शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (14:15 IST)

प्रेशर कूकरचा स्फोट टाळण्यासाठी 'या' 9 गोष्टी करा

विटोर तवारेस
70 वर्षांच्या डॉक्टर मार्कोस बॅरेटो यांच्याकडे दर आठवड्याला एकतरी रुग्ण असा येतो जो म्हणतो, "डॉक्टर, प्रेशर कूकरचा स्फोट झाला."
 
मागील अनेक दशकांपासून ब्राझीलमध्ये त्वचारोग केंद्राचे प्रभारी असलेले सर्जन बॅरेटो सांगतात की, असा अपघात झालेली एक तरी व्यक्ती दर आठवड्याला इथे येत असते.
 
बॅरेटो सांगतात, एकदा तर उकळतं अन्न रुग्णाच्या चेहऱ्यावर सांडलं होतं, तर एकदा अशाच घटनेत रुग्णाची दृष्टी गेली होती.
 
त्या सहसा गरीब महिला, गृहिणी किंवा स्वयंपाकी असतात.
 
12 किंवा 13 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलंदेखील अशाप्रकारे जखमी होतात. स्वयंपाकघरात मदत करण्यासाठी गेलेल्या किंवा आजूबाजूला उभे असलेल्या मुलांवर असा गंभीर प्रसंग ओढावतो.
 
दर आठवड्याला अशी अनेक गंभीर प्रकरण येऊन देखील बॅरेटो यांनी स्वतः प्रेशर कूकरचा वापर करणं थांबवलेलं नाही.
 
"आम्ही घरी स्वयंपाकासाठी कूकरचं वापरतो. मांस किंवा बीन्स शिजवण्यासाठी आम्ही कूकर वापरतो. त्याचा वापर योग्य प्रकारे केला तर कोणताच धोका उद्भवत नाही."
 
तज्ञही सांगतात की, प्रेशर कूकरचा वापर थांबवू नये.
 
अभियंता आणि मटेरियल सायन्समधील मास्टर लिआंद्रो पोसामाई सांगतात, "तुम्हाला या भांड्याला घाबरण्याची गरज नाही, उलट त्याचा योग्य तो वापर शिकून घ्या. वापराच्या तुलनेत याची जोखीम शून्य आहे."
 
शेफ आणि प्राध्यापक असलेल्या झेनिर डल्ला कोस्टा म्हणतात, "यात घाबरण्यासारखं काही नाही, कारण त्याचा वापर सुरक्षित आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वयंपाकघरात मुळातच धोकादायक वातावरण असतं. तिथे तुम्ही तुमचा मोबाईल फोन वापरू शकत नाही."
 
पण इतकं असूनही अपघात होतच राहतात. सोशल नेटवर्क्सवर शेअर केलेल्या डझनभर व्हीडिओंमुळे लोकांमध्ये एकप्रकारची भीती पसरते.
 
तज्ञांच्या मते, अशा अपघातांचं प्रमाण वाढण्याचं कारण म्हणजे माहितीचा अभाव.
 
प्रेशर कूकरचे अपघात टाळण्यासाठी काय कराल?
प्रेशर कूकरची देखभाल किती वेळा करावी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खरेदी केलेल्या भांड्याची सुरक्षा पुस्तिका वाचा.
ज्या वॉल्व्हमधून वाफ निघते ते नेहमी स्वच्छ आहे का ते तपासा.
कूकरमध्ये जितकं सांगितलं आहे तितकंच अन्न शिजवा, त्यापेक्षा अधिकचा भरणा करू नका. जे पदार्थ शिजल्यावर आकाराने दुप्पट होतात ते शिजवताना काळजी घ्या.
पाण्याशिवाय कूकर कधीही वापरू नका.
कूकरच्या आत कधीही कंडेन्स्ड मिल्कचे डबे वापरू नका, जे अंतर्गत दाबामुळे फुटू शकतात.
झाकण सुरक्षितपणे बंद आहे का ते तपासा.
जेव्हा तुम्ही गॅस बंद करता, तेव्हा भांडे थंड होऊ द्या आणि नैसर्गिकरित्या त्यातील वाफ शांत होऊ द्या. कधीही वॉल्व्ह द्वारे स्वतः वाफ काढण्याचा प्रयत्न करू नका.
जर तुम्हाला कूकर लवकर थंड करायचा असेल तर तुम्ही भांड्यावर थंड पाणी टाकू शकता. परंतु वाफ बाहेर पडणाऱ्या व्हॉल्व्हवर पाणी सांडणार नाही याची काळजी घ्या.
जोपर्यंत सर्व वाफ निघत नाही तोपर्यंत झाकण उघडू नका.
'जळालेल्या चेहऱ्यामुळे मला रुग्णालयात 9 दिवस काढावे लागले'
 
52 वर्षीय लुसिलाइड मारिया दा सिल्वा दुपारच्या वेळी घरी स्वयंपाक तयार करत होत्या. अचानक परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
 
त्या एका गॅसच्या बर्नरवर भात ढवळत होत्या, तर दुसरीकडे प्रेशर कुकरमध्ये बीन्स शिजत होते. अचानक त्याचा स्फोट झाला. बीन्स उडून त्यांच्या चेहऱ्यावर चिटकले.
 
त्या सांगतात, "त्यावेळी मी फक्त एकच गोष्ट करू शकले ते म्हणजे माझे डोळे बंद करणे. माझ्या चेहऱ्यावर गरम वाफ जाणवत होती. मी जोरात किंचाळले, मला मदत करा."
 
घराच्या छताचं नुकसान झालं होतं, स्वयंपाक घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या.
 
लुसिलाइडचे कुटुंबीय तिला रुग्णालयात घेऊन गेले. त्यांना वेदना झालेल्या आठवत नाहीत, फक्त इतकंच आठवत की, गरम बीन्सने त्यांचा चेहरा माखला होता.
 
त्यांचा चेहरा सेकेंड-डिग्री भाजला होता. त्यामुळे त्यांना नऊ दिवस रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यांना भूल देऊन चेहऱ्यावरील उपचार करावे लागले.
 
बहुतेक प्रकरणांमध्ये प्रेशर कुकर कसा वापरायचा हे माहीत नसल्याने स्फोट झाले होते.
 
एक गृहिणी सांगते की, अपघाताच्या काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या पतीने प्रेशर कूकरच्या सेफ्टी व्हॉल्व्हसोबत छेडछाड केली होती. घरातील लोकांना भीती वाटू नये, म्हणून त्यांनी तो व्हॉल्व्ह बंद करून टाकला होता.
 
"हे खोटं वाटेल पण आम्हाला माहिती नव्हतं की, वाफ बाहेर पडण्यासाठी किंवा स्फोट न होण्यासाठी व्हॉल्व्ह उघडला पाहिजे.
 
आणि मी तुम्हाला हे खात्रीने सांगते की बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहिती नसते."
 
माहितीच्या अभावामुळे त्वचा जळते
डॉक्टर मार्को बॅरेटो म्हणतात, "काळजी न घेतल्यामुळे जखम झालेल्या भागाची लाहीलाही होते."
 
गॅस्ट्रोनॉमीचे प्राध्यापक झेनिर डल्ला कोस्टा सांगतात की, ज्यांना कूकर कसा वापरायचा याची माहिती असते ते त्याचा वापर करताना अजिबात घाबरत नाहीत.
 
ते म्हणतात, "काही विद्यार्थी आधीच भीतीने गांगरून गेलेले असतात. पण जर त्यांना कुकरची नीट माहिती दिली, व्हॉल्व्ह कसा स्वच्छ ठेवायचा हे सांगितलं तर काळजी करण्याचं कारण नाही."
 
कूकरचा स्फोट होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक टिपांपैकी एक म्हणजे नेहमी व्हॉल्व्हकडे लक्ष द्यावे. डल्ला कोस्टा सांगतात की ते प्लंजर सुईने स्वच्छ केले जाऊ शकते.
 
झाकण सील करणारे रबर खराब किंवा सैल असेल तर ते बदलणे देखील महत्त्वाचे आहे.
 
फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ गोईस मध्ये भौतिकशास्त्र शिकवणारे, प्राध्यापक लियांड्रो पोसामाई यांनी वर्गात व्यावहारिक उदाहरण म्हणून प्रेशर कुकर वापरण्यासाठी एक प्रकल्प विकसित केला आहे.
 
त्यातून त्यांना दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तू कशा वापरायच्या हे सांगायचं आहे.
 
ते सांगतात, "आपल्या दैनंदिन उपकरणांमध्ये भौतिकशास्त्र वापरलेलं दिसत नाही. पण जेव्हा आपण उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा विद्यार्थी ते लगेच ग्रहण करतात."
 
उदाहरणार्थ शिक्षक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगतात की, जेव्हा कुकरमध्ये दाब तयार होतो तेव्हा आपण उष्णता कमी करू शकतो कारण भांड्याच्या आत मधील पाणी आधीच कमाल तापमानापर्यंत पोहोचलेले असते. यामुळे स्वयंपाक करण्याचा वेळ तर वाचतोच शिवाय गॅसही वाचतो.
 
आणि केवळ अर्थव्यवस्थेसाठीच (वेळ आणि पैसा) नाही तर पदार्थांच्या गुणवत्तेसाठीही कुकर आवश्यक आहे.
 
उदाहरणार्थ, बीन्स प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास ते चांगल्या पद्धतीने शिजतात. पण तुम्ही साध्या भांड्यात ते शिजवले तर ते एकसारखे शिजत नाहीत असं डल्ला कोस्टा सांगतात.
 
चणे आणि काही प्रकारचे बीन्स यांसारख्या पदार्थांपासून तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जर कुकर खूप भरला तर कुकरचा व्हॉल्व देखील बंद होऊ शकतो.
 
डल्ला कोस्टा सांगतात, "अशावेळी व्हॉल्वमधून पाणी बाहेर येतं. काहीतरी गडबड झाल्याची ही पूर्वसूचना असते. मी नेहमी सांगतो, तुम्ही गॅस बंद करून ते भांडं तसंच ठेऊन सुरक्षित ठिकाणी निघून जा."