गुणकारी कडूलिंब
WD |
औषधी वनस्पती म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कडूलिंबाच्या झाडाची ओळख आहे. या झाडामध्ये आता कॅन्सरशीही दोन हात करण्याची क्षमता असल्याचे कोलकाता येथील एका आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. चित्तरंजन कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अभ्यासकांनी याचा शोध लावला आहे. ही टीम लिंबाच्या औषधी गुणांचा अभ्यास करीत होती. रथींद्रनाथ बराल यांच्या नेतृत्वाखालील टीमने याचा अभ्यास केला. त्यांनी लिंबाच्या पाल्यातील गुणधर्माचा अभ्यास केला असून, त्यात कॅन्सरशी लढण्याची क्षमता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. विशेषतः कॅन्सर सेल्ससह शरीरातील इम्यून सिस्टमच्या लढाईस बळ देण्यास लिंब गुणकारी आहे.यासंबंधीच्या अभ्यासावरील लेख ह्यूमन इम्यूनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून, कॅन्सर पीडित असलेल्या १७ रुग्णांच्या कॅन्सर सेल्सवर यासंबंधी प्रयोग केला आहे. त्यात लिंबाच्या पानांमुळे कॅन्सरची वाढ रोखण्यास मदत झाल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंतचा अभ्यास खरोखरच उत्साह वाढविणारा आहे. एवढेच नव्हे, तर जनावरांवर केलेल्या प्रयोगातूनही ब-याच गोष्टी समोर आल्या आहेत, असे चित्तरंजन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक जयदीप विश्वास यांनी सांगितले.
