गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

गूंतवणूक

ND
सांगायचे होते जे सांगितले नेत्रांनी
आता काम तुझे ते अनुभवणे हृदयानी

शब्दांना पुढाकार मिळूच दिला नाहीस तू
नि:शब्द भावांना उमलूच दिले नहीस तू
भोगायचे होते ते भोगले माझ्या तृप्तींनी
आता काम तुझे मला सावरणे हातांनी

निश्वासाने समाधानी दु:ख शिथिल केले मी
दैवगतीच्या फेर्‍यातून परिपक्व झाले मी
ओलांडायचे नव्हते जे ओलांडले मर्यादांनी
आता काम तुझे बांध घालणे मज संयमानी

शब्दांना कैद केले अस्पर्शी भावांनी
अंतरीची मुक्तद्वारे मुक्त केली स्फूर्तींनी
थांबवायचे नव्हते जे थांबवीले उर्मींनी
आता काम तुझे मला गुंतविणे धाग्यांनी.