शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

II सखी II

ती आली आयुष्यात अन् मी मोठी झाले
अवखळ मुलीची एकदम बाई झाले
नको वाटायचे तिचे येणे
सगळ्यात असून दूर बसणे
सण नाही वार नाही
तिचे येणे ठरलेले
अन् तिच्या येण्याने माझे बेत उधळलेले
बरोबर महिन्याने यायची
येण्याआधी आठ दिवस चाहुल द्यायची
इतकी सवय झाली तिची 
की नाही आली वेळेवर तर मी चिडायची
 सगळे तिचे नखरे सहन केले
तिने नाचवले तशी नाचले
तिनेच एकदा न येऊन सांगितले गुपित
आई होशील आता गर्भ रुजलाय कुशीत
तेवढाच काय तो दुरावा बारा महिन्यांचा
पण नंतर आलीच परत भाग होऊन आयुष्याचा
इतकी वर्षे चाललेय तिच्या सोबत
कधी कंटाळा दाखवला नाही
आता मात्र काय झालेय तिचे
मनातलं काही सांगत नाही
नसलं मनात तर येत नाही दोन दोन महिने
मी मात्र सैरभैर तिच्या न येण्याने
कशासाठी ही चिडचिड कोणालाच कळत नाही
कशासाठी ही कासावीशी माझे मला वळत नाही
कधीमधी येत राहून ती मला चिडवणार
तिच्याच मनासारखे वागून ती मला ताटकळवणार
ती यायला लागली तेव्हा सोहळा केला होता आईने
तिच्या जाण्याची हुरहुर मात्र सोसतेय मी एकटीने
एक वेळ अशी येईल तिचे येणे बंद होईल
एक कप्पा आयुष्यातला कायमचा दूर होईल
होईन मी मुक्त बांधिलकीतून म्हणून वाजवावीशी वाटतेय टाळी
तुमचीही परिस्थिती नाही माझ्यापेक्षा वेगळी
वाचताना गालात हसाल
ही तर माझीच कहाणी म्हणाल 
येते मनाने जाते मनाने ही
बंधन कसले पाठवत नाही
अशी ही एकमेव मैत्रीण खाशी
जरी असल्या आपल्या बारा राशी