रविवार, 28 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2016 (10:18 IST)

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन

waman howal
ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. शुक्रवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.
 
मूळचे सांगलीचे असलेले वामन होवाळ उच्च शिक्षणासाठी मुंबईला आले. त्यांची पहिली कथा माणूस (१९६३) कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर सत्यकथा, यशवंत, राजश्री, वसुधा, धनुर्धारी आदी मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. बेनवाड, येळकोट, वारसदार, वाटाआडवाटा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मजल्याचं घर, पाऊसपाणी या कथा इंग्रजी, फ्रेंच भाषेत अनुवादित झाल्या आहेत. जपून पेरा बेणं, आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात ही त्यांची लोकनाट्येही प्रसिद्ध आहेत. शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकर यांच्या नंतरच्या पिढीतील प्रमुख कथाकथनकार म्हणून महाराष्ट्र त्यांना ओळखतो. कथाकथनासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या कथांमधून दलित ग्रामीण विश्वाचे दर्शन घडते. त्यांनी मुंबईमधील झोपडपट्टीमधील रहिवाशांचे आयुष्यही त्यांच्या कथांमधून रेखाटले.