मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By

पाउल आणि पाय दिसायला एकच वाटतात पण खूप वेगळे असतात

पाउल आणि पाय 
दिसायला एकच वाटतात 
पण त्यांचे संदर्भ 
खूप वेगळे असतात.
 
पाउल नाजूक आणि 
मुलायम असते 
तर पाय मजबूत आणि 
भक्कमपणा दाखवतो. 
 
पाउल आपल्या खुणा उमटवतो 
तर पायाचे ठसे असतात. 
 
पावलावर पाउल ठेवणे 
गरजेचे असते 
तर पायावर पाय ठेवणे 
सर्वमान्य नसते. 
 
पावलांचा मागोवा घेतात 
तर पायाचा माग काढणे 
तसे अवघडच.
 
पाउलखुणा एका तरल 
प्रवासाची सुरवात करतात 
व त्यातून बनते पाउलवाट, 
तर पायांनी सुरु होते पायवाट 
जी मुख्य रस्त्यावर नेउन सोडते. 
 
पाउलवाट अस्पष्ट असते 
तर पायवाट सहजी गवसते. 
 
पाउलवाटेवर कोणाची 
साथ मिळेलच 
याची खात्री नसते 
तर पायवाट अनेकांच्या 
चालण्याने बनते. 
 
पाउलवाट वैयक्तिक असल्याने कधीही संपू शकते
तर पायवाट वापरून जास्त सक्षम बनत जाते.
 
पाउल एक मानसिकता 
असते व्यक्तीची 
तर पाय मानसिकता 
असते अनेकांची.
 
पाउल जपून टाकायचे असते 
तर पाय रोवायचा असतो. 
 
पाउल घसरते 
तर पाय अडकल्याने 
लवकर निघत नाही. 
 
पाउल वाकडे पडले तर 
पायांचा मार्ग व दिशा चुकू शकते आणि एकदा उचललेले पाउल 
मागे घेता येत नाही. 
 
कमकुवत मनाला आपल्याच पावलाच्या आवाजाने दचकायला होते
तर अनेक पायांचा दमदार आवाज खूप धीर देणारा असतो. 
 
जीवनात टाकलेले पहिले 
पाउल कौतुकाचा भाग असतो 
तर जीवनभर केलेली पायपिट 
एक अटळ गरज असते, 
कधी स्वत:साठी तर 
अनेकदा इतरांसाठी.
 
जन्माला येताना स्वत:च्या 
पावलांनी न येणारे आपण 
जातानाही आपल्या पायांनी 
जात नाही एवढेच काय ते साम्य 
या दोघात असते. 
 
एका पावलाने सुरु झालेले 
जीवन दोन पायांच्या सहाय्याने
बिनातक्रार पूर्ण करणे
यालाच जीवनयात्रा म्हणतात.....

- सोशल मीडिया