तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच तारे अजून काही
जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा
खुली व्यथांची सताड दारे अजून काही
तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही
गडे मला सांग माझीतुझी वदंता
विचारते गाव हे बिचारे अजून काही
तुम्ही कुठे आमच्या दिशा बंदिवान केल्या ?
सणाणती बंडखोर वारे अजून काही
थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हेका-
'अजून गा रे.. अजून गा रे.. अजून काही..'
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत झुंजणारे अजून काही !
विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही
कवी : सुरेश भट