे जर घरी दूध बनवलं तर ते दुकानातून विकत घेण्यापेक्षा अधिक महाग आहे. मात्र हे दूध तयार करताना मला आनंद झाला कारण ते तयार करणं खूप सोपं होतं.
 
गांजापासून तयार केलेलं दूध
हिप्पी समुदायात खूप लोकप्रिय असलेल्या गांजाच्या बियांपासून दूध तयार करण्याचा मी निर्णय घेतला. ते मिळवण्यासाठी मला थोडे जास्त प्रयत्न करावे लागले.स्थानिक बाजाराऐवजी मला मोठ्या सुपरमार्केटमध्ये जावं लागलं.उपयुक्ततेचा विचार करता गांजाच्या बियांचा फार काही उपयोग नाहीये. गांजपासून तयार केलेलं दूध मला कायम विचित्र चव असलेलं पाणी असल्याचं वाटायचं. त्यामुळे घरी बनवलं तर ते चवीला चांगलं असेल असं मला वाटलं.पण प्रत्यक्षात तसं घडलंच नाही. दुसऱ्या वेळी चव संतुलित करण्यासाठी मी व्हॅनिला इसेन्स आणि दोन खजूर टाकले. ब्लेंडरमध्ये बिया, पाणी आणि मीठ घालून ते एका मिनिटासाठी फिरवलं. किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, मला 950 मिलीलीटर गांजाच्या दुधासाठी सुमारे 6 डॉलर (450 रुपयांपेक्षा जास्त) खर्च करावे लागले. गांजाचं दूध बनवण्यासाठी 113 ग्रॅम बिया लागतात. त्याची किंमत 4.50 डॉलर (370 रुपयांपेक्षा जास्त) आहे. त्यामुळे आपण जास्त प्रमाणात खरेदी केल्यास या बिया स्वस्त मिळतात.
 
बदामापासून तयार केलेलं दूध
मी बाहेरून एकही बदाम विकत घेतला नाही, कारण माझ्या फ्रीजमध्ये बदामाचं 280 ग्रॅमच पाकीट होतं. याची किंमत सुमारे 12 डॉलर (990 रुपयांपेक्षा जास्त) आहे. त्यात भाजलेले बदाम होते. मला बदाम किमान सहा तास पाण्यात भिजवावे लागले.दुसऱ्या दिवशी मी भिजवलेले बदाम आणि पाणी एकत्र करून मिक्सर मध्ये फिरवलं. त्यानंतर मी हे मिश्रण गाळून घ्यायचं ठरवलं. यासाठी मी किचन टॉवेल वापरला.बदामापासून फक्त 700 मिलिलिटर दूध तयार झालं. सर्वात स्वस्त 950 मिलीलीटर बदाम दूध सुमारे चार डॉलरला (330 रुपयांपेक्षा जास्त) मिळतं.तर चांगल्या प्रतीच्या 829 मिलीलीटर बदामाच्या दुधाची किंमत सात डॉलर (580 रुपयांपेक्षा जास्त) आहे. त्यामुळे बदामाचे दूध घरच्या घरी बनवणं स्वस्त पर्याय नाही. मात्र हे दुकानात विकत घेतलेल्या दुधापेक्षा खूप चवदार होतं.
 
ओट्सपासून तयार केलेलं दूध
माझ्या घरी ओट्सपासून तयार केलेलं दूध वापरलं जातं. आणि त्यामुळे हे दूध घरच्या घरी तयार करण्याची मला उत्सुकता होती. ओट मिल्कमध्ये तेलकटपणा येण्यासाठी तेल वापरलं जातं. नाश्त्यासाठी कॉर्नफ्लेक्स किंवा मुस्लीमध्ये तेल वापरण्याची कल्पना मला थोडी विचित्रच वाटते. ओट्स पासून दूध तयार करण्यासाठी मी खूप संशोधन केलं. त्याप्रमाणे ओट्स संवेदनशील असतात. दूध मिळविण्यासाठी बर्फाचे थंड पाणी वापरावे. उष्णतेमुळे ओट्सना चिकटपणा येतो. ओट्सला पाण्यात भिजवण्याची गरज नसते आणि बदामाप्रमाणे धुण्याची गरज नसते. ओट्स पातळ आणि दाणेदार बनतात. ते जास्तवेळ मिक्सरमध्ये फिरवू नयेत. त्यासाठी फक्त 30 सेकंद पुरेसे आहेत. यावेळी मी गाळणीने हे दूध गाळलं.
 
 
मी 450 ग्रॅम सेंद्रिय ओट्स खरेदी केले होते. त्याची किंमत 11 डॉलर (911 रुपये) होती. या दुधासाठी 113 ग्रॅम ओट्सची आवश्यकता होती.यापासून सुमारे 710 मिलीलीटर दूध तयार झालं. मी खरेदी केलेल्या 1.8 लिटर ओट्सच्या दुधाची किंमत 6 डॉलर (490 रुपयांपेक्षा जास्त) होती. त्यामुळे ओट्सचं दूध घरच्या घरी बनवण्यासाठी 8.25 डॉलर अतिरिक्त खर्च येतो.हे दूध स्वतः बनवणं स्वस्त पर्याय नाहीये. पण घरच्या घरी केलेलं दूध इतकं स्वादिष्ट होतं की मी ते दुसऱ्यांदा तयार केलं. दुसऱ्यांदा तयार करताना त्यात खजूर आणि थोडं मीठ टाकलं.खजूर आणि मिठामुळे याच्या चवीत भर पडली. चॉकलेट किंवा व्हॅनिला ओट मिल्कपेक्षा काहीतरी वेगळं बनवण्याचा माझा प्रयोग यावेळी यशस्वी झाला.चिमूटभर मीठ आणि खजूर टाकणं खरं तर एक नवा प्रयोग होता. मला स्वयंपाक करायला आवडतो आणि हे प्रयोग करताना मला अजिबात कंटाळा आला नाही.विशेष म्हणजे मी सगळ्या गोष्टी घाऊक दरात खरेदी केल्याने पॅकेजिंगचा खर्च वाचला. आणि इथून पुढे मी असे वेगवेगळे प्रयोग करणार आहे. पुढच्या वेळी मी पांढऱ्या वाटण्याचं दूध काढणार आहे. त्याची चव गवतासारखी लागते असं म्हणतात.
 
जर मी आदल्या रात्री दूध बनवायला विसरलो, तर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वकाही काळजीपूर्वक मोजून मिसळावं लागेल याची मी कल्पनाही करू शकत नाही.न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या फूड सिस्टीम इकॉनॉमिस्ट कॅरोलिन दिमित्री सांगतात, "मला वाटतं की वनस्पतीजन्य दूध घरी बनवणं सोपं आहे.

घरी दूध बनवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असायला हवा. सामग्रीच्या खर्चाव्यतिरिक्त, तुम्हाला वेळेची किंमत देखील विचारात घेणं आवश्यक आहे.सामान्यतः लोक स्वतःच्या सोयीचं बघतात. त्यामुळे लोक रोज घरच्या घरी वनस्पती-जन्य दूध तयार करतील का हे मला माहित नाही."दिमित्रीच्या म्हणण्यानुसार, घरच्या घरी हे दूध बनविण्याचे फायदे म्हणजे दूध घट्ट करण्यासाठी त्यात कोणतेही ऍडिटीव्ह नसतात.
 
Published By- Priya Dixit