मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By वेबदुनिया|

आयपीएल काय आहे?

ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाच्या थराराबरोबरच प्रेक्षकांच्या मनोरंजनालाही प्राधान्य दिले आहे. तसे पाहिले तर ट्वेंटी-20 सामने 1960 पासून अनौपचारिक रूपाने खेळले जात आहेत. भारताने क्रिकेटच्या या नव्या रूपाला अवलंबण्यात उशीर केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र, आता भारतानेच इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) सुरू करून ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एका नव्या युगाची सुरुवात केली आहे.

आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (बीसीसीआय) आयपीएलकडे सर्वांचीच नजर आहे. कारण त्यात जगभरातील बड्या खेळाडूंनीच नाही तर 'बिझनेस' महाराजांनीही उत्सुकता दाखवली आहे.

आयपीएल काय आहे?- हा विचार सर्वांत आधी 1996 मध्ये समोर आला. पण त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटचे नुकसान होईल असे अनेकांना वाटले. पण नंतर मात्र भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआय) आयपीएल सुरू करण्याची योजना आखली.

बीसीसीआयने इंडियन प्रीमीअर लीगची औपचारिक घोषणा 14 सप्टेंबर 2007 रोजी केली होती. त्याचे स्वरूप इंग्लिश प्रीमीअर लीग आणि अमेरिकेच्या नॅशनल बास्केटबॉल लीगशी (एनबीए) मिळते-जुळते आहे. आयपीएल सुरू होण्याचे श्रेय बीसीसीआयचे उपाध्यक्ष लल‍ित मोदी यांना जाते.

संघ कोणाजवळ- आयपीएलची फ्रॅंचायजी आठ संघांनी खरेदी केली आहे. हे संघ या फ्रॅंचायजींच्या ताब्यात असतील. आपले प्रायोजक आणि संघांचे नावही ते स्वत:च ठरवतील आणि आपल्या संघाच्या खेळाडूंची निवड करण्यासही स्वतंत्र असतील.

आयपीएल आणि फुटबॉल, हॉकी लीग - भारतात हॉकीचे पीएचएल, फुटबॉलची आय-लीग आणि आयपीएल यांच्यात बरेच साधर्म्य आहे. आयपीएलमध्ये विविध कंपन्यांनी संघ खरेदी केले आहेत. या संघांमध्ये खेळणारे खेळाडू बीसीसीआयने करारबद्ध केले आहेत. संघांचे अधिकार खरेदी करणारी कंपनी त्यांना खरेदी करेल.

आयपीएलची पुरस्कार रक्कम- आयपीएलमध्ये 44 दिवसात आठ शहरांमध्ये 59 सामने खेळले जातील. स्पर्धेच्या पुरस्काराची रक्कम तीन दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढी आहे. ही रक्कम दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ट्वेंटी-20 विश्व कप सामन्यांच्या पुरस्कार रकमेपेक्षा (1.9 मिलियन डॉलर) फारच जास्त आहे. डीएलएफने दोनशे कोटी रुपयांत पाच वर्षांसाठी हा अधिकार मिळविला आहे.

टी.व्ही. प्रसारण हक्क- बोर्डाला या स्पर्धेचे हक्क विकून भरपूर पैसा मिळाला आहे. भारताच्या सोनी एंटरटेनमेंट आणि सिंगापूरच्या वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप (डब्ल्यूएसजी) यांनी संयुक्तरीत्या दहा वर्षांसाठी हा हक्क मिळविला आहे. बोर्डाला प्रसारण हक्कासाठी 3672 कोटी रुपये मिळणार असून 432 कोटी रुपये स्पर्धेच्या प्रमोशनसाठी खर्च केले जाणार आहेत.

आयोजन समिती: बीसीसीआयने आयपीएलच्या संयोजनासाठी समिती स्थापन केली असून त्यात बीसीसीआयेच माजी अध्यक्ष आय. एस. बिंद्रा, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, चिरायू अमीन, ललित मोदी आणि अरुण जेटली, माजी क्रिकेट खेळाडू मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावसकर, रवी शास्त्री सामील आहेत.

बोर्डाचे अधिकारी सन्माननीय सदस्य आहेत. तसेच पतौडी, गावसकर आणि शास्त्री यांना त्यांचे सेवेसाठी मानधन दिले जाणार आहे. या समितीचा कार्यकाळ पाच वर्षाचा असेल.

आयपीएलमध्ये शहरांच्या आधारे संघ निवडले आहेत. शहरात कमीत कमी पंचवीस हजार प्रेक्षक क्षमता, कृत्रिम प्रकाश व्यवस्था असणारे मैदान हवे होते. आयपीएलचे सामने भरविण्यासाठी अहमदाबाद, कानपूर आणि कटक ही शहरे होती. पण त्यांना संधी मिळू शकली नाही.

भविष्यातील योजना- ट्वेंटी-20 क्रिकेटच्या काळात आयपीएलनंतर चॅम्पियन्स ट्वेंटी-20 स्पर्धा होईल. त्यात देशातील सर्व संघ आणि बाहेरील संघ यांचे सामने होतील. अग्रक्रमावरील चार संघ सेमी फायनलमधे प्रवेश करतील. फायनलमध्ये पोहचणारे दोन संघ चॅम्पियन्स ट्वेंटी-20 स्पर्धेत प्रवेश करतील.

काय आहे टवेंटी-20 चॅम्पियन्स लीग- ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्यात देशांतर्गत ट्वेंटी-20 स्पर्धेत विजेते ठरलेले दोन संघ भाग घेतील. ही स्पर्धा ऑक्टोबर 2008 मध्ये खेळली जाणार आहे. त्याचे संयोजन भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड करणार आहे.

चॅम्पियन्स लीगचे स्वरूप: ही देशांतर्गत खेळणाऱ्या संघांची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. सर्व आयोजक देशांमध्ये विजेते ठरलेले दोन संघ या स्पर्धेत प्रवेश मिळवतील.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिक या देशांचे संघ आपल्या देशांतर्गत स्पर्धांतून ही पात्रता कमावतील. भारतात आयपीएल हे स्थान घेईल. ऑक्टोबरमध्ये होणार्‍या या स्पर्धेत प्रत्येक देशाचे दोन संघ भाग घेतील. त्यांना दोन समूहात विभागले जाईल. त्यात फायनल आणि सेमीफायनल मिळून एकूण पंधरा सामने होणार आहेत. स्पर्धेचे स्थळ अजून ठरलेले नाहीत.

पुरस्कार रक्कम : स्पर्धेसाठी एकूण पुरस्कार रक्कम पाच दशलक्ष अमेरिकी डॉलर एवढी आहे. विजेत्या संघाला दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर मिळणार असून बाकीच्या रकमेचा उपयोग आयपीएलमध्ये केला जाणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील विजेत्याला मिळालेल्या (एक दशलक्ष अमेरिकी डॉलर) रकमेपेक्षाही ही रक्कम जास्त आहे.