शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By वेबदुनिया|

भारतीय क्रिकेटची पंढरी मुंबई

मुंबई, भारतातले असे शहर जिथे चोवीस तास काम चालू असते. या शहराने कधी विश्रांती घेतलीच नाही. हे शहर म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि भारतीय क्रिकेटची पंढरीसुद्धा.

भारतीय संघाची चर्चा सुरू झाल्यानंतर मुंबईला वगळून चालत नाही. कारण भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईला खूप महत्त्व आहे. मुंबईने भारतीय संघाला खूप काही दिले आहे. लिटल मास्टर सुनील गावसकर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे दिग्गज खेळाडू मुंबईचीच देन आहे.

रणजी सामन्यांमध्ये मुंबईचा संघ अत्यंत यशस्वी मानला जातो. आतापर्यंत मुंबईने 37 वेळा रणजी करंडक जिंकला आहे. शिवाय 15 वेळा इराणी करंडकावर नाव कोरले आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या या शहरात गुणवान खेळाडूंची कधीच कमतरता नव्हती. म्हणूनच मुंबईत क्रिकेट खेळाडूंची देदिप्यमान परंपरा आहे.

इतिहासात डोकावले असता 1934-35 दरम्यान पहिल्यांदा विजय मर्चंट यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी करंडक जिंकला होता. 1955-56 ते 1976-77 पर्यंत मुंबई संघाने बावीसपैकी वीस वेळा रणजी करंडक जिंकला आहे. 1980 पर्यंत मुंबई संघ सतत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचला होता. त्यानंतर मात्र पाचच वेळा या संघाला अंतिम सामन्यापर्यंत मजल मारता आली. 1993-94 ते 2003-04 पर्यंत पुन्हा मुंबई संघाने सहा वेळा रणजी करंडक जिंकला आहे.

2006-07 मध्ये मुंबई संघाने बंगालविरूध्द वानखेडे मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात 37 वा रणजी करंडक पटकावला. मुंबई संघाने रणजी करंडकातही अनेक महत्वपूर्ण विजय मिळविले असून पंधरा वेळा हा करंडक पटकावला आहे.