बॅग कशी भरायची
आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
फापट पसारा आवरून सारा,
आता सुटसुटीत व्हायचं आहे !
याच्या साठी त्याच्या साठी,
हे हवं, ते हवं
इथे तिथे - जाईन जिथे,
तिथलं काही नवं नवं
हव्या हव्या चा हव्यास आता
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे,
बॅग हलकी स्वतः पुरती
आता फक्त ठेवायची आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
अपेक्षांच्या ओझ्याखाली
आजवर त्रस्त होतो
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये
काय काय कोंबत होतो !
किती बॅगा किती अडगळ !
साठवून साठवून ठेवत होतो
काय राहिलं, कुठे ठेवलं
आठवून आठवून पाहत होतो
त्या त्या वेळी ठीक होतं
आता गरज सरली आहे,
कुठे काय ठेवलंय ते ते
आता विसरून जायच आहे
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
खूप जणांनी खूप दिलं
सुख दुखाःचं भान दिलं
आपण कमी पडलो याचं
शल्य आता विसरायचं आहे !
मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’
यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
आत बाहेर काही नको
आत फक्त एक कप्पा,
जना - मनात एकच साथी
सृष्टी करता एकच देवबाप्पा !
सुंदर त्याच्या निर्मिती ला
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत
अलगद उठून जायचं आहे
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !