गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By

अभिज्ञान, पुणे गुणीजन गौरव पुरस्कार २०२३ ची घोषणा

पुणे- भारतीय संस्कृती, संस्कृत आणि भारतीय साहित्य यासाठी विविध उपक्रम आयोजित करणाऱ्या अभिज्ञान, पुणेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त वर्ष २०२३ च्या गुणीजन गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक कार्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत कार्यरत गुणीजनांना प्रतिवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. गौरवपत्र, मेडल आणि ग्रंथभेट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
शिक्षण क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर, सोलापूर आणि सौ. मेघना फडके, पुणे यांना घोषित झाला आहे. डॉ. मुडेगावकर यांचे शिक्षण, अभिनय, शैक्षणिक तंत्रविज्ञान अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान आहे. सौ. मेघना फडके या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून प्रसिद्ध आहेत. विविध शैक्षणिक उपक्रमांत त्यांचे भरीव योगदान आहे. साहित्य क्षेत्रामधील गुणीजन गौरव पुरस्कार ऋचा दीपक कर्पे, देवास मध्यप्रदेश यांना घोषित झाला आहे. शॉपिज़न, प्रकाशन, अहमदाबादच्या मराठी विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच साहित्य क्षेत्रात त्यांचे कथा संग्रह, कविता संग्रह यांद्वारे भरीव असे योगदान आहे. पत्रकारिता क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार श्री विजय कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला आहे. 
 
श्री. कुलकर्णी हे दै. राष्ट्रसंचार मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता, लेखन आणि छायाचित्रण क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार सौ. अलका चंद्रात्रे, नाशिक यांना घोषित झाला आहे. सौ. चंद्रात्रे यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि सहभाग यांत भरीव असे योगदान आहे. संस्कृत अध्यापन क्षेत्रातील गुणीजन गौरव पुरस्कार श्री. दत्ता गव्हाणे यांना घोषित झाला आहे. परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागांत संस्कृत विषयाच्या प्रचारासाठी श्री. गव्हाणे यांचे भरीव योगदान आहे. 
 
अभिज्ञान, पुणेचे मार्गदर्शक डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर आणि संचालिका सौ. मानसी चंद्रहासशास्त्री सोनपेठकर यांनी अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर आणि अभिज्ञान, पुणे च्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त प्रस्तुत पुरस्कारांची उद्घोषणा केली आहे. या बद्दल सर्व पुरस्कारार्थींचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.