सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मार्च 2024 (12:37 IST)

जी. एन. साईबाबा यांची मुंबई हायकोर्टाने केली निर्दोष मुक्तता

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालयाने माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केल्याचं PTI या वृत्तसंस्थेने सांगितलं आहे.
 
या प्रकरणी साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा यांच्याशिवाय आणखी पाचजणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
 
यापैकी पांडू नरोटे यांच्या याआधी तुरुंगातच मृत्यू झाला होता.
 
मे 2014 मध्ये, प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांना महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या दिल्लीतील घरातून अटक केली होती.
 
त्यानंतर साईबाबांना दिल्ली विद्यापीठाने निलंबित केले होते.
 
महाराष्ट्राच्या गडचिरोली न्यायालयाने साईबाबांना UAPA च्या कलम 13, 18, 20 आणि 39 अंतर्गत दोषी ठरवले होते.
 
प्राध्यापक साईबाबा अपंग आहेत. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची प्रकृती खालावल्याच्या कारणावरून जुलै 2015 मध्ये जामिनावर सुटका झाली होती.
 
यानंतर हायकोर्टाने त्यांचा जामीन रद्द करून त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले.
 
जी.एन. साईबाबा, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, क्रांतिकारी लोकशाही आघाडी नावाच्या संघटनेशी देखील संबंधित होते.
 
ते 'क्रांतीवादी लोकशाही आघाडी'चे उपसचिव होते.
 
माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल गुप्तचर संस्थांनी 2014 मध्ये 'रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट'ला लक्ष्य केले होते.
 
कोणत्या आधारावर साईबाबांची निर्दोष मुक्तता?
जी.एन. साईबाबा यांचे वकील हरिष लिंगायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सबळ पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आली आहे.
 
साईबाबा यांच्याविरोधात पोलिसांकडे काही इलेक्ट्रानिक पुरावे होते. तसंच साईबाबांच्या घरातूनही काही गोष्टी जप्त केल्या होत्या.
 
पण पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पुराव्याची छानणी करण्यात योग्य ती प्रक्रिया पाळली नाही. तसंच साईबाबांच्या घरातून जप्त केलेल्या सामुग्रींमध्ये कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.
 
साईबाबा हे जवळजवळ एक दशकांपासून तुरुंगात आहेत. त्यांना 90 टक्क्यांपर्यंत अपंगत्व आहे.
 
बीबीसीने साईबाबा यांच्या जोडीदार वसंता यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
 
त्या म्हणाल्या, "आम्हाला मीडियामधूनच ही बातमी समजली आहे. आम्ही आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. पण ही बातमी ऐकून मी आणि माझी मुलगी मंजीराला फार आनंद झाला आहे.
 
"आम्हाला आशा आहे की यापुढे त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय सोडण्यात येईल. गेली अनेक वर्षे साईबाबा आणि आमच्या कुटुंबाने खूप दुःख सहन केलं आहे.
 
जी. एन. साईबाबा कोण आहेत?
जी. एन. साईबाबा हे दिल्ली विद्यापीठातील आनंद महाविद्यालय येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांना 2014 साली महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात अटक केली. तेव्हापासून ते तुरुंगातच होते.
 
मार्च 2017 मध्ये साईबाबा यांना UAPA कायद्याअंतर्गत दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील अंधार कोठडीत ठेवण्यात आलं होतं.
 
साईबाबा शारिरीक दृष्ट्या 90 टक्के अपंग आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पोलिओ झाला होता. दोन्ही पायांनी चालता येत नसल्याने ते लहानपणापासूनच व्हीलचेअरला चिकटून आहेत.
 
तुरुंगात रवानगी झाल्यापासून साईबाबा यांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. यामध्ये मज्जातंतूशी संबंधित आजार, यकृताच्या समस्या, रक्तदाब, हृदयविकार आदी गोष्टींचा समावेश आहे, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणातही आरोप केला जात आहे की, सरकार बुद्धिजीवी आणि कार्यकर्त्यांना जाणूनबुजून टार्गेट करत आहेत.
 
यावर्षी 24 जानेवारीला हे प्रकरण पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडे सोपविण्यात आलं.
 
भीमा कोरेगाव प्रकरणात आतापर्यंत अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आणि बुद्धिवंतांना अटक करण्यात आली आहे. यात गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे.
 
या लोकांचा माओवाद्यांशी संपर्क असल्याचा आरोप आहे आणि भीमा कोरेगावमधील कार्यक्रमाचं आयोजन माओवाद्यांच्या पाठिंब्यानं झालं होतं, असाही आरोप आहे.
 
काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण?
1 जानेवारी 2018ला पुण्याजवळील भीमा कोरेगाव इथं हिंसाचार झाला होता.
 
या दिवशी भीमा कोरोगावमध्ये पेशवा बाजीराव यांच्यावर ब्रिटिशांनी मिळवलेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला जात होता. या कार्यक्रमादरम्यान तिथं हिंसाचार झाला आणि एकाचा मृत्यू झाला होता. तसंच अनेक गाड्याही जाळण्यात आल्या होत्या.
 
या प्रकरणावर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया आल्या होत्या.
 
हिंसाचारानंतर दलित समाज नाराज झाला होता. या समुदायानं सोशल मीडियावरच नव्हे, तर रस्त्यावर उतरुनही निदर्शनं केली होती.
 
दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे दलित समुदायातील लोक मोठ्या संख्येनं एकत्र येतात.

Published By- Priya Dixit