किती दिवस मी मानित होतें
किती दिवस मी मानित होतें
ह्या दगडापरी व्हावे जीवन;
पडो उन वा पाउस त्यावर
थिजलेलें अवधें संवेदन…
किळवुन ज्याच्या वरती डोळे
मनात यावे असले कांही
तोच एकदा हसुन म्हणाला-
दगडालाही चुकले नाही.
चुकले नाही, चढते त्यावर
शेवाळाचे जलमी गोंदण;
चुकले नाही . केविलवाणें
दगडफुलाचे त्यास प्रसाधन…
थिजलेल्याचे असले कांही
त्याहुन वाते, हवे तुझे मन
सळसळणारे अन जळणारे
पशापशाने जाया भडकुन
– इंदिरा संत