सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2024 (09:39 IST)

पान मसाल्यावर बंदी कायम रजनीगंधाला दिलासा नाहीच

Pan Masala
उत्तर प्रदेश सरकारला नसेल पण महाराष्ट्र सरकारला इथल्या नागरिकांच्या आरोग्याची चिंता आहे. त्यामुळे आम्ही पान मसालावरील बंदी उठवू शकत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने पान मसाला विक्री करणा-या कंपनीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. पान मसाला विक्री करणा-या एका कंपनीच्या वतीने करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने रजनीगंधा या पान मसाल्यावरील राज्यातील बंदी उठवण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
 
याचिकाकर्त्यांची कंपनी ही उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये असून तिथं पान मसालावर कोणतीही बंदी नसल्याचा दावा करून ही बंदी उठवावी अशी मागणी हायकोर्टाकडे करण्यात आली होती. मात्र, तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणा-या कॅन्सरवर उपचारांसाठी युपीतील नागरिकही मुंबईतील टाटा रुग्णलायात येतात. त्यामुळे पान मासालावरील बंदी योग्यच असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला होता.
 
याचिकेत काय म्हटले होते?
अन्न व औषध प्रशासनाने १८ जुलै २०२३ मध्ये परिपत्रक जारी करत राज्यभरात गुटखा, सुगंधी पान मसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी वर्षभरासाठी कायम ठेवली होती. या आदेशानुसार वर्षभराच्या कालावधीसाठी उत्पादकांना तंबाखू आणि सुपारीची साठवणूक, वितरण, वाहतूक तसेच विक्री करण्यास प्रतिबंधित करते. या निर्णयाविरोधीत रजनीगंधा पान मसाला कंपनीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

Edited By - Ratnadeep Ranshoor