मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By अभिनय कुलकर्णी|

आयपीएलने 'कोटकल्याण'

NDND
इंडियन प्रीमीयर लीगच्या दुसर्‍या सत्रासाठीचा लिलाव पाहिल्यानंतर या देशात मंदी वगैरे फुकाच्या गोष्टी आहेत, असे वाटले तर त्यात काही चुकीचे नाही. अभिनेत्री प्रीती झिंटा म्हणालीसुद्धा, 'या देशात क्रिकेट आणि या दोन क्षेत्रात मंदीला अजिबात थारा नाही. आयपीएल तर या दोन्हींचा संगम आहे.' प्रीतीचे म्हणणे शंभर टक्के खरे असल्याचेच गेल्या काही दिवसातले चित्र आहे. आयपीएलच्या लिलावात तर हे प्रकर्षाने जाणवले. गेल्या वेळी या लिलावात घेतली गेलेली कोटीच्या कोटी उड्डाणे पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. यावेळी पीटरसन आणि फ्लिंटॉफ सारख्यांना त्याहून जास्त रक्कम मोजण्यात आलेली पाहून आयपीएलने कुणाचेही कोटकल्याण झाल्याची खात्री पटली.

भारतात झालेली मालिका ५-० अशी हरून माघारी परतलेल्या इंग्लिश कर्णधार केवीन पीटरसनला आणि संघातील त्याचाच साथीदार अँड्र्यू फ्लिंटॉफला ७.५५ कोटी कशाच्या आधारावर मोजण्यात आले हे कळण्याच्या पलीकडचे आहे. बंलगोर रॉयल चॅलेंजर्स या संघाचे मालक विजय मल्ल्या यांना काहीही करून पीटरसन हवाच होता. त्यामुळे त्यांनीच त्याच्यासाठी बोली वाढवली आणि त्याला येनकेनप्रकारे विकत घेतलेच. त्याचवेळी चेन्नई सुपरकिंग्जचे मालक इंडिया सिमेंटनेही फ्लिंटॉफला तेवढ्याच किमतीला विकत घेतले. या दोघांसकट उर्वरित खेळाडूंना जी किंमत मिळाली त्यावरून खरोखरच त्याची किंमत तेवढी होती का हा प्रश्न पडतो.

भारतात पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या या दोघांना लावलेल्या बोलीने मागच्या वर्षीचा महेंद्रसिंह धोनीसाठी लावलेल्या बोलीचा विक्रमही मागे पडला. ज्या चेन्नई सुपरकिंग्ज संघात धोनी आहे, त्याच संघात आता त्याच्याहीपेक्षा जास्त पैसे देऊन मोजून घेतलेला फ्लिंटॉफही आहे. धोनी त्याच्यापेक्षा यशस्वी असूनही त्याची 'किंमत' कमी आहे. या लिलावातील बोली परस्परातील स्पर्धेमुळे जास्त वाढल्याचे बोलले जात आहे. मल्या यांना पीटरसन आणि चेन्नईवाल्यांना फ्लिंटॉफ यांना काहीही करून विकत घ्यायचेच होते. त्यामुळे त्यांनी बोली वाढली तरी हरकत नाही अशी भूमिका ठेवली. पण त्याचा फायदा इतर फुटकळ खेळाडूंनाही मिळाला.

मश्रफी मोर्तझा, टायरॉन हेंडरसन, ड्युमिनी ही नावे तरी तुम्ही ऐकली नसतील. पण त्यांना कोट्यवधी रूपयांना खरेदी केले गेले आहे. ड्युमिनी या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला मुंबईने 4 कोटी 75 लाख रूपये मोजून विकत घेतले. तर हेंडरसन या त्याच्याच देशबंधूला तीन कोटी 25 लाखांना विकत घेतले. आहे. या हेंडरसनने आतापर्यंत एकमेव वन डे खेळलेली आहे. घरगुती सामन्यांत ट्वेंटी-20 तील चांगली कामगिरी ही त्याची जमेची बाजू आहे. त्याचवेळी मोर्तझासाठी कोलकता नाईट रायडर्सने तीन कोटी रूपये मोजले आहेत. रवी बोपाराची लायकी काय पण प्रीती झिंटाच्या राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी चक्क दोन कोटी मोजले आहेत.

कुणाला किती पैसे मिळावेत यासाठी काही सुमारच उरला नाही. काही खेळाडूंना अवाच्या सव्वा आणि काहींना अगदीच कमी तर काहींना काहीच नाही अशी स्थिती दिसून आली. इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडला फक्त 1 कोटी 37 लाखात दिल्लीने विकत घेतले. त्याचा सहकारी ओवेस शहाचीही तीच गत आहे. बाकी ऑस्ट्रेलियाचे स्टुअर्ट क्लार्क, ब्रॅड हॅडीन, दक्षिण आफ्रिकेचा एश्वेल प्रिन्स, आंद्रे नेल, वेस्ट इंडिजचा रामनरेश सरवान हे गुणी खेळाडू विकत घेण्यासाठी कोणताही संघ पुढे सरसावला नाही. याचा अर्थ ते गुणवान नाहीत असा नाही. पण संघांना आकृष्ट करून घेण्यात ते कुठेतरी कमी पडले एवढे नक्की.

आयपीएल हा पैशांचा खेळ झाला हे नक्की. पण मागच्या वेळी अव्वाच्या सव्वा पैसे मोजून घेतलेल्यांनी नंतर काय दिवे लावले हे उघड असतानाही याही वेळी पैशांचा खेळ खेळण्यात आला. अँड्र्यू सायमंड्सपासून अनेक नामचीन खेळाडू भरपूर पैसे देऊन मागच्या लिलावात विकत घेतले गेले. पण त्यातले अनेक खेळाडू पार फ्लॉप ठरले. कोलकता, हैदराबाद, बंगलोर या संघांकडे हे खेळाडू मोठ्या प्रमाणात होते तरीही या संघांची कामगिरी निराशाजनक झाली. त्या तुलनेत राजस्थान रॉयल्सकडे शेन वॉर्न वगळता बडे खेळाडू फारसे नव्हते. तरीही हा संघ विजेता ठरला. पण यातून या संघाच्या मालकांनी काहीही धडा घेतला नाही हेच यावेळी कळले. या कॉर्पोरेट उद्योगपतींना कमाई करून देणारे खेळाडू हवे आहेत. खेळालाही आता त्यांनी आपल्या दावणीला बांधले आहे. आता बघूया आयपीएलमध्ये यावर्षी काय घडतेय ते.